Next
परिसरसौंदर्य खुलविणारे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे
BOI
Sunday, December 03, 2017 | 09:45 AM
15 1 0
Share this article:

वेलिंग्टन फाउंटन

मुंबईतील वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा यंदाचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या वास्तूला हा पुरस्कार नेमका का मिळाला, वास्तूची वैशिष्ट्ये आणि सौंदर्य नेमके कशात आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला या वास्तूची ओळख करून देणारा विशेष लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
...............
महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाच्या पार्श्वभूमीवर वेलिंग्टन फाउंटन.सन १८५८मध्ये ब्रिटिशांनी भारताची सत्ता हाती घेतली. तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या वसाहतकालीन करारी प्रशासकाने सन १६८६-१७४३च्या दरम्यान बांधलेली मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेऊन आधुनिक मुंबईच्या विस्ताराचा पाया घातला. भविष्याचा अचूक वेध घेऊन त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहर सौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजेतून अनेक महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेट, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई, इत्यादींचा समावेश होता. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचाच एक भाग म्हणूनच बांधण्यात आले होते. सन २००७मध्ये रुईया कॉलेजच्या इतिहास शाखेने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रीजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला सादर केलेल्या अहवालानुसार ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोयांची संख्या जवळपास ५०पर्यंत असल्याची नोंद केली आहे. या यादीनुसार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यापैकीच एक होय! मुंबईतील कला परिसराचा भाग असलेल्या वेलिंग्टन फाउंटन स्मारकाचे कला-सौंदर्य व पुरातन वास्तू म्हणून असलेले महत्त्व ओळखून युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) या जागतिक संस्थेने २०१७चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार या वास्तूला जाहीर केला आहे. या आगळ्या-वेगळ्या कल्पक व शोभिवंत स्मारकाचा वास्तुकला सौंदर्यविवेक दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा... 

डेव्हिड ससून लायब्ररीकला-सौंदर्यपूर्ण परिसर निर्मिती :
गव्हर्नर बार्टल फ्रियरने पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांमुळेच (१८६२-१८६७) मुंबईला आधुनिक चेहरा मिळाला. या काळात आघाडीवर असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक व निओ क्लासिकल शैलीत सार्वजनिक इमारती बांधल्या गेल्या. या इमारतींच्या बांधकाम शैलीत तत्कालीन ब्रिटिश आर्किटेक्ट्सनी नवनवीन प्रयोग केले. नवीन आराखड्यानुसार फोर्ट परिसरात भव्य इमारतींसोबत मोठ्या आकारातील चौकही निर्माण करण्यात आले. त्यापैकी सर्वांत मोठा वेलिंग्टन चौक (आजचा पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी) असावा! हा परिसर रिगल सिनेमापासून सुरू होतो. या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) या इमारती आर्किटेक्ट जॉर्ज विटेटने व लायन गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम) एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स या आर्किटेक्टने आरेखित केली आहे. महात्मा गांधी रोडवरून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेस ‘मॅजेस्टिक हाउस’ची शानदार इमारत व पूर्वेस नावाप्रमाणे दिसणारे ‘रिगल’ सिनेमागृह उभे राहिले. एखाद्या उत्कृष्ट सिनेमागृहाची अंतर्बाह्य रचना व एकूण दर्जा कसा असावा, हे या इमारतीच्या रचनेत पाहायला मिळते! पुढे एल्फिन्स्टन कॉलेज, जहांगीर आर्ट गॅलरी, डेव्हिड ससून लायब्ररी, वॅटसन हॉटेल इत्यादी कला-सौंदर्याने नटलेल्या अनेक इमारती उभ्या राहिल्या.

मॅजेस्टिक हाउसच्या पार्श्वभूमीवर वेलिंग्टन फाउंटन.स्थानमहत्त्व व स्थापत्यशैली :
समुद्रमार्गाने मुंबईत येणारे युरोपीय पाहुणे फोर्टमध्ये अपोलो गेटमधून (आजचे लायन गेट) प्रवेश करत असत. सन १८०१-१८०४दरम्यान ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ आर्थर वेलस्लीने मुंबईला दोन वेळा भेट दिली होती. शहर प्रवेशाचा मार्ग चैतन्यपूर्ण दिसावा व परिसराचे सौंदर्य खुलून दिसावे या दुहेरी हेतूने कारंज्यासाठी या जागेची निवड करण्यात आली होती. प्लासी व १८५७च्या युद्धात दाखवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून कारंजे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेच हे वेलिंग्टन फाउंटन. लेफ्टनंट कर्नल जे. जे. स्कॉट या स्थापत्यकाराने यात पारंपरिक आकाराऐवजी नैसर्गिक घटकांचा उपयोग केला आहे. निओ क्लासिकल शैलीतील हे कारंजे ‘रॉयल इंजिनीअर्स’चे जनरल ऑगस्टस फूलर यांच्या पर्यवेक्षणाखाली, १८६५मध्ये पूर्ण करण्यात आले होते. तेव्हापासून या चौकाला ‘वेलिंग्टन फाउंटन’ अशी ओळख मिळाली. हा चौक आज पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी चौक या नावाने ओळखला जातो. हे फाउंटन जनतेने दिलेल्या देणग्यांतून उभारण्यात आले होते. त्यासाठी त्या वेळी १२ हजार रुपये खर्च आला होता, असा संदर्भ सापडतो. 

मधल्या दगडी स्तंभावर ड्यूक ऑफ वेलिंग्टनची प्रतिमा आणि शौर्याचे दाखले आहेत. डाव्या बाजूच्या छायाचित्रात सर्वांत डावीकडे ड्यूक ऑफ वेलिंग्टनची प्रतिमा आहे. तीच प्रतिमा उजव्या बाजूच्या छायाचित्रात स्वतंत्रपणे दाखवली आहे.

रचनासौंदर्य : 
हे अपारंपरिक आकारातील कारंजे मुख्यत: तीन भागांत विभागले आहे. 
तळभाग : जमिनीलगतचा अष्टकोनी दगडी कुंडाचा व्यास जवळपास सुमारे १२ मीटर असावा. कुंडाभोवतीच्या जागेत शोभिवंत वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
मध्य भाग : कुंडाच्या मधोमध अष्टकोनी ताशीव दगडी स्तंभावर ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ची प्रतिमा व शौर्याचे दाखले कोरीव संगमरवरी दगडात एक सोडून एक पटलावर मांडले आहेत.
डाव्या बाजूला कारवी वनस्पतीची पाने आणि उजवीकडे स्तंभदंडावरील पानेशिखर : दगडी स्तंभावर तिरकस आकारातील अष्टकोनी तबकडीचा तळभाग अलंकृत असून, तो उमलत्या फुलासारखा दिसतो. त्याच्या किनारपट्टीवर मत्स्य आकाराशी मिळते-जुळते कलात्मक नक्षीकाम केले आहे. फिकट करड्या रंगातील दगडी तबकडीच्या मधोमध ओतीव लोखंडी (कास्ट आयर्न) स्तंभदंडावर कारवी वनस्पतीच्या (अकँथस) काळसर रंगातील पानांच्या किनारी सोनेरी रंगाने सुशोभित केल्या आहेत. पितळी स्तंभदंडावरील सोनेरी रंगातील मोजक्या पानांचे रोपण व रेंगाळणाऱ्या पानांच्या आकर्षक रचनेतील कल्पकता दर्शकांचे लक्ष वेधून घेते. शिखर टोकावरून अलगद उसळणारे पाणी पानांवर थडकत तबकडीच्या किनारपट्टीवरील मोजक्या छिद्रांतून अष्टकोनी कुंडात जमा होते. स्थापत्यकाराने साध्या सोप्या रचनतून अपेक्षित हेतू साध्य केला आहे. यातून रचनाकाराची कला-संवेदनशीलता दिसून येते. या रचनेमधील पारदर्शक पाण्याची तरलता पाहून मनात उत्कट आनंद लहरतो; या आनंदलहरींतला दृश्यानुभव माणसाचे आयुष्य निश्चितपणे वाढवत असावा! अशा घटकांतून शेकडो वर्षांपूर्वी कला-सौंदर्यपूर्ण नजरेतून घडवलेला गतकाळ आजतागायत टिकून आहे. 

उमललेल्या फुलाच्या आकारातील तबकडीया परिसरातील इमारती व शोभिवंत वास्तूंसाठी मुंबई व ठाणे येथील स्थानिक खाणींतील दगड वापरला आहे. विविध शैलीतील इमारतींच्या बाह्य भिंतीतून डोकावणाऱ्या नैसर्गिक रंगछटा व विभिन्न शैलीतील कमानी, घुमट व मनोऱ्यांच्या आकाराने अवकाशाशी कलात्मक समन्वय साधल्याचे दिसून येते. म्हणूनच हा परिसर सर्वांना आकर्षित करतो. ब्रिटिशकालीन पुरातन मुंबई अनेक परिसरांत विभागण्यात आली आहे. त्यापैकी सर्वांत सुंदर परिसराचा मान या एकमेव कलासंपन्न परिसराकडे जातो हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही, हे तेथील एकूण पार्श्वभूमीशी एकरूप झालेल्या अनेक दृश्यांतून दिसून येते.

वेलिंग्टन फाउंटनची दोन काळांतील तुलनात्मक छायाचित्रे.सध्या खटकणाऱ्या काही गोष्टी :
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य पदपथावरील अस्वच्छ स्वच्छतागृह व ‘बेस्ट’ न दिसणारे स्टॉल्स आणि बस थांबे सौंदर्यात बाधा आणतात! सोबतच्या छायाचित्रात दिसणारा बस थांबा एकूण परिसराशी साधर्म्य साधणारा होता, हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही! वेलिंग्टन कारंजे सन १८६५मध्ये उभारण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या चौकातील वाहतूक रचनेत अनेक वेळा बदल करण्यात आले. परंतु, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट अनेक वर्षांपासून या परिसरातील सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिलेल्या फाउंटनचे स्वतंत्र अस्तित्व व सौंदर्य ‘पे अँड पार्क’चा फलक लागल्यावर झाकोळून गेले आहे, ते सोबतच्या छायाचित्रांच्या अवलोकनातून समजते. देश-विदेशातील पर्यटकांना आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा व स्थानिक गरजांचे नियोजन करताना परिसराचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य अबाधित राहील हे पाहायला हवे. वास्तविक पाहता दोन विरुद्ध टोकातील व्यवस्थेचे नियोजन एकाच जागेत करणे अयोग्य आहे. मुंबईतील वाहतूक बेटांवरील वारसास्थळे अनेक वर्षांपासून शहर व्यवस्था आणि सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी या परिसरातील जडणघडणीत तडजोडीचा पर्याय न स्वीकारता वास्तुकलासौंदर्याच्या निकषांवर इमारतींचे आरेखन केले होते, हे त्या त्या इमारतींच्या वैशिष्ट्यातून समजून येते. वर्तमान मुंबईतील गतिमान जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस शहरसौंदर्याचे महत्त्व कमी होत चालले आहे, हे सोबतच्या छायाचित्रांतील माणसे व गाड्यांच्या संख्येच्या तुलनात्मक प्रमाणातून दिसून येते! 

नूतनीकरणाआधीचे आणि नंतरचे वेलिंग्टन फाउंटन (फोटो : हिंदुस्तान टाइम्स)

किनारपट्टीवरील कलाकुसरनूतनीकरण :
वेलिंग्टन फाउंटन या ‘ग्रेड वन’ दर्जाप्राप्त पुरातन वसाहतकालीन कलात्मक स्मारकाचे नूतनीकरण, पुरातन वारसा संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांच्या देखरेखीखाली झाले आहे. वेलिंग्टन फाउंटन संवर्धनाचे काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीतर्फे करण्यात आले आहे. देखभालही त्यांच्यातर्फेच केली जाते. आजवर स्थानिक प्रशासनाला दक्षिण मुंबईतील रस्ते व चौकांची नावे बदलण्यापलीकडे कोणतेही बदल करण्याची गरज भासली नाही. तत्कालीन प्रशासकांनी भविष्याचा अचूक वेध घेऊन आधुनिक मुंबई घडवली. वर्तमान प्रशासनाची ‘स्मार्ट’ मुंबईची संकल्पना योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल! या परिसरातील सर्व वास्तू त्या काळात जशा बांधल्या होत्या, त्याच स्वरूपात आजही शाश्वतपणे टिकून आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा आपण योग्य रीतीने जपला, तरच पुढील पिढी वर्तमान कला-सौंदर्यातून मिळणाऱ्या आनंदाचा हिस्सा बनून राहिल! पुरातन वास्तूंच्या जतनासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने विशेष राखीव निधीची व्यवस्था करण्याची गरज आहे. तरच अनेक पुरातन वास्तूंचे संवर्धन कमी अवधीत करून त्या अधिक काळ टिकवून ठेवणे शक्य होईल! 

या संदर्भात मुंबईतील काळा घोडा असोसिएशनच्या कामाची दखल घेण्यासारखी आहे. तरुण कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘काळा घोडा कला महोत्सव’ साजरा केला जातो. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाला मुंबईतील लाखो कलाप्रेमी भेट देतात. विविध कलांत निपुण असलेले कलावंत व कलाकारांच्या कला-संवेदनशील कल्पनेतून प्रस्तुत केलेली कलात्मक दृश्ये दर्शकांना मंत्रमुग्ध करतात. मुंबईतील अनेक वास्तूंच्या संवर्धनासाठीही ही संस्था पुढाकार घेते.

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(‘बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर’ या वास्तूलाही ‘युनेस्को’चा पुरस्कार मिळाला असून, त्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या प्रतिमेचा फोटो : www.victorianweb.org. मुख्य फोटो : www.architecturaldigest.in)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search