Next
ज्ञानाची ऊर्जा देणाऱ्या शाळेला विद्यार्थ्यांकडून सौर ऊर्जेची पॅनेल्स
रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे शाळेची ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
BOI
Monday, May 20, 2019 | 02:14 PM
15 1 0
Share this article:

१९९४च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसह अॅड. बाबा परुळेकर, सुमिता भावे, शुभांगी वायकूळ, अॅड. धनंजय भावे आदी.

रत्नागिरी :
ज्या शाळेने आपल्याला ज्ञानाची ऊर्जा दिली आणि सर्वार्थाने स्वयंपूर्ण होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले, त्या शाळेला ‘ऊर्जे’त स्वयंपूर्ण करून विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधून १९९४मध्ये दहावी होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आठ किलोवॅट वीजनिर्मिती करू शकणारी पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची सोलर पॅनेल्स शाळेला भेट दिली आहेत. त्यामुळे शाळेच्या वीजबिलात कमालीची घट झाली असून, अतिरिक्त वीजनिर्मिती झाल्यास ती विकून शाळेला त्यातून उत्पन्नही मिळणार आहे.  

ऑक्टोबर २०१८पासून हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला. शाळेतून बाहेर पडून यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांनी नुकताच दोन दिवसांचा मेळावा घेतला. त्यात या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅ्ड. बाबासाहेब परुळेकर यांनी केले. ‘हे विद्यार्थी शाळेकडे लक्ष ठेवणारे आणि आपापल्या क्षेत्रात शाळेचे नाव उज्ज्वल करणारे आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

१९९४च्या या बॅचने याआधी २००४ आणि २०१८मध्ये शाळेत मेळावे घेतले होते. नुकताच तिसरा मेळावा झाला. सौर ऊर्जेचे पॅनेल्स दिल्यास शाळेचा विजेचा खर्च कमी होऊ शकेल, असा विचार या विद्यार्थ्यांनी केला. माजी विद्यार्थी केदार दातार पुण्यात राहतात. त्यांच्या मित्रासोबत ते सोलारिस इको सोल्यूशन्स ही फर्म चालवतात. आठ किलोवॅट वीजनिर्मिती करू शकतील, अशी सोलर पॅनेल्स त्या फर्मच्या माध्यमातून द्यायचे विद्यार्थ्यांनी ठरवले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काढलेली रक्कम अपुरी होती. त्याच बॅचचे विद्यार्थी असलेले सीए देवदत्त माईणकर यांनी मुंबईतील साई एंटरप्रायजेसच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून काही रक्कम मिळवली. त्यामुळे गरज भागली आणि पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची सोलर पॅनेल्स शाळेच्या छतावर बसवण्यात आली. 

फाटक हायस्कूलच्या छतावर बसवलेले सोलर पॅनल.

माजी विद्यार्थी व वैद्यकीय व्यावसायिक प्रद्योत जोगळेकर यांनी काम पूर्ण होईपर्यंत शाळा आणि ‘महावितरण’शी समन्वय ठेवला. थ्री फेज जोडणी करण्यात आली आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प २५ वर्षे लाभ देणार आहे. ‘सोलर नेट मीटरिंग सिस्टीम’ बसवण्यात आली असल्याने ‘महावितरण’कडून गरजेप्रमाणे वीज घेता येऊ शकते किंवा अतिरिक्त वीजनिर्मिती झाल्यास त्यांना विक्रीही करता येऊ शकते. वापर आणि विक्रीनुसार ‘महावितरण’कडून सरासरी वीजदर दिला जातो. या प्रकल्पातून वर्षाला १० हजारांहून अधिक युनिट वीज तयार होणार आहे. त्यामुळे शाळेचे मासिक वीजबिल १५ हजार रुपयांवरून ३०० रुपयांवर आले असून, अतिरिक्त वीजनिर्मिती झाल्यास वीजविक्रीतून उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होणार आहे. 

प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी व्यासपीठावर दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, फाटक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, केदार दातार, देवदत्त माईणकर उपस्थित होते. मूकबधिर विद्यार्थ्यांनी बनवलेली वारली पेंटिंगची फ्रेम संस्थेच्या वतीने माईणकर, दातार व प्रद्योत जोगळेकर यांना भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला १९९४च्या बॅचला शिकवणारे आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शिक्षकांनी पर्यावरण संरक्षण, कचरा निर्मूलन आदींचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले. त्या संस्कारांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी केल्याचे आम्हाला यातून पाहायला मिळाले. भविष्यात संस्थेच्या इतर शाळांतही असा प्रकल्प राबवण्याचा मानस आहे,’ असे अॅड. सुमिता भावे म्हणाल्या.

हेही जरूर वाचा...

‘शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न’

कतारमधील माजी विद्यार्थ्याची रत्नागिरीतील शाळेला देणगी

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search