Next
मातंग समाजाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज
BOI
Thursday, September 20, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this article:

नव्या पिढीतील एक लोकप्रिय लेखक म्हणून प्राध्यापक डॉ. सोमनाथ डी. कदम यांना ओळखले जाते. समाजाच्या तळागाळातील लोकांचा वंचित इतिहास तसेच सामाजिक, आर्थिक प्रश्न मांडणारे संशोधनपर लेखन हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य. ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच कोल्हापूर येथे प्रकाशन झाले. या पुस्तकाविषयी...
.................
विद्यार्थिदशेपासून चळववळीत वाढलेले लेखक सोमनाथ कदम यांचे लेखन चळवळीला बळ देणारे आहे, म्हणूनच त्यांना वाचकांचे उदंड प्रेम मिळते. आजपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकांतून त्यांचे सुमारे ३०पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले असून, ‘प्रबोधनाचे वारसदार’ (२०१२), ‘मातंग समाजाचा इतिहास’ (२०१६) या प्रसिद्ध अशा ग्रंथानंतर त्यांच्या ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच कोल्हापूर येथे थाटात प्रकाशन झाले. डॉ. सोमनाथ कदम यांच्या ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथास ‘फुले-आंबेडकर विचार प्रसारक संस्था, पुणे’चा ग्रंथोत्तेजक पुरस्कार (२०१७), तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा वैचारिक साहित्यासाठी दिला जाणारा फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार मिळाला आहे. 

‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा मानावा लागेल. कारण येथील समाजरचनेत आणि जातिव्यवस्थेत एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते व स्वत:ला इतरांपेक्षा उच्च मानते. त्यामुळे जातीय दुरभिमानाच्या दुर्धर रोगातून भारतीय समाजमन अजूनही रोगमुक्त झालेले नाही. महार आणि मांग या दोन जाती भारतीय समाजव्यवस्थेत महत्त्वाच्या जाती आहेत. या दोन्ही जाती स्वत:ला एकमेकांपेक्षा उच्च समजतात. यातून या दोन जातींत पारंपरिक वैरभाव आहे. हा वैरभाव अनेक पातळ्यांवर डोके वर काढतो, तेव्हा जातीयव्यवस्थेचे फावते आणि नुकसान मात्र या दोन्ही समाजांचे होते; मात्र हे या दोन्हीही समाजांच्या लक्षात येत नाही. डॉ. कदम यांनी ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या आपल्या पुस्तकातून इतिहासाचे दाखले देत या दोन्ही समाजाला वास्तवाचे भान आणून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

मातंग समाजातील अनेक विचारवंत मातंग समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसत असले, तरी अनेक विचारवंत हे या समाजाला आंबेडकरवादी विचारधारेपासून अलिप्त ठेवून हिंदुत्ववादी परंपरेशी जोडतात. आपल्या शुद्ध स्वार्थासाठी ते संपूर्ण समाजाची दिशाभूल करून या दोन समाजात वैचारिक आणि सांस्कृतिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अशा विपर्यासापासून मातंग समाज दूर राहावा, आपला खरा इतिहास त्याच्या लक्षात यावा आणि त्यातून मातंग समाज सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होऊन तो आंबेडकरवादी चळवळीशी जोडला जावा. इतकेच नव्हे, तर आंबेडकरी चळवळ हीच मातंग समाजाच्या उद्धाराची खरी चळवळ होऊ शकते याची ऐतिहासिक पुराव्यांद्वारे मांडणी करण्याचे महत्त्वाचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक सोमनाथ कदम यांनी केले आहे.

सोमनाथ कदम हे मुळातच इतिहासाचे अभ्यासक असल्याने, इतिहासाचे समाज विकासातील आणि समाज बांधणीतील स्थान काय आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव असल्याने इतिहासाच्या आकलनातून समाजाला विचार प्रवृत्त करण्यासाठी इतिहासाला साधन म्हणून वापरण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखर स्तुत्य असाच आहे. या ग्रंथापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘प्रबोधनाचे वारसदार’ आणि ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथाद्वारेही त्यांनी याचा प्रत्यय दिलेला आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून डॉ. सोमनाथ कदम यांनी मातंग समाजाचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहास अतिशय वास्तवदर्शी स्वरूपात मांडला आहे. विसाव्या शतकातील मातंग समाजाचे चित्र उभे करताना, तत्कालीन समाजाचा आजच्या स्थितीत अभ्यास करताना, तत्कालीन परिस्थितीचा त्या समाजावर झालेला बरा-वाईट परिणाम अभ्यासताना, तत्कालीन समाजाच्या भूमिकांचा अन्वयार्थ लावताना, इतिहासाकडे समाजउत्थानाचे साधन म्हणून बघण्याची जी एक तटस्थ आणि दूरदृष्टी इतिहासकाराकडे असावी लागते, ती सोमनाथ कदम यांच्याकडे नक्कीच आहे, त्याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना पानोपानी येतो.

मातंग या शब्दाची उत्पत्ती, त्या शब्दाचा अर्थ, त्यांचा प्राचीन धर्म, त्यांची राज्ये अशी मातंग समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी पहिल्या प्रकरणात नमूद केलेली आहे. यातून मातंग समाजाला व वाचकालासुद्धा मातंग समाजाचा इतिहास लक्षात येतो. ब्रिटिशकालीन मातंग समाजाच्या स्थितीगतीचा आढावा लेखकाने दुसऱ्याध प्रकरणात घेतलेला आहे. त्यात त्यांनी ब्रिटिशांचा या समाजाबद्दलचा दृष्टिकोन विशद केलेला आहे. ब्रिटिश काळातील या समाजाची शैक्षणिक, आर्थिक स्थिती, त्याला जबाबदार असलेले सामाजिक, राजकीय घटक, १८५७च्या बंडातील तसेच स्वातंत्र्य संग्रामातील मातंग समाजाचा सहभाग, मातंग समाजासह अस्पृश्यांची धर्मांतरे यांचा ऊहापोह केलेला आहे. त्याचबरोबर फकिरा या ऐतिहासिक चरित्रावरही प्रकाशझोत टाकलेला आहे. 

ब्रिटिश काळातच १९२०नंतर भारतात आंबेडकरवादी चळवळीचा उदय झाला आणि विस्तारही झाला. तत्पूर्वीच्या मातंग समाजाच्या स्थितीगतीचा लेखाजोखा लेखकाने ‘आंबेडकरपूर्वकालीन मातंग समाज’ या प्रकरणात घेतला आहे. या प्रकरणात डॉ. सोमनाथ कदम यांनी क्रांतिवीर लहूजी साळवे, क्रांतिबा फुले, मुक्ता साळवे, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, श्री. म. माटे यांच्या मातंग समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या वैचारिक आणि सुधारणावादी प्रयत्नांचा सर्वंकष आढावा घेतलेला आहे. मातंग समाजातील विविध नेतृत्व आणि त्या समाजाच्या सामाजिक सुधारणेसाठीच्या चळवळी यांचाही समावेश लेखकाने या प्रकरणात केलेला आहे.

‘आंबेडकरकालीन मातंग समाज’ या प्रकरणात लेखकाने आंबेडकरवादी चळवळीत मातंग समाजाचा सहभाग यावर चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत मातंग समाजाचा सहभाग, आंबेडकरांनी मातंग समाजाला केलेला उपदेश, त्यांच्यातील नेतृत्वगुणांची केलेली कदर आणि त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी याचबरोबर महार-मांग संघर्षाचे स्वरूप, वास्तव आणि समन्वय यांचा परामर्श घेतला आहे.

‘स्वातंत्र्योत्तर मातंग समाज’ आणि ‘समकालीन वास्तव आणि दिशा’ या दोन स्वतंत्र प्रकरणांतून लेखकाने मातंग समाजाच्या सद्यकालीन स्थिती आणि चळवळीचा आढावा घेतला आहे. या ग्रंथातून सोमनाथ कदम यांनी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा इतिहास मांडत असताना वर्तमानकाळातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्थानाच्या प्रश्नांना आणि वास्तवालासुद्धा हात घातला आहे. मातंग समाजाच्या सद्यकालीन स्थितीगतीचा विचार करताना लेखक मातंग समाजाला आंबेडकरवादी चळवळीशी जोडून घेण्याचा सल्ला देतो. मातंग समाज केवळ भौतिक प्रगतीनेच नाही, तर आंबेडकरवादी विचारांच्या चिंतनातून योग्य दिशेने पुढे जावा आणि विसाव्या शतकात मातंग समाजाची चळवळ, स्थितीगती समजून घ्यावी, या उद्देशाने लेखकाने हा लेखन प्रपंच केला आहे.

भारतातील अस्पृश्य, दलित इतकेच नाही, तर परिवर्तनवादी चळवळीचा इतिहाससुद्धा एकांगी आणि पक्षपाती पद्धतीने लिहिला गेला आहे. त्यामुळे भारतात इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन अनेक इतिहासकारांनी आता हे काम आरंभलेले आहे. ‘सबाल्टर्न हिस्ट्री’ ही इतिहासाची शाखा त्यातूनच पुढे आलेली आहे. भारतातील अस्पृश्य, दलित, पुरोगामी तसेच आंबेडकरवादी इतिहासाची पुनर्मांडणी करताना अनेक अडचणीसुद्धा आहेत. इतिहासाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. अशाही परिस्थितीत चिकाटीने काही लोक ही साधने उपलब्ध करून इतिहास लेखनात-पुनर्लेखनात गुंतलेले आहेत. हे अतिशय जिकरीचे आणि जोखमीचे काम आहे. डॉ. सोमनाथ कदम यांनी मातंग समाजाच्या इतिहास लेखनाची ही जोखीम पत्करलेली आहे, त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. इतिहासाची अधिकाधिक अस्सल साधने हाताळून त्यांनी मातंग समाजाच्या आणि चळवळीच्याच नव्हे तर संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहास लेखनात मोलाची भर टाकावी ही अपेक्षा आहेच. 

या ग्रंथातील काही भागाची, उदा. लहूजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे, श्री. म. माटे, महर्षी शिंदे यांच्या मातंग समाजाच्या सर्वंकष उत्थानाच्या प्रयत्नांची ऐतिहासिक कसोट्यांवर अधिक चिकित्सा होणे अपेक्षित आहे. इतिहास हे एकाच वेळेस स्वतंत्र शास्त्रही आहे आणि ते समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींच्या अभ्यासाचे साधनही आहे, व्यवस्था बदलाच्या हत्याराला धार लावण्याची सहानसुद्धा आहे. जर लेखक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श म्हणून स्वीकार करत असेल, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीचाही अभ्यास करणे निकडीचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास लेखनाच्या माध्यमातून गुलामांना त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचीच नव्हे, तर त्यांच्या गुलामीचीही जाणीव करून दिली, ही गुलामगिरी त्यांच्या पदरी का आली, याचे भानही करून दिले. या इतिहासबोधातून जे भानावर आले आहेत त्यांनी आपला सर्वांगीण विकास करण्यात कुठलीही कसर ठेवलेली दिसत नाही. 

आज मातंग समाज पुन्हा या गुलामगिरीच्या चक्रात अडकू पाहतो आहे. केवळ आर्थिक सुबत्ता यावी, यासाठीच प्रयत्नशील आहे. बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या विचारांत आपला उत्कर्ष शोधण्याऐवजी लहूजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे यांच्याच अस्मिता जोपासत आहे. डॉ. सोमनाथ कदम यांनी या समाजाला हे इतिहासभान देण्याचे काम हाती घेतले आहे त्यासाठी त्यांच्या या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. केवळ मातंग समाजानेच नव्हे, तर पूर्वाश्रमीच्या महार समाजाने आणि परिवर्तनाच्या चळवळीतील सगळ्यांनीच डॉ. सोमनाथ कदम यांची सामाजिक विकासाची तळमळ समजून घ्यावी आणि मातंग समाजाने सनातन, वैदिक संस्कृतीच्या मागे फरफटत न जाता सोमनाथ कदम या ग्रंथात ज्या इतिहासाचा दाखला देत आंबेडकरवादी चळवळीशी जोडून घेण्याची तळमळ व्यक्त करतात 

पुस्तक : विसाव्या शतकातील मातंग समाज 
लेखक : डॉ. सोमनाथ कदम
प्रकाशन : संवाद प्रकाशन प्रा. लि., कोल्हापूर
पृष्ठे : १४३
मूल्य : १५० रुपये
ई-मेल : kadamsomnath78@gmail.com
मोबाइल : ९४२३७ ३१३८२, ७७०९ २९१३८२

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search