Next
डॉ. गायकवाड यांना ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार
BOI
Thursday, December 28, 2017 | 06:09 PM
15 0 0
Share this article:

डॉ. महेश गायकवाड यांना ‘प्रकाशाचं बेट’ पुरस्कार प्रदान करताना तेर पॉलिसी सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विनिता आपटेपुणे : पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तेर पॉलिसी सेंटर या संस्थेकडून दर महिन्याला दिला जाणारा ‘प्रकाशाचे बेट’ हा पुरस्कार या महिन्यात वटवाघळांच्या संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. महेश गायकवाड यांना संस्थेच्या अध्यक्ष डॉ. विनिता आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. गायकवाड एक हरहुन्नरी व वेगळी वाट निवडणारा तरुण असून, महाविद्यालयीन शिक्षणानंतर काहीतरी वेगळे करायची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच त्यांनी वटवाघळांवर संशोधन करून त्यातच डॉक्टरेट मिळवली. आज सगळ्याच पशुपक्ष्यांच्या अधिवासावर मानवाने केलेले आक्रमण व त्यातून निसर्गावर आलेले संकट याचा प्रसार व प्रचार करण्याचे काम ते करत आहेत. आदिवासी व विद्यार्थी यांना हाताशी धरून कित्येक वटवाघळांना त्यांनी जीवनदान दिले आहे.

या वेळी डॉ. गायकवाड म्हणाले, ‘वड किंवा औदुंबराच्या झाडावर मोठी फळे लटकलेली असावीत असे वाटावे अशी वटवाघळे लटकलेली असतात. एका वृक्षावर जवळपास ६०० ते ७०० वटवाघळांची वस्ती असते. अशा अनेक वसाहती आता नष्ट झालेल्या आहेत. मुळातच मानवाला इजा न करणारा वटवाघूळ हा सस्तन प्राणी असून, तो मानवाला मदत करणारा आणि निसर्गसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे. दिवस दिवस गुहेत लपून किंवा झाडावर लटकून रात्री एखाद्या पहारेकऱ्यासारखा पहारा देणारा हा प्राणी अनेक अंधश्रद्धांची शिकार झाला आहे.’

‘वटवाघळे मानवाच्या डोक्यावर हल्ला करतात, असा समज आहे; परंतु मानवाच्या डोक्याचा घेतलेला वेध हा हल्ला करण्याच्या उद्देशाने नसून फक्त डोक्यावर घोंघावणाऱ्या माशा, डास व किडे खाण्याच्या उद्देशाने वटवाघूळ डोक्यावर येते. जगामध्ये फक्त दोन ते तीन जाती या रक्तपिपासू वटवाघळांच्या असतात आणि त्याही अमेरिकेमध्ये सापडतात. एरव्ही अंधाऱ्या ठिकाणी वस्ती असलेला हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र तर आहेच, शिवाय त्याच्या खाण्याच्या सवयीतून व विष्ठेतून पडलेल्या बिया, पंखांना चिकटलेले परागकण यामुळे नवनिर्मितीची प्रक्रिया सहजपणे होऊन जाते. काही देशांमध्ये वटवाघूळ दिसणे आजही शुभ  मानले जाते. आपल्याकडे मात्र अंधश्रद्धेने त्यांचा बळी घेतला जातो,’ असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

(‘वटवाघळांचे डॉक्टर’ अशी ओळख असलेल्या डॉ. महेश गायकवाड यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेली प्रेरणादायी गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search