Next
‘विमानतळाची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
प्रेस रिलीज
Monday, March 04, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांत असलेल्या विमानतळांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा,’ अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत दिल्या.

दोन मार्च २०१९ रोजी आयोजित या बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘शिर्डी, कोल्हापूर आणि नाशिक येथून सुरु असलेल्या देशांतर्गत विमान वाहतुकीस प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तेथे प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.’ मिहान प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना तसेच अतिरिक्त निधीसही त्यांनी या वेळी मंजुरी दिली. तसेच अमरावती, अकोला, धुळे, कराड, चंद्रपूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विमानतळाच्या विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला. शिर्डी विमानतळावर इंधन साठविण्यासाठी अतिरिक्त जागा देण्यास आणि पुरंदर येथील छत्रपती संभाजी राजे आंतराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. विविध विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जागेचे भूसंपादन, विविध कामांच्या निविदा, अंतर्गत रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युतीकरणाची कामे अशा कामांचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला.

नागपूर येथील मिहान प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अनेक विकासकामांबाबतचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, प्रकल्पबाधित कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान देणे, खापरी आणि शिवणगाव येथील घरांच्या मुल्यांकनाची रक्कम देणे, झुडपी जंगल जमिनीचे निर्वनीकरण, तसेच विविध रस्त्यांची कामे, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याची कामे, विद्युतीकरणाची कामे अशा विविध विकासकामांना या आढावा बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव नितीन करीर, सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. कविता गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search