Next
शिवाजी विद्यापीठाचा एनडीज् आर्ट वर्ल्डसोबत सामंजस्य करार
BOI
Friday, July 12, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : ‘चित्रपटसृष्टीला विविध २८ प्रकारच्या कलाकौशल्यांची गरज असते. या सर्व कलाप्रकारांत कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाला संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलादिग्दर्शक तथा खालापूर (मुंबई) येथील एनडीज् आर्ट वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष नितीन चंद्रकांत देसाई यांनी येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि एनडीज् आर्ट वर्ल्ड यांच्यामध्ये विविध कौशल्य विकास व प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जुलैला सामंजस्य करार झाला. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठाशी केलेला हा सामंजस्य करार केवळ पुस्तकी स्वरूपाचा नाही, तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह काम शिकवून तयार करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रतेची अगर वयाचीही अट असणार नाही. ज्या कोणाला आपल्याकडील उपजत कौशल्यांचा विकास करायचा आहे किंवा एखादे कौशल्य शिकून त्यात करिअर करण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला इथे प्रशिक्षणाची संधी देण्यात येईल. या कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच; मात्र त्यांच्यातून पुढे एखादा लघुउद्योजक अगर व्यावसायिकसुद्धा निर्माण होईल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूरच्या कलाकारांमध्ये तशी क्षमता निश्चितपणे आहे.’ 

‘सुमारे ३३ वर्षांचा कलादिग्दर्शनासह चित्रपट क्षेत्रातला अनुभव गाठीशी बांधून दोन वेळा ऑस्करविजेत्या ऑलिव्हर स्टोन यांचा एक प्रकल्प आवश्यक सुविधांअभावी भारताऐवजी मोरोक्कोला गेल्यानंतर मोठ्या जिद्दीने एनडी स्टुडिओ निर्माण केला. या स्टुडिओमुळे परिसरातल्या २७ गावांतील तरुण-तरुणींना अनेक प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात यश आले. कोल्हापूरच्या मातीत प्रचंड कस आहे आणि मुलामुलींत भरपूर कला आहे, त्यामुळे या परिसरातून तर कलाकारांची मोठी फौजच आपण निर्माण करू शकतो,’ असे देसाई यांनी सांगितले. 

‘बाबूराव पेंटर यांनी पहिला स्वदेशी कॅमेरा याच भूमीत बनविला. त्यांच्यासह भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. त्यांना इथल्या कुशल, प्रयोगशील कलाकारांची आणि मनुष्यबळाची मोठी साथ लाभली. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये कोल्हापूरची स्वतंत्र अशी ओळख आहे. विद्यापीठाने ही ओळख वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या साथीने कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या ऊर्जितावस्थेसाठी काम करण्यास एनडी स्टुडिओला अतिशय आनंद वाटत आहे,’ असे देसाई यांनी नमूद केले. 

‘या चित्रनगरीच्या प्रकल्प विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. त्यावर शासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. एखाद्या ठिकाणी चित्रपट निर्माण करण्यासाठी लोकेशन, लोक आणि चांगले भोजन या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोल्हापूर या तीनही बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. त्यामुळे येथे चित्रपट निर्मितीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. केवळ चित्रनगरीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर केवळ बांधकामे करून भागत नाही, तर त्यामध्ये आत्मा फुंकावा लागतो. शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास अवघ्या दोन वर्षांत इथल्या चित्रनगरीचा जागतिक दर्जाचा विकास केल्याखेरीज राहणार नाही. म्हणूनच कर्जतनंतर महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचे पुढील डेस्टीनेशन म्हणून मी कोल्हापूरकडे मोठ्या आशा-अपेक्षेने पाहतो आहे. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत राहीन,’ अशी ग्वाही देसाई यांनी या वेळी दिली.

या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘नितीन देसाईंसारख्या महान कलाकाराच्या कष्टातून साकारलेल्या संस्थेबरोबर सामंजस्य करार करीत असताना विद्यापीठाला अतिशय आनंद होत आहे. विविध २८ प्रकारची कौशल्ये केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे आणि मनोरंजनाचे रूपांतर रोजगारात करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. पुढे त्यातूनच कलेचे रूपांतर व्यवसायात करणेही शक्य होणार आहे. आज कोणाही उद्योजक-व्यावसायिकाला प्रशिक्षण देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे ‘जॉब-रेडी’ मनुष्यबळ घडविण्याचे काम याद्वारे साध्य होईल.’

या प्रसंगी सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि नितीन देसाई यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी कोल्हापूरचे उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search