Next
सुधीर मोघे, केशव विष्णू बेलसरे
BOI
Thursday, February 08 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘मन ओथंबून मज सांगत होते काही, मी तसा चतुर ऐकून ऐकले नाही; ती ओढ आर्जवी ओलांडुनिया गेलो, मी कसा मनाच्या मनोगताला भ्यालो...’ असं म्हणणारे लोकप्रिय कवी-गीतकार सुधीर मोघे आणि पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यावर ग्रंथ लिहिणारे पूज्य बाबा बेलसरे यांचा आठ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
........
सुधीर मोघे

आठ फेब्रुवारी १९३९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्मलेले सुधीर मोघे हे कविधर्म हाच स्वधर्म मानणारे कवी, गीतकार, संगीतकार म्हणून अत्यंत लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व! त्यांनी पटकथा लेखन, ‘स्वरानंद’तर्फे रंगमंचीय सादरीकरण आणि अनेक सांगीतिक कार्यक्रमांचं निवेदनही केलं होतं. आकाशवाणी, दूरदर्शन, रंगभूमी, चित्रपट अशा सर्वच माध्यमांत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला होता. त्यांच्या स्वतःच्या कवितांचा ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रम गाजला आणि तुफान लोकप्रिय झाला होता. 

झी टीव्हीवरच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या अत्यंत कल्पक आणि दर्जेदार कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. मराठी कवी, गीतकार, संगीतकार यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे पैलू रसिकांसमोर आणणारा हा कार्यक्रम मराठी मालिकांच्या इतिहासातला मैलाचा दगड म्हणता येईल.

गदिमा, शांताबाई यांचा वारसा चालवणारे असे ते एक सिद्धहस्त कवी होते. त्यांच्या मनस्वी आणि कलंदर वृत्तीची साक्ष त्यांच्या अनेक कवितांमधून मिळते. उदाहरणार्थ –

‘घावावर उसनी फुंकर कशाला? त्यांचं कौतुक कोणाला आहे?
निमूट वेदना सोसण्याइतपत माझं काळीज खंबीर आहे;
खंजीर धारदार, कबूल! पण तो तर केवळ निमित्त असतो
खंजीर पेलणारा हात मात्र, न बुजणारी जखम करतो..’

आत्मरंग, लय, पक्ष्यांचे ठसे, कविता सखी, अनुबंध, गाणारी वाट, शब्दधून, निरांकुशाची रोजनिशी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

आला आला वारा, एक झोका चुके काळजाचा ठोका, एकाच ह्या जन्मी जणू, ॐकार अनादि अनंत अथांग, काजल रातीनं ओढून नेला, गूज ओठांनी ओठांना सांगायचं, गोमू संगतीनं माझ्या तू, घर दोघांचे घरकुल पाखरांचे, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रास-झुला, दयाघना का तुटले, दिसलीस तू फुलले ॠतू, दिस जातील दिस येतील, फिटे अंधाराचे जाळे, भेटशील केव्हा माझिया जिवलगा, मन मनास उमगत नाही, मना तुझे मनोगत, माझे मन तुझे झाले, माय भवानी तुझे लेकरू, रात्रीस खेळ चाले, विसरू नको श्रीरामा, शंभो शंकरा करुणाकरा, सखी मंद झाल्या तारका, सांज ये गोकुळी सावळी सावळी अशी त्यांची बहुसंख्य गाणी रसिकांच्या कायमच ओठांवर असतात.

सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून महाराष्ट्र शासनाचे चार पुरस्कार त्यांना मिळाले असून, चैत्रबन पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं होतं. 

१५ मार्च २०१४ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.

(सुधीर मोघे यांच्या काही गीतांबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

हा खेळ सावल्यांचा : https://goo.gl/k6sVuE
जरा विसावू या वळणावर : https://goo.gl/FwMvG2
माय भवानी तुझे लेकरू : https://goo.gl/gAUCA5
फिरुनी नवी जन्मेन मी : https://goo.gl/nFUp7u
................

केशव विष्णू बेलसरे

आठ फेब्रुवारी १९०९ रोजी जन्मलेले प्राध्यापक केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जातात. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं. 

त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर भारतीय अध्यात्म या विषयावरही त्यांनी लेखन केलं होतं.

सार्थ श्रीमत् दासबोध, अध्यात्म दर्शन, आनंद साधना, भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत, भावार्थ भागवत, ज्ञानेश्वरी, मनाची शक्ती, नामसाधना परमार्थ प्रदीप, प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद, साधकांसाठी संतकथा, शरणागती, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अंतर्यात्रा, ईश्वरभक्ती दर्शन अथवा प्रेमयोग, श्रीचैतन्य गीता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
तीन जानेवारी १९९८ रोजी त्यांचं देहावसान झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link