Next
साधनांशिवाय साधना करायला शिका : ल. म. कडू
प्रेस रिलीज
Saturday, July 01, 2017 | 12:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती; पण कागद, रंग, पेन्सिल या गोष्टी मिळाल्या नाहीत. उपलब्ध वस्तूंचा वापर करून चित्रे काढली आणि चित्रकार झालो. एखादा छंद पूर्ण करण्यासाठी साधनांची गरज असतेच असे नाही, गरज असते ती इच्छाशक्तीची. साधनांशिवाय साधना करायला शिका,’ असा सल्ला बालसाहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले प्रसिद्ध लेखक आणि चित्रकार ल. म. कडू यांनी अहिल्यादेवी प्रशालेतील विद्यार्थिनींना दिला. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित नव्या शैक्षणिक वर्षातील ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमात, साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ल. म. कडू यांचा ‘मसाप’तर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि ग्रंथभेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह माधव राजगुरू, मुख्याध्यापिका सुलभा शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात अनुष्का गुंजाळ, हिमानी हर्षे, सृष्टी आचार्य, वैष्णवी काळे, मीनल गानू, केतकी देशपांडे या विद्यार्थिनींनी कडू यांची मुलाखत घेतली. 

कडू म्हणाले, ‘भाषा आणि रेषा यांचा वापर करून लहान मुलांसाठी काम करायचे असे ठरविले. लहान मुलांना भावतील अशा पुस्तकांची निर्मिती करण्यासाठीच प्रकाशक झालो. मुलांनो, अभ्यासाबरोबर एखादी कला आत्मसात करा. कला माणसाला कसे जगावे, हे शिकविते. दररोज रोजनिशी लिहिण्याची सवय करा. त्यामुळे तुमचा हात लिहिता राहील.’ 

प्रा. जोशी म्हणाले, ‘आजच्या तंत्रस्नेही युगात बालकुमारांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन लेखन करणारे जे मोजके लेखक आहेत, त्यात कडू यांचे नाव अग्रस्थानी आहे. प्रयोगशीलता जपताना कडूंनी शब्द आणि चित्र या दोन्ही माध्यमांतून बालकुमारांचे विश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केले असले, तरी मराठी बालसाहित्याचे दालन संपन्न करण्यात त्यांचा ‘सिंहाचा वाटा’ आहे. बालकुमारांसाठी लेखन करणे हे मोठे आव्हान आहे. अनेक साहित्यिक त्यांच्याच बालपणातले अनुभव साहित्यातून मांडतात ते साहित्य आजच्या मुलांना आपलेसे वाटत नाही.’ माधव राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search