Next
लेकीचे मित्र
BOI
Sunday, January 28 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आयुष्यात आपल्या मनीचं गुज ऐकायला जशी मैत्रिणींची गरज असते, तशी विचारांचा थांग शोधायला मित्रांचीही. निखळपणे आपल्याला सोबत करणारा दिलखुलास दोस्तही मुलींना हवाहवासा वाटतो. एखादा किंवा एकापेक्षा जास्तही मित्र मुलींना असू शकतात. मित्र आहेत म्हणून लगेच ती काही वाईट होत नाही किंवा तिचा स्वभाव किंवा चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत नाही. निरलस आनंद देणारे, पाठीशी उभे राहणारे, टपल्या मारणारे मित्र असूच शकतात... वाचा ‘हॅशटॅग (##)कोलाज’मध्ये...
..................
मागे एकदा माझ्यासोबत काम करणाऱ्या एका मैत्रिणीने तिचा नवीन आयपॅड दाखवला. उत्सुकतेने तो आयपॅड हाताळत होते. त्याची फीचर्स,  अॅप्लिकेशन्स याविषयी बोलता बोलता सहजच आयपॅडची किंमत विचारली तर ती म्हणाली, ‘पंधरा हजार; पण हे मी नाही घेतलेलं. गिफ्ट मिळालंय.’ माझ्या मनात ‘वॉव’ असं झालं. तेच भाव चेहऱ्यावर होते. शिवाय प्रश्नही, की ‘कोणी दिला’. तिने ते अचूक हेरलं. एका मित्राने दिलाय, असं सांगत तिने आयपॅडचा किस्साच सांगितला.

खूप दिवसांनी तिच्या जिवलग मित्राची अन् तिची भेट झाली. गप्पागप्पांमध्ये, रोज कामानिमित्त रेकॉर्डसाठी कितीतरी पानांची झेरॉक्स काढावी लागते हेही तिने त्याला सहज सांगितलं. तसा तो म्हणाला, ‘अग मग आयपॅड घे ना.. त्यातच  सगळं स्टोअर करता येईल, शिवाय आता आयपॅड काय इतके महाग राहिलेले नाहीत.’ त्यावर तिने, ‘सध्या माझी ऐपत नाही’, असं खट्याळ अन् उडवून लावणारं उत्तर दिलं. तसं तिच्या त्या मित्राने तिला कुठल्याही कारणाशिवाय आयपॅड भेट म्हणून देण्याचं खूळ डोक्यात घेतलं. नुसतं घेतलं नाही तर प्रत्यक्षात तिला तो दिलाच. तिने हा किस्सा सांगितल्यानंतर मी अभावितपणे विचारलं, ‘काय मग, कोणी खास मित्र आहे का?’ या वेळी ‘खास’वर जोर होता हे ओळखून ती म्हणाली, ‘निखळ-बिखळ म्हणतात ना तसा मित्र गं. मित्र म्हणजे मित्रच. बाकीच्या सर्वसामान्य मित्रांपेक्षा थोडा वरचढ इतकंच, पण शेवटी मित्र. आकर्षण वाटावा, सहवास मिळावा असा खरा; पण पुन्हा पुन्हा तेच की नुसता मित्र. बाकी तुझ्या डोक्यातले घोडे ज्या मुद्द्यापासून धावायला सुरू करतात, बरोबर त्याच मुद्द्यावर येऊन आम्ही थांबतो. अशी आमची रिलेशनशिप. गावाकडच्या वातावरणात जगलेल्या माझ्या आईला मित्र, मैत्री हे समाजावणं खूप अवघड गेलं. त्यांना मित्र म्हणजे एकच ठाऊक... ‘यार’ म्हणून; पण हळूहळू रुजवत, बिंबवत नेलं अन आता थोडासा फरक जाणवतो. मग तीच कधीतरी कोणाची तरी आठवण काढत म्हणते, अगं खूप दिवस झाले, तुझा अमुक एक मित्र नाही आला. बोलाव की त्याला या रविवारी जेवायला. तिचा हा बदल खूप सुखावह वाटतो..’

मलाही आठवतंय. सातवी-आठवीची गोष्ट आहे. समीर, माझा वर्गमित्र. चाळीतून जात असताना त्याला मी दिसले. त्याने हाक मारली आणि आम्ही चाळीतच एका बाजूला उभे राहून बोलू लागलो. गप्पा-गोष्टी बराच वेळ रेंगाळल्याने, आईने हाक मारली. विचारलं, तो कोण होता? वर्गमित्र या उत्तरानं तिचं पूर्ण समाधान झालं नाही. उलट तिने यावर मला, ‘मुलांशी रस्त्यात उभं राहून बोलायचं नाही. फारच काही बोलायचं असल्यास आणि मित्र वगैरे असल्यास घरात बसून बोलावं. रस्त्यात बोलणं बरं दिसत नाही. पप्पांनाही ते आवडत नाही (तिला न पटणाऱ्या, आवडणाऱ्या गोष्टी ती सरळ पप्पांच्या नावे ढकलून मोकळी व्हायची, म्हणजे पुढे प्रतिप्रश्न करायला ते समोरच नसायचे)’, अशी धमकीवजा सूचना तिने केली. मीही निमूटपणे मान डोलावली. तिच्या बोलण्याचा रोख, ओघ मला तेव्हाही कळला होता.
 
मुलींचे मित्र आणि प्रश्नचिन्ह.. असं बहुतेक एक समीकरणच  असावं. हे समीकरण बहुतेक मुलींना आपापल्या पद्धतीनं हाताळत घरच्यांच्या मनात त्यासाठी जागा करावी लागते. मुलीच्या मित्राचा स्वीकार करण्याची पालकांची तयारी नसतेच फारशी. एखादी मैत्रीण कशी चटकन घरात येते, रुळते, लेकीची मैत्रीण म्हणून आई-बाबासुद्धा किती जिव्हाळ्याने चौकशी करतात; पण तेच एखाद्या मित्राच्या बाबतीत.. मुळात त्याला घरात येऊ द्यायचं का नाही, इथपासून सुरुवात होते. प्रवेश असला तरी कधी, किती वेळ असं सगळं अलिखित टाइमटेबलच ठरवलेलं असतं. अशा परिस्थितीत त्यांना पालकांकडून जिव्हाळा कमी आणि साशंक नजराच जास्त मिळतात. मला आठवतं, शाळेत असतानाही घरात हे नीट समजावून सांगावं लागायचं, की वर्गातील मुली मैत्रिणी तसे मुले मित्र. इतकं साधं सरळ. आईला ते फारसं अमान्य नसायचं (मनोमन पटलेलंही असायचं) पण पूर्णपणे नाहीच. त्यांच्या दृष्टीने मित्र म्हणजे ‘कोणीतरी खास’. या ‘खास’ची पण गंमतच. एखादा खास मित्र म्हटलं तरी त्यांच्या भुवया उंचावायच्या. 

त्यांच्या दृष्टीने खास म्हणजे एकच... ‘बीएफ’. मग पुन्हा एकदा उजळणी घ्यावी लागायची, खास म्हणजे इंग्रजीत ‘बेस्ट’ म्हणतो ना ते. माझ्या घरच्यांच्या नशिबाने मी फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यामुळे मित्रांचा प्रश्न मुळातच मार्गी लागलेला होता. तरीही शाळेतील, चाळीतील, ओळखीतून झालेले काही मित्र असायचेच. अगदी चांगले मित्र वगैरे कॅटेगरीत मोडणारे नसले, तरी मित्रच. तरुणपणाची वाटेकरी होऊ लागल्याने मग त्यांच्याशी कधी रस्त्यात बोलताना उभे राहिलो की मग आजी, काका सगळेच हटकायचे. ‘बेटा घर चलो, देर हो रही है’ नाहीतर ‘घरपे बाते करो’ अशा प्रेमळ हाका यायच्या. त्यांना नेमकं काय म्हणायचंय, हे मित्र आणि मी दोघेही समजून घ्यायचो आणि मग कलटी मारायचो. यातही गंमत अशी असायची, की आईबाबा, आजी-आजोबा, काका-काकू असं सगळ्यांना दाखवायचं असायचं, की अगं आमचा तुम्हा मुलांवर विश्वास आहे. तुम्ही वावगं काहीच वागणार नाही, याशिवाय आम्ही पण ‘मॉडर्न’ आहोत. मुली-मुले बोलले तर काय बिघडलं असा आव असायचा आणि सेम टाइम जाबही विचारायच्या अशी दुटप्पी वागणूक.

बीएस्सी झाल्यानंतर ‘एमए’च्या शिक्षणाला सुरुवात झाली. विद्यापीठात को-एड. मग रोज रोज भेटीतून, शेअरिंगमधून चांगले मित्रही गवसू लागले होते. आई चांगली मैत्रीण असल्याने तिच्याशी वेगवेगळ्या गोष्टींचं शेअरिंग असायचं. त्याचप्रमाणे कळत-नकळत घरी मैत्रिणींसारखंच मित्रांविषयीही बोलू लागले होते. तसं माझ्या घरी फार काही हिटलरी पद्धतीचं वातावरण नव्हतं. मुले चालणार नसली, तरी अगदीच वर्ज्य नव्हती. शिवाय लहानपणापासूनच पालक जसे वेगवेगळ्या मुद्द्यांवर माझा ‘क्लास’ घ्यायचे, तशीच मीसुद्धा नव्या जमान्यातील गोष्टी त्यांना पटणाऱ्या भाषेत सांगायचे. वेगवेगळ्या पद्धतीने आमची उजळणी सुरू असायचीच. कॉलेजातील मित्रांविषयी सांगताना, त्यांची परिस्थिती, त्यांची हुशारी, त्यांचा अभ्यास, त्यांचं आकलन, समज याविषयी हळूहळू आईला कळू लागलं. मित्र-मैत्रिणींचं नातं नीटपणे त्यांना उलगडावं म्हणून मग सरळ त्यांना घरीच बोलावू लागले. वंदनासुद्धा मित्रांना थेट घरीच घेऊन जायची. सेम माझ्यासारखंच. ईदनिमित्त, वाढदिवसानिमित्त त्यांचं येणं वाढलं. मग तेही घरी अगदी शहाण्या मुलांसारखे वागायचे. तरी मस्ती करण्याची उर्मी काही सोडू शकायचे नाहीत. मग उगीच कशावरून तरी आलेल्या मैत्रिणींना छेडायचं. उचकवायचं. त्रास द्यायचा आणि इतकं करूनही पुन्हा काळजी, जिव्हाळ्याने राहायचं हे घरात आईसह सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागलं. हळूहळू तर त्यांनी मोकळा एकांतच द्यायला सुरुवात केली. आमचं काय काय चालायचं यात त्यांचा डिस्टबर्न्स नसायचा. उलट पप्पांनाही सूचना असायची, ‘त्यांचं ते बघून घेतील, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.’ घरातूनच अशी हेल्दी मोकळीक मिळाली की नाती आणखी बहरतात.

एकदा ऑफिसच्या वारीत पायाचा छोटासा अॅक्सिडेंट झाला, तेव्हा एक  मित्र घरी सोडायला आला. आठ दिवसांनी डॉक्टरांकडे जायचं होतं. तेव्हा घरापासून जवळ राहणारा दुसरा एक मित्र सकाळी सकाळी आला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पहिला मित्र तिथे वाटच पाहत होता. दोघांनी मस्त काळजी घेतली. त्या मित्राने पुन्हा घरी आणून सोडलं. २५ किलोमीटरचं हे अंतर त्याने माझ्यासाठी पार केलं होतं. त्यानंतर पुन्हा १३ किलोमीटरची चाकमोड (पायमोडसारखं गाडीच्या बाबतीत चाकमोड) करून ऑफिसला जाणार होता. या सगळ्या प्रक्रियेतील समंजसपणा, आस्था घरच्यांना नीटपणे उमगत होती. असे कितीतरी किस्से घडले. आश्वस्त करणारे मित्र किती जरूरीचे, हे न सांगता त्यांनी समजून घेतलं. मग शंका घेण्याचं प्रमाण घटायला लागलं. लेकीच्या मित्रांविषयीच्या प्रश्नचिन्हाचं समीकरण त्यांच्यापुरतं सुटू लागलं, तसं तेही निर्धास्त झाले.

‘मित्र, मित्र असतात गं’, हे घरच्यांच्या कानातून मनात उतरवताना खूप चिकाटी अन सातत्य ठेवावं लागलं. आयुष्यात आपल्या मनीचं गूज ऐकायला जशी मैत्रिणींची गरज असते, तशी विचारांचा थांग शोधायला मित्रांचीही. निखळपणे आपल्याला सोबत करणारा दिलखुलास दोस्तही मुलींना हवाहवासा वाटतो. एखादा किंवा एकापेक्षा जास्तही मित्र मुलींना असू शकतात. मित्र आहेत म्हणून लगेच ती काही वाईट होत नाही किंवा तिचा स्वभाव किंवा चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत नाही. निरलस आनंद देणारे, पाठीशी उभे राहणारे, मस्ती करणारे, टपल्या मारणारे, शिव्या घालणारे मित्र असूच शकतात, हे मग हळूहळू घरी पटू लागलं. मित्रांची जागा उमगायला लागली. तशी उलटतपासणीसुद्धा थांबली आणि मित्रांसाठी घराचे दरवाजे कायमचे उघडले, अर्थात टाइमटेबल सोडून..

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सायली जोशी About 18 Days ago
खूप मस्त हिना
1
0
chandrakant About 23 Days ago
happy
1
0
Bhagyashree jadhav About 24 Days ago
Nice article
1
0
Prakash Gupta About 25 Days ago
Nice msg to all friends and thanks
1
0
Deepa Pillay pushpakanthan About 25 Days ago
Khup chan
1
0

Select Language
Share Link