Next
विद्यार्थ्यांनी जोडले ‘अभिनव’ बंध
BOI
Thursday, August 09, 2018 | 12:08 PM
15 0 0
Share this story

मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना फ्रेंडशिप बँड बांधताना अभिनव एज्युकेशन सोसायटीमधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थी.पुणे : येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीमधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी नुकताच झालेला फ्रेंडशिप डे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी मैत्रीचे आणि प्रेमाचे बंध जोडत एक नवी सुरुवात करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

मित्र म्हटले की आपल्या डोळ्यासमोर शाळेतील किंवा कॉलेजमधील मित्र येतात; पण आपल्या आयुष्यात या सर्वांच्या आधी आलेल्या मित्राला मात्र आपण नकळतपणे विसरतो. ते मित्र म्हणजे आपले आजी-आजोबा. खरे तर आजी-आजोबाच आपले सर्वात पहिले मित्र असतात; मात्र जसे जसे आपण मोठे होतो तसे नवीन मित्र मिळत जातात आणि आईचा ओरडा खाण्यापासून वाचवणाऱ्या, आपल्या चुकांवर हळूच पांघरुण घालणाऱ्या, बागेत फिरायला घेऊन जाणाऱ्या, हातात खाऊची पुडी ठेवणाऱ्या या मित्रांचा आपल्याला विसर पडत जातो. अभिनव कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी याच आजी-आजोबांशी पुन्हा गट्टी करत त्यांना खऱ्या अर्थाने मैत्रीच्या बंधनात बांधले आहे.

उतारवयाकडे झुकताना वृद्ध माता-पित्यांना आपल्या हाताशी आलेल्या मुलांच्या आधाराची गरज असते; मात्र आधाराचे हेच हात जेव्हा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात तेव्हा इतर कोणत्या नात्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा उरत नाही. अभिनव कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मात्र मनाची संवेदनशीलता जपत समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. मैत्री दिनानिमित्त अशाच नि:स्वार्थी नात्याची सुरुवात त्यांनी केली आहे.

मैत्रीमध्ये मित्रांची सुख-दु:खे, त्यांच्या भावना हे समजून घेणे महत्त्वाचे असते. मैत्रीचे हे मर्म जाणून घेत विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-अजोबांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांची सुख-दु:खे जाणून घेतली. आपल्या या छोट्या दोस्तांना बघून आजी-आजोबा देखील खुश झाले. त्यांच्यामध्येच आपल्यापासून दुरावलेल्या नातवंडांचा शोध घेत त्यांचे मनसोक्त लाड केले. त्यांनी केलेल्या मैत्रीच्या बदल्यात आजी-आजोबांकडून त्यांना मिळालेल्या नि:स्वार्थी प्रेमाने हे विद्यार्थी देखील भारावून गेले आणि मैत्रीचे हे नाते कायम टिकवून ठेवण्याचा संकल्प या विद्यार्थ्यांनी या वेळी केला; तसेच आपल्या आई-वडिलांना वृध्दाश्रमात सोडू नका. त्यांना तुमच्या आनंदात मिळणारा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असा संदेशही दिला.

(मातोश्री वृद्धाश्रमात साजऱ्या झालेल्या आगळ्या वेगळ्या फ्रेंडशिप डेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link