Next
‘डिक्की’च्या एक हजार उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात संधी
BOI
Saturday, February 09, 2019 | 02:36 PM
15 0 0
Share this story

डिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, अनिल होवाळे व संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार.

पुणे : ‘आगामी काळात संरक्षण मंत्रालयासाठी पुरवठादार म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) किमान एक हजार उद्योजक काम करतील,’ अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी व्यक्त केली.

संरक्षण मंत्रालय, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व ‘एनएसआयसी’च्या संयुक्त विद्यमाने पुण्यात नुकतेच अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी ‘डिक्की’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, ‘डिक्की’चे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, ‘डिक्की’ महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश जगताप, ‘डिक्की’चे अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना अजयकुमार
 ‘पाच हजार कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा खरेदीचे संरक्षण मंत्रालयाचे लक्ष्य आहे. त्यासाठी ‘डिक्की’ हे एक मोठे व्यासपीठ आहे. उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा. काही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे उद्योजक या क्षेत्रात येण्यास काहीसे साशंक होते, परंतु आता तसे राहिले नाही. बऱ्याच प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आला असून, याचा अभ्यास उद्योजकांनी करावा. संरक्षण क्षेत्रातील गरजा ओळखाव्यात व त्यानुसार पुरवठा करण्याची क्षमता ठेवावी. या क्षेत्रात सुमारे सात हजार उद्योजक आहेत आणि येत्या काळात एक हजार ‘डिक्की’ सदस्य या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविताना दिसतील,’ असे सचिव अजयकुमार यांनी नमूद केले.

कुमार यांनी ‘डिक्की’च्या सदस्यांना डिफेन्स आणि एरो स्पेस संदर्भातील संधींची तांत्रिक व विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक सत्र हे उद्योजकांसाठी उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली. 

‘तळागाळातल्या अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना एकत्र आणून संरक्षण क्षेत्रातील व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता,’ असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.


या कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएल लिमिटेड पुणे, माझगाव डॉक, ॲम्युनिशन फॅक्टरीज, गोवा शिपयार्ड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (नाशिक) सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link