Next
घानातील ६० वर्षीय नागरिकावर ‘रूबी’मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आफ्रिका खंडातील घाना देशाचे नागरिक असलेल्या ६० वर्षीय नागरिकाला गंभीर हृदयरोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर येथील रूबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी घानातील एका ६० वर्षीय नागरिकाच्या महारोहिणीमध्ये फुगवटा झाल्यामुळे फुटण्याचा धोका बळावला होता आणि यासाठी वैद्यकीय उपचार गरजेचे होते. फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले; मात्र दोन वर्षांनंतर पुन्हा हीच परिस्थिती उद्भवली आणि ती यावेळी ती तीव्र स्वरूपाची होती. सतत खोकला आणि खोकल्यामुळे काही वेळेस रक्तातील छोट्या गुठळ्यादेखील बाहेर यायच्या. छातीत जड वाटू लागले आणि श्‍वसनाचा त्रास वाढत असल्याची तक्रार घेऊन ते ‘रुबी’मध्ये आले.

‘रुबी’मध्ये त्यांना पुढील चाचण्या करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. या विषयी अधिक माहिती देताना ‘रुबी’मधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी. एन. मखळे म्हणाले, ‘घानावरून आलेल्या या रुग्णाला एओरटिक अ‍ॅन्युरिझम (हृदयापासून रक्त नेणारी मुख्य रक्तनलिका किंवा महारोहिणीचा आकार दीडपटीहून अधिक वाढणे) झाला होता. म्हणजेच २०१७मध्ये त्यांना जे झाले होते तीच परिस्थिती पुन्हा ओढावली. यावेळी तिची तीव्रता अधिक होती व या स्थितीला एओरटिक अ‍ॅन्युरिझम विथ डायसेक्शन (महारोहिणीचा आतील भाग फाटून वेगळा होणे) असे म्हणतात. अ‍ॅन्युरिझम म्हणजे कुठल्याही आकाराच्या रोहिणीमध्ये फुगवटा होणे. कमकुवत झालेल्या रोहिणीमध्ये जात असलेल्या रक्ताचा दबाव वाढल्यावर असा फुगवटा होऊ शकतो. एओरटिक डायसेक्शन ही एक गंभीर स्थिती असून, यात महारोहिणीचा आतील स्तर फाटतो. यामधून रक्त बाहेर येते आणि यामुळे महारोहिणीतील आतील आणि मध्यभागी असलेले स्तर वेगळे होतात. रक्ताने भरलेल्या रोहिणी फुटल्या, तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.’

‘एओरटिक डायसेक्शन ही स्थिती सामान्यपणे आढळून येत नाही. दरवर्षी एक दशलक्ष लोकांपैकी पाच ते ३० लोक याने ग्रस्त होतात आणि ही स्थिती बहुधा वयस्कर पुरुषांमध्ये आढळते. एओरटिक डायसेक्शनने ग्रस्त असलेल्या प्रत्येकाला त्रासदायक व अचानक वेदना होतात. इतर लक्षणांमध्ये श्‍वसनाचा त्रास, बोलण्यात अचानक अडथळा, दृष्टी जाणे, शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे किंवा पक्षाघात होणे, चालण्यामध्ये त्रास किंवा सतत पाय दुखणे यांचा समावेश आहे,’ अशी माहिती डॉ. मखळे यांनी दिली.

‘रुबी’चे वरिष्ठ व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धनेश कामेरकर म्हणाले, ‘एओरटिक डायसेक्शन स्थितीचे निदान करण्यासाठी उच्च पातळीवरची अचुकता गरजेची असते, कारण छातीत दुखण्याला कारणीभूत असलेले इतर हृदयाचे आजार आहेत, का असा गैरसमज होऊ शकतो. तत्पर निदान हे महत्त्वाचे असते कारण यामध्ये तातडीने स्थितीचे मूल्यांकन करणे गरजेचे असते आणि त्याचबरोबर जगण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळण्यासाठी तत्पर उपचार करणे महत्त्वाचे असते. ही स्थिती दुर्मिळ असली, तरी वेळेवर उपचार न केल्यामुळे मृत्यूचा धोका बळावतो किंवा मेंदूशी निगडीत आजारदेखील होऊ शकतात.’

मुंबईतील व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल सेठ म्हणाले, ‘एओरटिक डायसेक्शन या स्थितीवर उपचारासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. पहिली म्हणजे पारंपरिक तंत्राद्वारे ओपन हार्ट शस्त्रक्रिया, तर दुसरीकडे कमीत कमी छेद असलेली व प्रभावी अशी एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया. एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला अनेक फायदे होऊ शकतात. कमीत कमी छेद वापरल्याने रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, हॉस्पिटलमधील कालावधी अधिक कमी होऊ शकतो, मृत्यू किंवा रोगग्रस्त स्थितीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि जखमेची खूण राहत नाही.’

पुढील उपचाराबाबत माहिती देताना डॉ. मखळे म्हणाले, ‘चाचण्यांद्वारे हे लक्षात आले की टाकलेली स्टेंट ही आपल्या आधीच्या स्थितीतून किंवा जागेतून विस्थापित झाली होती. स्टेंटच्या आधीच्या जागी गळती निर्माण झाली होती. यामुळे मांडीच्या सांध्यातून कॅथेटरद्वारे एंडोव्हॅस्क्युलर अ‍ॅन्युरिझम ही प्रक्रिया करणे सर्वांत प्रभावी उपाय होता. त्यामुळे आम्ही फुगवटा झालेल्या महारोहिणींमध्ये दोन स्टेंट टाकल्या. पहिली स्टेंट एओरटिक आर्च (चढणार्‍या व उतरणार्‍या वाहिन्यांमधील वाकलेल्या स्थितीत असलेली रोहिणी) व दुसरी स्टेंट त्याच्या खाली लावण्यात आली. खरंतर स्टेंटस बरीच वर्षे व्यवस्थित स्थितीत राहतात आणि बरेचदा आयुष्यभर व्यवस्थित राहतात; मात्र या रुग्णाच्या बाबतीत त्यांच्या असलेले जास्त वजन किंवा स्थुलता आधीचा स्टेंट बंद पडण्यामध्ये जोखमीचा घटक ठरला असू शकतो.’

‘रुबी’चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त व ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पी. के. ग्रांट म्हणाले, ‘पुढील काही दिवस त्यांच्यावर आम्ही देखरेख करणार आहोत. त्यांची प्रकृती आता सुधारत असून, काही दिवसांतच ते आपल्या देशी जातील. भारतातील हृदयरोग चिकित्सा क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा होत असून, ही केस हे अधोरेखित करते की, योग्य निदान आणि सर्व प्रकारच्या हृदयरोगांवर उपचार याद्वारे या क्षेत्रात एक अग्रणी संस्था म्हणून प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search