Next
आदिवासी भागातील शाळकरी मुलींना ५० सायकलींचे वाटप
डॉ. अमोल वाघमारे
Tuesday, May 07, 2019 | 11:46 AM
15 0 0
Share this article:आंबेगाव :
पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी येथील पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना नुकत्याच ३४ सायकली देण्यात आल्या. तसेच जांभोरी या गावातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींसाठी १६ सायकली देण्यात आल्या. रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे या संस्थेच्या पुढाकारातून व आदिम संस्कृती, संशोधन संस्थेच्या (ता. आंबेगाव) स्थानिक संयोजनातून हा कार्यक्रम राबविण्यात आला.

पोखरीतील शाळा म्हणजे या गावातील नागरिकांनी सुरू केलेली गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था आहे. या शाळेत परिसरातील गावांतून अनेक मुले-मुली आजही शाळेत चालत येतात. सुमारे चार ते सहा किलोमीटर अंतर त्यांना दररोज चालावे लागते. या पार्श्वभूमीवर त्यांना सायकली देण्यात आल्या.

या सायकलींसाठी ‘रोटरी क्लब निगडी, पुणे’ यांनी आर्थिक भार उचलला. तसेच पोखरी येथील ३६ सायकली मिळालेल्या मुलींच्या पालकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देऊन आपला सहभाग नोंदविला. जांभोरी येथील १६ सायकलींसाठी प्रत्येकी एक हजार रुपये ग्रामविकास फाउंडेशनने दिले.या सायकलींचा औपचारिक वाटप कार्यक्रम एक मे रोजी पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडला. या वेळी ‘रोटरी क्लब, निगडी’चे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी यांच्यासह अनेक रोटेरियन, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, पोखरी गावाचे उपसरपंच सचिन भागीत, आदिम संस्थेचे डॉ. अमोल वाघमारे, किसान सभेचे अशोक पेकारी, शहीद राजगुरू ग्रंथालय येथील अशोक जोशी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे माजी कुलसचिव सीताराम जोशी, नामदेवराव कोळप, माजी सनदी अधिकारी श्री. करवंदे, गावातील नोकरदार मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना सुभाष जयसिंघानी यांनी सायकल वाटपामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मुलींना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा व त्यांना शाळेत वेळेवर पोहोचता यावे, यासाठी या सायकली मुलींना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात मुलांनाही सायकली देण्याचे नियोजन केले जाणार आहे,’ असे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमात मुख्यतः पोखरी येथील शाळेतील मुलींना सायकली देण्यात आल्या. जांभोरी येथे लवकरच एका छोटेखानी कार्यक्रमात तेथील मुलींना सायकली प्रदान केल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमाच्या संयोजनात शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव यांच्यासह सर्व शिक्षक आणि संस्थाचालक यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search