Next
नमिता कीर यांच्या ‘काळीजखोपा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
BOI
Saturday, September 08 | 03:47 PM
15 0 0
Share this story

काळीजखोपा या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना (डावीकडून) मधुसूदन नानिवडेकर, डॉ. महेश केळुसकर आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी :
‘नमिता कीर यांच्या कविता खूप उंचीवरच्या आहेत,’ असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी काढले. कीर यांच्या ‘काळीजखोपा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच रत्नागिरीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘कवीची महती मोठी असते, कवीचे लिहिणे परमेश्वराचे देणे असते,’ असे सांगून बहिणाबाईंपासून इंदिरा संतांपर्यंतच्या कवयित्रींची उदाहरणेही त्यांनी दिली.

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन हॉटेल लँडमार्क येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, ज्येष्ठ कवी व गजलकार मधुसूदन नानिवडेकर, ‘कोमसाप’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत परांजपे आणि जयू भाटकर उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रशांत परांजपे यांनी नमिता कीर यांच्या साहित्यप्रवासाचे वर्णन केले. यानंतर ‘काळीजखोपा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. नमिता कीर यांचा सत्कार करण्यात आला. ‘स्वत:ला स्वत:मध्ये उतरून अनुभव देणारी कला म्हणजे कविता,’ असे सांगून नमिता कीर यांनी आपण या काव्यसंग्रहाला ‘काळीजखोपा’ हे नाव का दिले, याबद्दल आपल्या मनोगतात भाष्य केले.

‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लेखक दडलेला असतो. जिथे जिथे मराठी भाषा आहे, तिथपर्यंत ‘काळीजखोपा’ पोहोचेल,’ असा विश्वास जयू भाटकर यांनी व्यक्त केला. ‘काळीजखोपा हा काव्यसंग्रह काळजाचे नाते सांगणारा आहे,’ असे गजलकार मधुसूदन नानिवडेकर म्हणाले. शशिकांत शिरोडकर यांनी ‘जखमाचे खोल घाव’ या कवितेबरोबरच ‘कवितेला वय वेळ नसते’, ‘व्याकुळ कोण कुणासाठी’ या कवितांचे रसग्रहण केले. 

‘कविता ही अशी गोष्ट आहे, की लिहिली गेली नाही तरी ती असते. समाजातील प्रत्येक विषयावर ‘काळीजखोपा’ या काव्यसंग्रहात कविता आहेत. काव्यसंग्रहातील कविता शुद्ध वर्तमान काळातील कविता आहेत. या कवितांना कवितांऐवजी कविती असा शब्द वापरावा,’ असे अरुणोदय भाटकर यांनी सांगितले.

केंद्रीय अध्यक्षपदी निवड झाली म्हणून महेश केळुसकर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. रमेश कीर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव, सुरेश ठाकूर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद, भारत शिक्षण मंडळ आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमात नमिता कीर यांनी त्यांच्या ‘कधीही येऊ दे’ या कवितेचे वाचन केले. सूत्रसंचालन विनय परांजपे यांनी केले. गौरी सावंत यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link