Next
मने कोरडी, रक्तानेही भिजली नाही : जितेंद्र जोशी
डोळ्यांत अंजन घालणारी कविता लिहून नोंदवला दहशतवादी हल्ल्याचा निषेध
BOI
Friday, February 15, 2019 | 03:44 PM
15 0 0
Share this article:

जितेंद्र जोशीमुंबई : गुरुवारी (१४ फेब्रुवारी) काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या ताफ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत आहे. मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने या हल्ल्यानंतर स्वतःच्या भावना कवितेद्वारे व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने ही कविता शेअर केली आहे. ही कविता अंतर्मुख व्हावला लावणारी आहे. 

सरणावरची आग अजूनही विझली नाही
मुले पोरकी शहीदांची हो निजली नाही
निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रक्तानेही भिजली नाही
आग लागली अवती-भवती
मनात पण ठिणगीही नाही
अब्रू, स्वाभिमान चिरडला
कितिक किड्यांसम फुटले ती गणतीही नाही
सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही
मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही...
धर्म जाहला शाप
पसरले पाप
उरी अंधार दाटला
गिळून घेईल साप
लागुनि धाप
कोवळा जीव फाटला
अणू-रेणूंचा स्फोट होऊनी जळतो आम्ही
देवा आता मनात आशा उरली नाही..
निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रक्तानेही भिजली नाही...

अशा शब्दांमध्ये जितेंद्र जोशीने या क्रूर हल्ल्याचा निषेध केला आहे. 

सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करते. सद्यपरिस्थितीवर जितेंद्र जोशी नेहमीच कवितेच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतो. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील भावना मांडण्याबरोबरच शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भावनाही आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. 

बॉलिवूडच्या कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search