Next
‘पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते’
प्रेस रिलीज
Monday, February 12, 2018 | 05:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘जे चांगले आहे ते टिप कागदासारखे टिपून घ्या. छोट्या संकटांनी निराश होऊ नका. आयुष्य सुंदर आहे ते भरभरून आणि समरसून जगायला शिका. पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते,’ असे मत ज्येष्ठ लेखिका इंदूमती जोंधळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोणावळा येथील मन:शक्ती केंद्र यांच्यातर्फे चाकण येथे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे अध्यक्षपद जोंधळे यांनी भूषवले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

या वेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष मंगला गोरे, मन:शक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, समन्वयक अजित फाफाळे, ‘मसाप’च्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे, ‘मसाप’चे कार्यवाह बंडा जोशी, लेखक राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, वर्षा तोडमल उपस्थित होते. ढोल, लेझीम आणि ताश्यांच्या गजरात निघालेल्या शानदार ग्रंथदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ झाला.

जोंधळे म्हणाल्या, ‘जवळच्या माणसांचे मन ओळखा  पुस्तका बरोबर माणसांचे मन वाचायला शिका.या जगात अशक्य काहीच नाही. आत्मशक्तीच्या बळावर आपली स्वप्ने पूर्ण करता येतात. आपली वाट आपण निर्माण करा.चांगला माणूस होणे हेच श्रेष्ठ ध्येय आहे.’
 
जोशी म्हणाले, ‘ग्रामीण भागातील मुलांपर्यंत साहित्य चळवळ घेऊन जाण्यासाठी साहित्य परिषदेने शाखांच्या माध्यमातून बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचे ठरविले आहे. उद्याच्या वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांच्या मनात साहित्याचे प्रेम निर्माण होण्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतील.’

प्रमोद शिंदे म्हणाले, ‘व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनविण्यासाठी साहित्य निश्चित उपयुक्त ठरेल. बुद्धी इतकाच भावनांचा विकासही महत्त्वाचा आहे त्यासाठी साहित्याचे वाचन करा.’

आमदार सुरेश गोरे म्हणाले, ‘ग्रामीण भागातही मुलांकडे प्रतिभा आहे तिला व्यासपीठ मिळाले पाहिजे. त्यासाठी असे संमेलन उपयुक्त ठरेल.’

राजन लाखे, नगराध्यक्ष मंगला गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्षा तोडमल यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रानंतर लेखक राजीव तांबे यांच्या कथाकथनाला, बंडा जोशी यांच्या हास्य कवितांना आणि कवी एकनाथ आव्हाड यांच्या काव्यवाचनाला बालकुमारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search