Next
संगीत स्पर्धा : भाग तीन - कानसेन श्रोताही महत्त्वाचा!
BOI
Tuesday, June 04, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


संगीताच्या स्पर्धा या स्पर्धकांना तारक अथवा मारक ठरण्यासाठी जे काही घटक कारणीभूत असतात, त्यापैकी स्पर्धक, आयोजक आणि परीक्षक या घटकांबाबत याआधीच्या लेखांमध्ये आपण चर्चा केली. या स्पर्धांच्या दृष्टीने अशाच आणखी एका महत्त्वाच्या घटकाचा विचार करणे आवश्यक आहे, तो म्हणजे श्रोता.. स्पर्धेत जाणकार श्रोत्याकडून मिळालेली दाद ही स्पर्धकाला प्रोत्साहन देणारी असते.. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत, संगीत स्पर्धेतील श्रोत्यांच्या महत्त्वाबद्दल... 
................
ज्या नामवंत संस्था विशिष्ट दर्जा राखून, स्पर्धांचं काळजीपूर्वक आणि सातत्यानं आयोजन करत असतात, त्या ठिकाणी येणारा श्रोताही, कानसेन श्रोता असतो. म्हणजेच त्याला चांगल्या-वाईटाची जाण असते. एखादा कार्यक्रम ऐकायला आल्याप्रमाणे तो स्पर्धा ऐकायला येतो आणि स्पर्धकांना दाद देतो. उगाचच कोणालाही तो डोक्यावर घेत नाही. अशा जाणकार श्रोत्याकडून मिळालेली दाद स्पर्धकाला प्रोत्साहन देणारी असते. अशा कानसेन श्रोत्यांसमोर आपली कला सादर करायला स्पर्धकांना हुरूप येतो आणि अशा ठिकाणी यश मिळवण्यात स्पर्धकांना नेहमीच आव्हान वाटतं. 

हे अनुभवी श्रोते स्पर्धेच्या निकालाविषयी स्वत:चे अंदाज बांधत असतात. परीक्षकांनी दिलेला निकाल त्यांच्या मनातील निकालाप्रमाणे जुळला, तर त्यांना आनंद होतो. त्याचप्रमाणे परीक्षकांनी जर पक्षपातीपणा केला, तर त्यांना तो पटत नाही. त्याबद्दल ते तीव्र नापसंती दर्शवतात. अशा जाणकार श्रोत्यांच्या मतालाही योग्य तो मान देऊन, काही ठिकाणी श्रोत्यांनी निवडलेला स्पर्धक म्हणून स्वतंत्र बक्षीस जाहीर केलं जातं.

या अशा ठिकाणच्या स्पर्धांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा, उत्साह असतो. श्रोत्यांसमोर स्पर्धक गातात, वाजवतात. परीक्षक त्यांना गुण देतात, त्यांचे रिमार्क्सही देत असतात. स्पर्धा संपल्यावर लगेच निकाल जाहीर होतो. परीक्षक आपली मतं मांडतात. पारितोषिक वितरणही होतं. कुठलीच लपवाछपवी नाही, उत्सुकता ताणून धरणं नाही, स्पर्धकांनी सादरीकरण केल्यावर त्यांना लोकांकडे मतं मागण्याची जबरदस्ती नाही. त्यामुळे अशा ठिकाणी श्रोत्यांना अपेक्षित स्पर्धकाव्यतिरिक्त भलताच स्पर्धक बक्षीस पटकावून गेला, असे होत नाही.

आता अशा स्पर्धांबरोबरच निरनिराळ्या टीव्ही वाहिन्यांवरही संगीत स्पर्धा होऊ लागल्या आहेत. घरबसल्या करमणूक म्हणून या स्पर्धांना लोकांचाही प्रतिसाद चांगला मिळतोय. एका दिवसात खूप मोठी प्रसिद्धी मिळते, म्हणून स्पर्धकांनाही त्याचं खूप आकर्षण आहे. त्यांना खूप मोठी संधी मिळत आहे.

या टीव्ही वाहिन्यांवरील स्पर्धांच्या जमान्यात श्रोत्यांमध्येही खूप बदल झालेला दिसून येतो. पूर्वीचा हा ‘श्रोता’ आता ‘प्रेक्षक’ झाला आहे. तो स्पर्धेच्या ठिकाणी हजर नसतो; पण स्पर्धकांनी केलेलं सादरीकरण तो घरी बसून रेकॉर्डिंगच्या स्वरूपात पाहत असतो. प्रत्येक स्पर्धकाच्या सादरीकरणानंतर, वाहिनीने ठरवल्याप्रमाणे दिलेली टाळ्यांची दाद त्याला ऐकावी लागते. त्यावर घरी बसून तो तावातावाने चर्चा करतो. 

तसंही आता गाणं ही ऐकण्यापेक्षा पाहण्याची गोष्ट झाली आहे. हल्लीचा श्रोता ऐकतो कमी, पाहतो जास्त. व्हिडिओशिवाय गाणं नुसतं ऐकायला आजकाल कुणाला फार आवडत नाही. छान डोळे मिटून निवांतपणे नुसती ऐकण्याची मजा घेताना फार कोणी दिसत नाही. त्यामुळे पूर्वीचा रसिक ‘श्रोता’ आता ‘प्रेक्षक’ झालाय, असं मी म्हणते. यामुळे स्पर्धकांनादेखील आपला मेकओव्हर, पेहराव याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. हातात माइक घेऊन, नाचून  सादरीकरण करावं लागतं. मुळात उत्तम गायनाला या दिखाव्याच्या गोष्टींची जोड मिळाली, तर ते खुलूनही दिसतं; पण कधी कधी गाण्यातील ताल-सुरांच्या तयारीपेक्षा या इतर गोष्टींनाच जास्त महत्त्व दिलेलं दिसून येतं.

जो कोणी स्पर्धक आपली कला सर्वोत्तम रीतीनं सादर करेल, तोच निर्विवादपणे विजेता ठरेल. हे सत्य असताना स्पर्धकांनी ‘मला जिंकून देण्यासाठी मत द्या’ असं श्रोत्यांना आवाहन करणं, ही गोष्टही तशी अयोग्यच आहे. त्यामध्ये हा या गावचा, हा या राज्यातला, हा या जातीचा, हा या परीक्षकाच्या समूहाचा असा भेदभाव उघडपणे केलेला दिसून येतो. तसंच समान वयोगटातील स्पर्धा हाही मुद्दा फारसा कोणी विचारात घेताना दिसत नाही. सात-आठ वर्षांच्या मुलाची तुलना चाळिशीतील स्पर्धकाबरोबर कशी काय होऊ शकते? निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धाही आजकाल एकाच कार्यक्रमात घेताना दिसून येतात. एकाच स्पर्धेमध्ये, एकल गायन, एकल वादन असतं. शास्त्रीय, सुगम संगीत असतं. त्यातच समूहगानही असतं. त्यातच सर्व वयोगटांतील स्पर्धक असतात. अशा निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धा एकत्रितपणे घेऊन, विजेता कसा काय ठरवणार? स्पर्धकांना न्याय कसा मिळणार?

त्याचप्रमाणे स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींना महत्त्व देऊन, सर्वांसमोर त्याच्या भावनांशी खेळून, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी, लोकप्रियता वाढवण्यासाठी त्याचं भांडवल केलं जातं, हे योग्य नाही. स्पर्धेमधून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकाने, तो निर्णय कितीही खिलाडूपणे स्वीकारला, तरी बऱ्याचदा सूत्रसंचालक त्याला रडायला भाग पाडताना दिसतात. त्यांचे अश्रू लोकांना दाखवून, सगळ्यांची खोटी सहानुभूती मिळवण्याची काय गरज? सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांना या गोष्टी खटकत कशा नाहीत? असे प्रश्न त्यांना का पडत नाहीत, याचं मला आश्चर्य वाटतं. का फक्त दोन घटकांची करमणूक म्हणून प्रेक्षक या स्पर्धा पाहतात? 

हे प्रकार प्रेक्षकांनी नाकारले पाहिजेत. घरात बसून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यापेक्षा ही नाराजी चॅनलच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे प्रेक्षकांना गृहीत धरणं बंद होईल. प्रेक्षकांना हे असंच आवडतं, असं त्यांना म्हणता येणार नाही. नाहीतर या टीव्ही वाहिन्यांवरील स्पर्धा नवोदित कलाकारांच्या दृष्टीनं घातक ठरू शकतात. स्पर्धांमधली श्रोत्यांची (आताच्या प्रेक्षकांची) भूमिकाही महत्त्वाची होती, आहे आणि पुढेही राहिली पाहिजे, असं मला वाटतं. श्रोत्यांनी जबाबदारीनं आपलं मत व्यक्त करणं, समंजसपणे योग्य गुणवत्तेच्या स्पर्धकांना पाठिंबा देणं, याचं महत्त्व ओळखायला हवं. तरच कलाकाराच्या जीवनातील या स्पर्धा त्याला करिअरमध्ये प्रेरक ठरतील. त्याचे गुणदोष कळायला उपयोगी ठरतील. त्याला प्रत्येक वेळी यश नाही मिळालं, तरी त्या स्पर्धा निदान त्याला मारक तरी ठरणार नाहीत.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search