Next
डॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल
BOI
Monday, August 06, 2018 | 03:45 AM
15 1 0
Share this article:

‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह, गेल्या दोन दशकातला नामवंत दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज आणि अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉल यांचा सहा ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
डॉ. राजेंद्रसिंह

सहा ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) जन्मलेले डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ (http://tarunbharatsangh.in/) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’ या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५मध्ये एका गावापासून झाली. आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे. या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली त्यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.      

विशाल भारद्वाज

सहा ऑगस्ट १९६५ रोजी बिजनौरमध्ये जन्मलेला विशाल भारद्वाज हा गेल्या दोन दशकांतला हिंदी सिनेसृष्टीतला एक नामवंत दिग्दर्शक आणि संगीतकार! याचबरोबर तो चित्रपटनिर्मिती आणि पटकथालेखनही करत असतो. ‘माचीस’ या गुलजारजींच्या सिनेमाला त्याने दिलेलं संगीत गाजलं आणि त्याचं गुलजार यांच्याशी ट्युनिंग जमलं. सत्या, हुतुतू, गॉडमदर आणि इश्किया या चित्रपटांना त्याने दिलेलं संगीत गाजलं; पण त्याच्यातला दिग्दर्शक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. योगायोगाने डेहराडून-दिल्ली अशा प्रवासात एका हातात आलेल्या शेक्सपियरने त्याला झपाटून टाकलं आणि मग पुढल्या काही काळांत त्याने ‘मॅक्बेथ’वर आधारित मकबूल, ‘ऑथेल्लो’वर आधारित ओमकारा आणि ‘हॅम्लेट’वर आधारित हैदर असे तीन सिनेमे बनवले. त्यांचं दर्शकांनी चांगलंच स्वागत केलं. दुसरीकडे त्याचे कमीने, सात खून माफ, मटरू की बिजली का मंडोला, रंगून यांसारखे सिनेमे दर्शकांची आणि समीक्षकांची पसंती मिळवून गेले. त्याने इश्कियाँ आणि डेढ इश्कियाँ यांसारख्या यशस्वी सिनेमांची निर्मितीही केली आहे. त्याला आजपर्यंत एक फिल्मफेअर पुरस्कार आणि सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.  
.....

ल्युसिल बॉल
  
सहा ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली ल्युसिल बॉल ही गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार! सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर तिला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे सिनेमे मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ ही टेलिव्हिजन सीरियल दणक्यात चालली आणि ल्युसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. तिच्यातल्या कॉमेडीच्या लाजवाब टायमिंगने लोकांवर भुरळ पडली. पुढे तिने डेझी आर्नेझशी घटस्फोट झाल्यावरही दी ल्युसी शो (१९६२-६८) आणि हिअर इज ल्युसी (१९६८-७४) या मालिका केल्या आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. तिला एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. १३ वेळा प्राइमटाइम एमी पुरस्कारांचं नामांकन तिला मिळालं होतं आणि चार वेळा तो पुरस्कार मिळाला होता. तिने प्रतिष्ठेचा क्रिस्टल पुरस्कारही मिळवला होता. २६ एप्रिल १९८९ रोजी तिचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.
.........
यांचाही आज जन्मदिन :
सिद्धहस्त लेखिका योगिनी जोगळेकर (जन्म : सहा ऑगस्ट १९२५, मृत्यू : एक नोव्हेंबर २००५)
कवी लॉर्ड टेनिसन (जन्म : सहा ऑगस्ट १८०९, मृत्यू : सहा ऑक्टोबर १८९२) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
अतींद्रिय शक्तींवर भाष्य करणाऱ्या सिनेमांचा दिग्दर्शक मनोज नाइट श्यामलन (जन्म : सहा ऑगस्ट १९७०) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search