Next
रानटी हत्तींना मधमाश्यांनी पळवले
हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी मधुक्षिकापालनाचा प्रयोग सिंधुदुर्गात यशस्वी
नीलेश जोशी
Tuesday, September 25, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this article:दोडामार्ग :
‘छोटीशी मुंगी हत्तीलाही भारी पडू शकते. त्यामुळे कोणालाच कमी लेखू नये,’ अशी गोष्ट आपण प्रत्येकानेच लहानपणी ऐकलेली आहे. जणू काही त्याच गोष्टीचा आधार घेऊन सिंधुदुर्गातील रानटी हत्तींच्या उपद्रवाची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. ही पावले योग्य दिशेने पडत असल्याचे संकेतही मिळत आहेत. फक्त गोष्टीतील मुंगीच्या ठिकाणी प्रत्यक्षात मधमाश्या आहेत. काही कळले नसेल, तर पुढे वाचा. सिंधुदुर्गातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी नवा आणि नैसर्गिक उपाय म्हणून मधुमक्षिकापालन सुरू करण्यात आले आहे. मधुमक्षिकापालन केलेल्या भागांतून मधमाश्यांना घाबरून हत्तींनी काढता पाय घेतला असून, शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे. आमदार नितेश राणे यांनी मायव्हेट्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात राबवला आहे. हनी बी प्रोजेक्ट असे त्याचे नाव असून, हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

दोडामार्ग हा सिंधुदुर्गातील सर्वांत दक्षिणेकडचा, कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवरचा तालुका. कर्नाटकातून येणारे रानटी हत्ती दोडामार्ग तालुक्यात गेल्या सोळा वर्षांपासून शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान करत आहेत. हा तालुका हत्तींच्या उपद्रवाच्या दृष्टीने सर्वांत संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. त्यांना रोखण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवर तर उपाय केलेच; पण शासनानेही लाखो रुपये त्यासाठी खर्च केले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मायव्हेट्स चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हत्तींना हटवण्यासाठी ‘हनी बी प्रोजेक्ट’ अर्थात मधुमक्षिका पालनाचा पथदर्शी प्रकल्प दोडामार्गमध्ये आणला.

दोन सप्टेंबर २०१८ रोजी दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे-वीजघर, राणेवाडी, बांबर्डे या गावांतील शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनासाठीच्या चौदा किटचे वाटप करण्यात आले. कर्नाटकच्या सीमेवरील बांबर्डे गावात या प्रकल्पांतर्गत १४ बॉक्सेस बसविण्यात आले आणि याचा परिणाम दिसू लागला. केवळ चारच दिवसांत याचे फायदे दिसू लागले असून, पाच-सहा सप्टेंबरला दोडामार्ग तालुक्यात शिरकाव केलेल्या रानटी हत्तींनी या भागात फिरकणे टाळले. यानंतरच्या कालावधीतही या परिसरात हत्ती दिसून आले नाहीत, अशी माहिती मायव्हेट्स संस्थेचे सचिव डॉ. युवराज कागीनकर यांनी दिली. 


‘कामगार माश्यांना आकर्षित करण्यासाठी राणी माशी सेक्स हॉर्मोन्स सातत्याने सोडत असते. त्याचा गंध कित्येक किलोमीटरपर्यंत पसरतो. त्या वासाने हत्तींना धोक्याची कल्पना येते आणि ते आपला मार्ग बदलतात,’ अशी माहिती डॉ. युवराज यांनी दिली. नितेश राणेहत्तींचा मोठा उपद्रव असलेल्या तमिळनाडू राज्यासह थायलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशात हा प्रकल्प यशस्वी झाला. त्या धर्तीवर दोडामार्गमध्येदेखील नैसर्गिक पद्धतीने हत्ती हटवण्याचा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे सरकारी मदत मिळाल्यास संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात अशाच पद्धतीने हत्तींचा बंदोबस्त करता येईल, असे डॉ. युवराज यांनी म्हटले आहे. या पथदर्शी प्रकल्पाची संकल्पना राबवणारे आमदार नितेश राणे यांचेही त्यांनी कौतुक केले.हत्तींचा उपद्रव टाळण्यासाठीचा हा प्रयोग नैसर्गिक असल्याने त्याचा निसर्गाच्या कोणत्याही घटकाला उपद्रव होत नाही. शिवाय त्यातून उत्पन्नाचे एक अतिरिक्त साधनही शेतकऱ्यांच्या हाताशी आले आहे. तसेच, मधुमक्षिकापालनामुळे आजूबाजूच्या परिसरातील पिकांचे परागीभवन वाढल्याने उत्पादनवाढ होते. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता हा प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचाच आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शासकीय स्तरावरून याचा गंभीर विचार झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने हत्ती अतिक्रमणमुक्त जिल्हा बनवता येईल, असा विचार तेथील शेतकरी मांडत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search