निकीत सुर्वे : अकोले विद्यालयात मानव-बिबट्या संघर्षावर मार्गदर्शन
ट्रॅपिंग कॅमेऱ्याद्वारे हालचालींचा अभ्यास
अकोले, दि. 23 (प्रतिनिधी) - बिबट्याची निर्माण करण्यात आलेली "आदमखोर' ही प्रतिमा अत्यंत चुकीची आहे. माणूस जेवढा बिबट्याला घाबरतो त्यापेक्षा कितीतरी अधिकपट बिबट्या माणसाला घाबरतो, असे नसते तर कुत्र्यांसारखे बिबटे घराच्या अंगणात येऊन बसले असते, असे स्पष्ट प्रतिपादन मुंबई येथील वन्यजीव अभ्यासक निकीत सुर्वे यांनी केले.
येथील अगस्ती महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुर्वे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी वन्यजीव अभ्यासक मृणाल घोसाळकर, संस्थेचे खजिनदार एस. पी. देशमुख, कार्यकारिणी सदस्य आरिफ तांबोळी उपस्थित होते.
राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून मानव-बिबट्या संघर्ष या विषयावर आयोजित या कार्यक्रमात बोलताना सुर्वे म्हणाले की, बिबट्याचा वावर, त्याचे भक्ष्य, स्थलांतर, त्यांच्या विष्ठा या सर्व बाबींचा अभ्यास गेली काही वर्षे सातत्याने करीत आहे. ट्रॅपिंग कॅमेऱ्याद्वारे बिबट्याच्या रात्रीच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. मुंबई येथील संजय गांधी उद्यान व तेथील बिबट्यांचा वावर असलेली ठिकाणे, जुन्नर, डहाणू, अकोले या बरोबरच शिमला या ठिकाणीही असे कॅमेरे बसवून बिबट्यांच्या सर्व हालचालींचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला आहे. यामधून अनेक बाबी समोर आल्या आहेत. बिबट्या हा कुणाच्याही मालकीचा नसतो.
समाजामध्ये बिबट्या हा वनखात्याचा आहे असे समजले जाते. परंतु वनखाते हे फक्त त्याचे रक्षक आहे. बिबट्याने जंगलातच राहावे असे माणसाला वाटत असले तरी बिबट्याला मात्र तसे वाटत नाही. कारण जंगलापेक्षा मानववस्तीत त्याला सहजासहजी खाद्य मिळत असते. त्यामुळेच बिबट्याचा जंगलापेक्षा मानववस्तीकडे वावर वाढला आहे. बिबट्यांना एका ठिकाणी पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडून देण्याने बिबट्याचा होणारा त्रास कमी होणार नाही. त्या बिबट्याची रिकामी झालेली जागा दुसरा बिबट्या भरतच असतो. भक्ष ज्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी तो येणारच हे त्यांनी स्पष्ट केले.
माणसाचा जंगलात वावर वाढला असून परिणामी बिबटे मानव वस्तीकडे वळू लागल्याचेही ते म्हणाले. यावेळी जे.डी.आंबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. संजय ताकटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब मेहेत्रे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन प्रा. दिनेश शेळके यांनी केले. यावेळी प्रा.डॉ. अशोक दातीर, प्रा.के.बी. नाईकवाडी, प्रा.डॉ. महेजबिन सय्यद, प्रा.सुनील घनकुटे, प्रा.डॉ. रंजना कदम उपस्थित होते. शेवटी प्रा.डॉ.एस.एम.सोनवणे यांनी आभार मानले.