Next
तिरंदाजीतील नवी गुणवत्ता : साक्षी
BOI
Friday, June 29, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

साक्षी शितोळे

आशिया चषक स्पर्धेतील प्रवेशाद्वारे ती भारताबाहेर चौथी स्पर्धा खेळेल. सरावाला सुरुवात केल्यापासून केवळ सहा वर्षांतच देशाचे प्रतिनिधित्व करणारी साक्षी पहिलीच खेळाडू आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या तिरंदाज ‘साक्षी शितोळे’बद्दल...
.........................................
साक्षी शितोळेभारताच्या खेळ परंपरेत तिरंदाजी या खेळाला एक वेगळेच महत्त्व आहे. पुर्वीच्या काळी तिरंदाजी ही युद्धकौशल्याचा एक भाग होती आणि आजच्या काळात तो एक खेळ म्हणूनही आपले स्थान टिकवून आहे. याच खेळात सध्या चर्चिले जात असलेले एक नाव म्हणजे, साक्षी शितोळे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिलादेखील पराभूत केल्याने साक्षीचे नाव सध्या देशाची नवी गुणवत्ता म्हणून घेतले जात आहे.

तिरंदाजीत आज जे खेळाडू धडे गिरवत आहेत, ते पाहता या खेळात भारतीय संघ भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करेल यात शंका वाटतच नाही. मुख्यत्त्वे पुरूष खेळाडूंपेक्षा महिला या खेळाकडे जास्त संख्येने वळताना दिसत आहेत. यातच साक्षी शितोळेचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ज्युनिअर गटात सलग सात वर्षे ती पहिल्या स्थानावर आहे, तर वरिष्ठ गटात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये तिची वर्णी लागते. केवळ सहा वर्षांत इतकी प्रगती करणारी साक्षी आता चायनीज तैपेयीमध्ये होणाऱ्या ‘आशिया चषक स्पर्धे’साठी निवडली गेली आहे. इतकेच नव्हे, तर या स्पर्धेत सुवर्ण पदकही जिंकणार असा विश्वास ती व्यक्त करत आहे.

दीपिका कुमारीसाधारणतः तिरंदाजीत आवड असणारे खेळाडू ‘कंपाऊंड’ या प्रकाराचे धडे घेतात, मात्र यातील जास्त कठीण असणाऱ्या ‘रिकर्व्ह’ या प्रकारात साक्षीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.  केवळ काही वेळा मैदानावर जाऊन या खेळाची प्रात्यक्षिके पाहून तिला हा खेळ आवडायला लागला आणि तिने वरिष्ठ खेळाडू व प्रशिक्षक रणजीत चामले यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. तसे तिने दळवी सरांकडे अहमदनगरला देखील या खेळाचे मार्गदर्शन घेतले होते, पण चामले यांच्या अकादमीतच आता ती या खेळातील बारकावे शिकत आहे. रोज पाच ते सहा तास ती सराव करते आणि याच जोरावर ती आशिया चषकात सूवर्ण पदकाचे स्वप्न पहात आहे.

आशिया चषक स्पर्धेतील प्रवेशाद्वारे ती भारताबाहेर चौथी स्पर्धा खेळेल. सरावाला सुरुवात केल्यापासून केवळ सहा वर्षांतच देशाचे प्रतिनिधित्व करणारी साक्षी पहिलीच खेळाडू आहे. मध्ये एकदा तर तिने चमत्कारच करून दाखवला.  भारताची मानांकीत नेमबाज दीपिका कुमारी हिच्याच साक्षीने ६-० असा पराभव एका स्पर्धेत केला आणि तिथूनच तिची घोडदौड सुरू झाली. या एकाच विजयाने ती चर्चेत आली आणि तिची अकादमीसुद्धा. चामले यांची अकादमी पुण्यात शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. साक्षी याच अकादमीत सराव करते, आज तिने पुण्यातील जवळपास प्रत्येक खेळाडूला मागे टाकत आपला दबदबा निर्माण केला आहे. आजवर तिने दोन आंतरराष्ट्रीय पदकांसह एकूण १२० पदके पटकावली आहेत. बँकॉक येथील स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय रौप्य पदक मिळवले व त्यानंतर झालेल्या मनिला येथील स्पर्धेत तिला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. सध्या ती एका वर्षात साधारण तीन ते चार राष्ट्रीय स्पर्धा खेळते व सुमारे आठ ते नऊ इतर ट्रायल स्पर्धा खेळते.  आशिया चषक स्पर्धेत तिची निवड झाली असली, तरी तिला त्यानंतर होणाऱ्या वरिष्ठ जागतिक स्पर्धेतील पदकाचे वेध लागले आहेत.

सायबेज लक्ष्य या संस्थेची तिला बहुमोल मदत होत आहे आणि त्यांच्या पाठिंब्याचा जोरावरच ती यशाची एक-एक शिखरे पादाक्रांत करत आहे. आई आणि वडील यांचा तिला पुर्ण पाठींबा आहे. तिला या खेळात उज्ज्वल भविष्य आहे, असे तिचे प्रशिक्षक रणजीत चामले सांगतात. मात्र तिने खांदयाच्या दुखापतीकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे, कारण येत्या मोसमात तिला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

साक्षी अथक मेहनत घेत असली, तरी तिने शारीरिक तंदुरूस्तीकडे तितकेच लक्ष्य दयायला हवे. मोठया स्पर्धेत खेळताना ही तंदुरूस्तीच प्रत्येक खेळाडूला यशाची खात्री आणि आत्मविश्वास देत असते. या खेळात अशीच उत्तरोत्तर प्रगती साधत आशियाई, राष्ट्रकुल, जागतिक विजेतेपद आणि अखेर ऑलिंपिक असा प्रवास तिला करायचा आहे. ऑलिंपीक पदक हेच तिचे अंतिम उद्दीष्ठ आहे. मुळातच सैनिकी शाळेची पार्श्वभुमी असल्याने तिच्यात एक प्रकारची शिस्त आहे, हिच शिस्त आणि कामगिरी तिला येत्या काळात जागतिक किर्ती प्रदान करेल असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay varal About 232 Days ago
Well done sakshi
0
0

Select Language
Share Link