Next
गुंतवणूक सेक्टर फंडातील...
BOI
Saturday, September 01, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांची माहिती घेताना सेक्टर फंड हा एक पर्याय दिसून येतो. हा पर्याय कसा आहे आणि त्यात गुंतवणूक करावी का, याबाबत माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात.....
....
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जेव्हा एका ठरावीक उद्योग व्यवसायातील कंपन्यांमध्येच केली जाते, तेव्हा अशा फंड्सना ‘सेक्टर फंड’ असे म्हणतात. उदा. : आयटी सेक्टर फंडातील गुंतवणूक केवळ टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, माइंड ट्री इत्यादींसारख्या केवळ आयटी कंपन्यांतच केली जाते, तर बँकिंग सेक्टर फंडातील गुंतवणूक स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, अशा बँकांमध्ये किंवा एखाद्या वित्तीय संस्थेतच केली जाते. अन्य म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक विविध क्षेत्रांतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाते.

सध्या आपल्याकडे प्रामुख्याने पुढील सेक्टर फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.
- बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड 
- इन्फ्रास्ट्रक्चर फंड
- फार्मा व हेल्थ केअर फंड
- टेक्नॉलॉजी (आयटी) फंड
- एनर्जी आणि पॉवर फंड

आयटी कंपन्या जेव्हा मोठ्या प्रमाणावर नफा कमवत होत्या, त्या वेळी टेक्नॉलॉजी (आयटी) फंडातील गुंतवणूक ४० ते ४२ टक्के इतका घसघशीत परतावा देऊन गेली. यामुळे बऱ्याच जणांनी यात गुंतवणूक केली; मात्र या क्षेत्रात जेव्हा समस्या सुरू झाल्या, तेव्हा हा रिटर्न केवळ दोन ते तीन टक्क्यांवर आला. साधारणपणे अशीच स्थिती वर उल्लेखलेल्या फंडांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने दिसून येते. यामुळे अशा फंडांत गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न साहजिकच सामान्य गुंतवणूकदाराला पडतो.

ज्यांना दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यांच्यासाठी हा पर्याय निश्चितच उपयुक्त नाही. कारण यासाठी योग्य फंड आणि तोही योग्य वेळी निवडणे आवश्यक असते. ते तितक्या सहजपणे करणे शक्य नसते. कारण यासाठी संबंधित सेक्टरचे पुरेसे ज्ञान आणि त्याचबरोबर या सेक्टरमधील चढउताराबाबत अचूक अंदाज असणे आवश्यक असते. त्यानुसार अशा फंडात गुंतवणूक करणे आवश्यक असते. संबंधित क्षेत्राशी दैनदिन संपर्कात असणाऱ्याला ते सहज शक्य होऊ शकते. इतरांना हे जमेलच असे नाही. सेक्टर फंडातील गुंतवणुकीत अस्थिरता (व्होलॅटॅलिटी) जास्त प्रमाणात असते व यामुळे जोखीम (रिस्क) जास्त असते. त्यामुळे मुद्दल सुरक्षितता कमी होते. 

यातील गुंतवणुकीचे फायदे व तोटे काय आहेत, हे पाहू.

जेव्हा एखादा सेक्टर तेजीत असतो, मात्र नेमकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी निवडायची याबाबत संभ्रम असतो, अशा वेळी सेक्टर फंडातील गुंतवणूक सोयीची व फायदेशीर ठरू शकते. उदा. : सध्या ‘एनपीए’मुळे बँकिंग क्षेत्रात नकारात्मक वातावरण आहे. याचा परिणाम बँकांच्या शेअर्सवर झाला आहे. नव्याने झालेल्या कायदेशीर तरतुदीमुळे नजीकच्या काळात बँकांची थकित कर्जे मोठ्या प्रमाणावर एकमुठी वसूल होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी संबंधित बँकांच्या शेअर्सचे भाव वाढण्याची शक्यताही वाढली आहे. अशा वेळी ‘बँकिंग सेक्टर फंड’मधील गुंतवणूक एखाद्या विशिष्ट बँकेच्या शेअर्समधील गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरू शकेल. कारण अशा बँकेची पुरेशी माहिती असेलच असे नाही; मात्र बँकिंग सेक्टरबाबत निश्चितच सकारात्मक बदलाची शक्यता मोठी आहे.

असे असले तरी अशा गुंतवणुकीचे काही तोटेही आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे आपली गुंतवणूक केवळ एकाच सेक्टरपुरती मर्यादित होते. त्यामुळे आणि यातील अस्थिरतेमुळे गुंतवणुकीतील जोखीम वाढते. 

अशा गुंतवणुकीची अचूक वेळ साधता येणे आवश्यक असते; मात्र ते काहीसे अवघड असते व ते चुकण्याचीच शक्यता जास्त असते. वरील सर्व बाबींचा विचार करता असे म्हणता येईल, की आपल्याला एखाद्या सेक्टरबाबत पुरेशी माहिती असेल किंवा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केलेली सेक्टर फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, अन्यथा यातील गुंतवणुकीपासून दूर राहिलेलेच बरे.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search