Next
विश्वविक्रम करणारी कराटेपटू - अस्मिता!
BOI
Friday, May 11 | 06:45 AM
15 0 0
Share this story


स्वसंरक्षणासाठीच्या हेतूने कराटे शिकण्याचे प्रमाण फार मोठे आहे. साहजिकच हा क्रीडाप्रकार शिकणाऱ्यांमध्ये मुली-महिलांची संख्या जास्त. पुण्याच्या अस्मिता जोशीने मात्र या खेळाचे महत्त्व तेवढ्यापुरतेच मर्यादित न ठेवता, या खेळात प्रावीण्य मिळवून मार्शल आर्टमध्ये चक्क विश्वविक्रमाची नोंद केली. ‘क्रीडारत्ने’ सदरात आज पाहू या कराटेपटू अस्मिता जोशीची गोष्ट...
.........
खरे तर कराटे हा खेळ आहे की नाही, याविषयी मतमतांतरे आहेत. तरीही स्वसंरक्षणासाठी या खेळाकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही महिलांचे, मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुण्याची अस्मिता जोशी ही मुलगी अशीच या खेळाकडे वळली; मात्र तेवढ्यावरच समाधान न मानता तिने त्या खेळात चांगले प्रावीण्य मिळवले, तेही इतके, की तिने या खेळात चक्क विश्वविक्रमाची नोंद केली.

वैष्णवी मांडेकर या आपल्या मैत्रिणीसोबत अस्मिताने यंदा महिला दिनी (आठ मार्च) मार्शल आर्टमधील हा आगळावेगळा विक्रम साकार केला. सहा इंची खिळे लावलेल्या बोर्डवर वैष्णवीला झोपविण्यात आले. त्यावर असाच एक बोर्ड ठेवून त्या बोर्डवर अस्मिता झोपली. अशा स्थितीत असलेल्या अस्मिताच्या पोटावर थोड्याथोडक्या नव्हे, तर एक टन शहाबादी फरशांचा चक्काचूर करण्यात आला. त्यांचे प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी एकेका फरशीवर घणाचे घाव घातले. पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन फरशा अशा प्रकारे फोडण्यात आल्या आणि विश्वविक्रम साकार झाला. (या विक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) अस्मिता आणि वैष्णवी या विक्रमासाठी मानसिक आणि शारीरिकरीत्या पूर्ण तयार होत्या. त्यामुळेच हा अशक्यप्राय वाटणारा विक्रम साकार झाला. अस्मिताने केलेला विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांनी मान्य केला आहे. २०१९च्या आवृत्तीत तिच्या नावाची नोंद या दोन्ही बुकमध्ये होणार असल्याचे या दोन्ही संस्थांकडून अस्मिताला कळविण्यात आले आहे.

अर्थात या विक्रमासाठी दोघींनी खूपच मेहनत केली होती आणि बराच सरावही केला होता. त्यामुळेच हे शक्य झाले. पाचवी ते दहावीपर्यंत राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत शिक्षण घेत असताना अस्मिता कराटेचेही प्रशिक्षण घेत होती. त्यातही अशा साहसी प्रकारांसाठी तिला प्रशिक्षक म्हणून लाभले, ते सहा वेळा राष्ट्रीय विक्रम साकारणारे विक्रम मराठे. त्यामुळे तिच्या सरावाला आत्मविश्वासाची आणि अनुभवाचीही जोड मिळाली. अशाच प्रकारचे आणखी विक्रम साकारण्यासाठी ती आता सज्ज बनली आहे.

१८ वर्षांची अस्मिता सध्या पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. एकीकडे कराटेचा सराव आणि अभ्यासातील हुशारी तिचे अष्टपैलुत्व सिद्ध करत आहे. महाविद्यालयात या खेळाचा सराव शक्य होत नाही. कारण तो खेळ तिथे शिकवला जात नाही. साहजिकच त्याचे प्रशिक्षकही नाहीत. त्यामुळे ती मॉडेल कॉलनीत मराठे सरांच्याच अकादमीत रोज सराव करते. गेली दहाहून अधिक वर्षे ती या खेळाशी जोडली गेली आहे. ती सध्या ‘सेकंड डेन ब्लॅकबेल्ट’ ही पात्रता गाठली आहे. जिल्हा, क्लब, राज्य आणि राष्ट्रीय अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने असंख्य पदके आणि पुरस्कार मिळवले आहेत. तिच्या नावावर विश्वविक्रमासह अनेक राष्ट्रीय विक्रमांची नोंद झालेलली आहे. या खेळामुळे तिला महाविद्यालयाकडून क्रीडा खात्याचे १५ गुण मिळतात, हा एक भाग झाला; पण या निमित्ताने तिच्यासारख्या कितीतरी मुली या खेळाकडे वळल्या आहेत. 

या खेळाचा वारसा अस्मिताला घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील अशोक जोशी स्वतः नामांकित कराटेपटू असून, त्यांनी ब्राउन बेल्टपर्यंत मजल मारली आहे. अस्मिताला या खेळातील कारकीर्दीसाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. कराटे आणि वुशूच्या आंतरराष्ट्रीय वेबसाइटवर आता अस्मिताच्या विक्रमाची नोंद झाली आहे, ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

तसे पाहायला गेले, तर स्वसंरक्षण या एकाच हेतूसाठी हा खेळ खेळला जातो. त्यामुळे या खेळामध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण आश्चर्य वाटण्याइतके मोठे आहे; पण स्ट्रीट फाइट किंवा आत्मसंरक्षणासाठीच्या या क्रीडाप्रकारात एखादी मुलगी मनात आणले तर जागतिक कीर्ती संपादन करू शकते, हे अस्मिताने दाखवून दिले आहे. भविष्यात या खेळाला जागतिक व ऑलिंपिक मान्यता मिळाली, तर अस्मितासारख्या अनेक खेळाडूंचे देशाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल आणि देशालाही अनेक पदकविजेते खेळाडू गवसतील.

या खेळात पुढे ‘स्कोप’ किती असा प्रश्न या खेळाडूंना किंवा पालकांना पडतो. अशा खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना आशेचा किरण वाटेल असा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अलीकडेच घेतला आहे. ज्युदोबरोबरच आता किक बॉक्सिंग या खेळालाही समितीने अधिकृत मान्यता देऊन त्याचा ऑलिंपिक खेळांमध्ये समावेश केला आहे. भविष्यात कराटेलादेखील ऑलिंपिक खेळ म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे वाटते.

असे घडले, तर कराटे खेळणाऱ्या असंख्य मुलींना देशाचे प्रतिनिधित्व करता येईल. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात पदक मोजण्यासाठी एका हाताची बोटे पुरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी अधिकाधिक खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळाडूंनी वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला, तरच परिस्थिती बदलेल. अस्मितासारख्या मुलींकडून आदर्श घ्यायचा तो हाच! 

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘क्रीडारत्ने’ या त्यांच्या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(अस्मिता जोशी आणि वैष्णवी मांडेकर यांनी केलेल्या विश्वविक्रमाचा थरारक व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link