Next
शिवाजी विद्यापीठाचा तमिळ विद्यापीठ, सरस्वती महाल ग्रंथालयाशी सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

तंजावर येथील शिलालेखांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि डॉ. अवनीश पाटीलकोल्हापूर : तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांच्याशी यशस्वीपणे चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या संदर्भात नुकतीच विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.

तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील ४० हजारांहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले असून, या विद्यापीठाकडून मोडी कागदपत्रांचे भाषांतर कार्यही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाशी तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या विचाराधिन होता. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये बैठक झाली. 

तंजावर येथे आयोजित बैठकीत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत मान्यवर.या बैठकीमध्ये या सर्व मुद्यांसह तंजावरला मराठी अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठात तमिळ अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. शिवाय, शिवाजी विद्यापीठ नवे म्युझियम साकारत असून, यात तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा या वेळी झाली. सरस्वती महल ग्रंथालयातील उपलब्ध अभ्यास साधनासंदर्भात तंजावरचे जिल्हाधिकारी ए. अण्णादुराई यांच्यासमवेतही स्वतंत्र बैठक झाली.

दोन्ही बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या बैठकांना तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम्, कुलसचिव मुथ्थूकुमार यांच्यासह तमिळ विद्यापीठातील डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. जयकुमार, डॉ. कविता, डॉ. शीला, डॉ. नीलकंठ हे भारतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक, तर शिवाजी विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समिती सदस्य डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. निलांबरी जगताप आणि गणेश नेर्लेकर-देसाई उपस्थित होते.

मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे महत्त्व
तमिळनाडूतील तंजावर येथे ३५० वर्षांपूर्वी इ.स. १६७६ला मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. शहाजीराजेंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी यांनी हे राज्य स्थापन केले. तेव्हापासून ब्रिटीशांनी १८५५ ला संस्थान खालसा करेपर्यंत तेथे मराठा अंमल होता. या जवळजवळ २०० वर्षांमध्ये ११ राजांनी राज्यकारभार केला. त्यांच्या कारकिर्दीत तेथे मराठी संस्कृती रुजली. मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे राज्य हा एक महत्त्वाचा भाग असून, तंजावरच्या अभ्यासाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे तंजावर राजघराण्याचे हजारो पेपर्स, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, शिल्पे, चित्र, शिलालेख, ग्रंथ अभ्यासणे हे मराठा इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे.

तंजावरच्या राजांनी साहित्य, नाट्यकला, चित्रकला, मराठी संस्कृतीतील भजन, कीर्तन आणि लावणी परंपरा तंजावरला रुजवली आहे. त्याचबरोबर सर्फोजी (दुसरा) यांनी स्थापन केलेले सरस्वती महल ग्रंथालय जागतिक ठेवा ठरले आहे. हे हस्तलिखित ग्रंथांचे जगातील सर्वांत मोठे ग्रंथालय असून, माणसाच्या लेखन आणि पुस्तक निर्मितीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून जगभर नावाजलेले आहे. येथे रामायण, महाभारतापासून, विवेकसिंधू, भगवद्गीता या ग्रंथाची शेकडो हस्तलिखिते उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search