Next
‘मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी देणार’
ठाण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 31, 2019 | 01:28 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा ५० टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. २६ व २७ जुलैला झालेल्या बदलापूर-कल्याण परिसरातील पूर परिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल,’ असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण, पोलीस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे, निरंजन डावखरे, माजी आमदार गोटीराम पवार, दिगंबर विशे, नगराध्यक्ष शितल तोंडलीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार, कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुर्णकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते झाले, हा माझ्यादृष्टीने भाग्याचा दिवस आहे. विविध कामांची सुरुवात या भागात होत आहे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य केले. महाराजांनी सामान्य माणसाला जागृत करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. गेली पाच वर्षे आम्ही शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे कितीही संकटे आली तरीही मार्ग काढला आणि विकास केला.’

‘परवाच्या पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. २००५मध्ये प्रति घरटे पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. यात भरीव मदत करण्याचा शासन निश्चित विचार करेल. पुरामुळे जे रस्ते खराब झाले आहेत. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.


पालकमंत्री शिंदे म्हणाले, ‘नागपूर समृध्दी महामार्ग २४ जिल्ह्यांसाठी विकासावर परिणाम करणारा आहे. हा महामार्ग गेमचेंजर म्हणून ओळख देईल. बदलापूर येथील पुरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी.’ 

आमदार किसन कथोरे यांनी या भागातील माळशेज घाटाला चीनच्या धर्तीवर काचेचा स्कायवॉकसाठी मंजूरी मिळावी, अशी मागणी केली. या भागातल्या रस्त्यांसाठी शासनाने जी भरीव मदत केली, त्याबद्दल त्यांनी आभार मानले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटी स्टॅंडचे भूमिपूजन, धान्याच्या गोदामाचेही भूमिपूजन आणि म्हसा येथील महाविद्यालयाचेही ई-भूमिपूजन करण्यात आले. पाऊस असूनही पंचक्रोशीतील जनतेने या वेळी गर्दी केली होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search