Next
पंढरपुरातील पत्रकार राज्यस्तरीय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
BOI
Friday, August 31, 2018 | 01:41 PM
15 0 0
Share this story

उद्घाटन समारंभ

सोलापूर :
‘पत्रकारितेमध्ये राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्याची ताकद आहे; आजची पत्रकारिता अधिक प्रभावी व गतिमान होत आहे; मात्र सकारात्मक पत्रकारिताच समाजमनावर अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित जोपासण्याची भूमिका घ्यावी,’ असे आवाहन पंढरपूरचे (जि. सोलापूर) प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी मंगळवारी (२८ ऑगस्ट २०१८ रोजी) पंढरपूर येथे केले.

उपविभागीय अधिकारी सचिन ढोले

सोलापूर विद्यापीठ आणि पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. सागर कवडे

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यशाळेचे समन्वयक व ‘स्वेरी’चे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी प्रास्ताविकात राज्यस्तरीय कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगितला. सोलापूर विद्यापीठातील ‘पत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी पत्रकारांची नेमकी भूमिका, आजची पत्रकारिता आणि यासाठी आवश्यक बदल याबाबत मते मांडून, कार्यशाळेचे नेटके आयोजन केल्याबद्दल ‘स्वेरी’चे कौतुक केले.
पंढरपूरचे नूतन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे म्हणाले, ‘माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांची लेखणी समाज सुधारणा घडवून आणत असताना गतिमान झालेली पत्रकारिता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते.’ 

डॉ. रोंगे यांचा सत्कार

सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, ‘पत्रकारांच्या भूमिकेमुळे समाजात अधिक सुधारणा होऊन एक नवी दिशा मिळत असते. ज्या वेळी समाजातील एखादा घटक चुकतो, तेव्हा झालेल्या चुकीची कान पकडून जाणीव करून देतात, तर कौतुकास्पद कामगिरी जगासमोर आणून खुल्या मनाने पाठीवर कौतुकाची थापदेखील देतात. त्यामुळे पत्रकारांची भूमिका समाज सुधारणेत महत्त्वाची असते.’ ‘स्वेरी’च्या खडतर वाटचालीला मिळालेल्या अभूतपूर्व यशात पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचेदेखील प्राचार्य डॉ. रोंगे यांनी सांगितले.

नीलेश खरे

वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा
पहिल्या सत्रात ‘वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘साम टीव्ही’चे संपादक नीलेश खरे म्हणाले, ‘माध्यम हे तंत्रज्ञानाच्या बळावर बदलत आहे. त्यामुळे पत्रकारांनी तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. आपल्यातला पत्रकार जागृत ठेवायचा असेल, तर तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. आपल्यातील दोष सुधारून पत्रकारिता पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. इलेक्ट्रॅानिक आणि प्रिंट मीडिया हा माहितीचा अधिक मोठा स्त्रोत बनणार आहे. प्रशासन व राज्यकर्त्यांवर अंकुश जरूर ठेवावा; मात्र त्यांना संधी द्यावी. जनतेची विश्वासार्हता कमावणे हे मोठे काम आहे. ते वृत्तवाहिन्यांनी प्रामाणिकपणे केले पाहिजे. आर्थिक बळ ही वृत्तवाहिन्यांची मर्यादा आहे.’ 

सत्राचे अध्यक्ष दैनिक पंढरी संचारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे म्हणाले, ‘आम्ही जवळपास पंचावन्न वर्षापासून पत्रकारिता करतो. यासाठी लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर आहे. असे असले तरीही आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जगात वास्तवतेसाठी प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी झालेले नाही. याचे वाचक कमी झाले, परंतु विश्वासार्हता मात्र अजूनही टिकून आहे.’

युवराज मोहिते

प्रिंट मीडियाचे भवितव्य काय?
दुसऱ्या सत्रात ‘प्रिंट मीडियाचे भवितव्य काय?’ या विषयावर मुंबईचे माध्यमतज्ज्ञ युवराज मोहिते म्हणाले, ‘आजची पत्रकारिता केवळ ग्रामीण भागातील पत्रकारांनीच टिकवून ठेवली आहे. ग्रामीण पत्रकारिता ही माध्यमांची बलस्थाने आहेत. पत्रकाराला भूमिका असली पाहिजे. आपण भूमिका घेतली नाही, तर बदल होत नाही. पुढच्या दहा-पंधरा वर्षांत वर्तमानपत्रे वाचणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट होणार आहे. या बदलाला आपण सामोरे गेले पाहिजे. सोशल मीडियाच्या युगात बातम्यांची जागा जाहिरातींनी व्यापली असून, पत्रकारांनी समाजाला मोजक्या शब्दात जास्त आशय द्यावा. पत्रकारांनी आता विज्ञान समजून घेण्याचीही गरज आहे.’

या सत्राचे अध्यक्ष दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकांत कांबळे म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माध्यमांची क्रांती होत आहे. यामुळे जोपर्यंत पत्रकारिता आहे, तोपर्यंत तोपर्यंत ‘प्रिंट मीडिया’चे महत्त्व राहणार आहे.’

रवींद्र आंबेकर

पर्यायी माध्यमांचे प्रयोग
तिसऱ्या सत्रात ‘पर्यायी माध्यमांचे प्रयोग’ या विषयावर ‘मॅक्समहाराष्ट्र’चे संपादक रवींद्र आंबेकर म्हणाले, ‘पर्यायी माध्यमात ‘फेक न्यूज’चा जास्त धोका आहे. त्यामुळे पर्यायी माध्यमांनी चांगला कंटेंट देण्याची गरज आहे. ही जबाबदारी पार पडताना मिळालेल्या प्रत्येक माहितीची खात्री करा आणि वैश्विक जगात  पत्रकारिता करताना ‘खऱ्याला खरेच आहे’ असे म्हणण्याची ताकद आपल्यात असावी लागते. डिजिटल माध्यमांना वेळ व माहिती अधिक वाढविता येते. सतत प्रश्न विचारणे हीच पर्यायी माध्यमांची खरी ताकद आहे. त्यामुळे पत्रकारांनी वस्तुस्थिती लिहिताना कशाचीही भीती बाळगू नये. माध्यमांचा पुरेपूर वापर करून तंत्रज्ञान वापरून समाजापुढे वास्तववादी विचार मांडले पाहिजेत.’

या सत्राचे अध्यक्ष ‘दैनिक सकाळ, सोलापूर’चे सहसंपादक अभय दिवाणजी म्हणाले, ‘संपूर्ण जग  बदलणे आपल्या हातात नसले, तरी आपण किमान दोन माणसांना तरी बदलू शकतो. यामुळे प्रथम समाज परिवर्तन करण्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे.’

संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनीदेखील पत्रकारितेवर भाष्य करून पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर चिपळूणमधील ‘श्रमिक सहयोग’चे कार्यवाह राजन इंदुलकर (वंचितांच्या घटकातील मुलांचे शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली खुली चर्चा पार पडली. यामध्ये उपस्थितांनी पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी मान्यवरांना विचारून त्यावरील समस्या मांडल्या. मान्यवरांनी सर्व उत्तरे दिली. यामुळे उपस्थित पत्रकार अधिक उत्साही दिसत होते. पुढारीचे उपसंपादक सिद्धार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा समारोप झाला.

या कार्यक्रमाचे ‘स्वेरी’ने उत्तम नियोजन केले होते. उपस्थित पत्रकारांसाठी चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. या वेळी कॉलेज कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे रवींद्र राऊत, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील साधारण २७५हून अधिक पत्रकार, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील विद्यार्थी, संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी. डी. रोंगे, ‘स्वेरी’चा प्राध्यापकवर्ग आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एस. एन. कुलकर्णी यांनी केले, तर कार्यशाळेचे समन्वयक व ‘स्वेरी’चे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
YOGESH KADAM About 176 Days ago
Best News
2
0
Santosh Halkude About 176 Days ago
अप्रतिम रचना, अप्रतिम बातमी , गरज अशा बातम्यांची...
2
0

Select Language
Share Link