Next
‘थँक्सवाली आरती’चा अनोखा उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, September 01, 2017 | 03:14 PM
15 0 0
Share this article:

‘थँक्सवाली आरती’ करताना राजस सोसायटीमधील सभासद व सेवाकर्ते.पुणे : आपला प्रत्येक सण विनाव्यत्यय साजरा व्हावा यासाठी आपल्या घरातील सण बाजूला ठेवून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे पोलीस, डॉक्टर, पोस्टमन, भाजीवाले यांच्यासाठी कसबा पेठेतील राजस सोसायटीने गेल्या वर्षीपासून ‘थँक्सवाली आरती’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी पोलीस अहोरात्र तैनात असतात. बंदोबस्तावर असताना पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. त्याचबरोबर आपली महत्त्वाची कागदपत्र आणणारे पोस्टमन, पेपरवाले, कचरावाले, भाजीवाले, सुतार, इलेक्ट्रिशियन असे वेगवेगळे कर्मचारी आपला सण-उत्सव बाजूला ठेवून आपल्या मदतीला येतात.

या लोकांनाही या कालावधीत उत्सवाचा आनंद घेता यावा, याच उद्देशाने कसबा पेठेतील राजस सोसायटीतर्फे ‘थँक्सवाली आरती’ हा उपक्रम राबवला जात आहे. यात या सर्व कर्मचाऱ्यांकडून बाप्पाची आरती केली जाते. तसेच सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कारदेखील करण्यात येतो. या वर्षी त्याचा श्रीगणेशा करण्याच्या हेतूने २९ ऑगस्टला बाप्पाची आरती पासलकर गॅस एजन्सीचे कर्मचारी सुनील राऊत, परकास वाटकर, पेपरवाले अतुल मंचरकर, राजू व दूधवाले शांतवीर यांचा हस्ते करण्यात आली.

या वेळी ‘९५ बिग एफएम’चे रेडीओ जॉकी ज्योनिता, सानिका व नवीन, राजस सोसायटीचे श्यामसुंदर मुंदडा, मनमोहन मंत्री, विशाल रानपुरा, शुभम मुंदडा, सचिन राठी, राहुल मारूलकर, हरेश मांडलिया, पीयूष सोनी, मुकेश मुंदडा, सुमित झंवर आदी उपस्थित होते.

‘येत्या दिवसांत पोस्टमन व पोलिसांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. आपणही हा उपक्रम आपल्या सोसायटीत सार्वजनिक मंडळात अवश्य राबवावा, जेणेकरून निदान एवढा तरी त्यांचा उत्सवात सहभाग असेल,’ असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष महेश रटकलकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search