Next
‘आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव’ : प्रकाश जावडेकर
महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद; ‘खेलो इंडिया’चा शानदार समारोप
BOI
Wednesday, January 23, 2019 | 12:37 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार’, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ‘खेलो इंडिया’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी (२० जानेवारी) खेलो इंडियाच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी गतविजेत्या हरयाणाला मागे टाकत एकूण २२८ पदकांसह यजमान महाराष्ट्राने विजेतेपदाला गवसणी घातली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या वेळी विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला. देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘खेलो इंडिया’ या गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. यंदा या दुसऱ्या पर्वाचा मान महाराष्ट्राला मिळाला होता. या १२ दिवसीय क्रीडा महोत्सवाचे ९ ते २० जानेवारीदरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ३६ राज्यांमधील सहा हजार खेळाडू, एक हजार ८०० तांत्रिक अधिकारी तसेच एक हजारांहून अधिक संघटक आणि जवळपास ७५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ९५४ खेळाडूंचे पथक या महोत्सवात सहभागी झाले होते. एकूण १८ क्रीडा प्रकारांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला होता.   

याप्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, ‘या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळसुध्दा महत्त्वाचा भाग आहे. क्रीडांगणावर खेळताना निघणारा घाम हेच खेळाडूंचे खरे बक्षीस आहे.’

‘जगात हिंदुस्थान अव्वल व्हावा’ - विनोद तावडे
‘खेलो इंडियाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राज्याच्या क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. ही स्पर्धा यशस्वी झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पहिला आला याचा मनस्वी आनंदच आहे, मात्र जगात क्रीडा क्षेत्रात हिंदुस्थान अव्वल व्हावा हीच अपेक्षा आहे. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील प्रतिभाशाली खेळाडू पुढे आले असून तेच आपल्या देशाचा झेंडा जगात उंचावतील’, असा विश्वास या वेळी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

‘खेलो इंडिया’च्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र क्रीडा पथकाचे प्रमुख विजय संतान यांच्यासह खेळाडूंनी स्वीकारला. व्दितीय क्रमांकाचा चषक हरियाणा संघाला तर तृतीय क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीच्या संघाच्या पथक प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहुल भटनागर, ‘स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, ‘स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया’चे (साई) उपमहासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ‘ऑलिंपिक ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी तथा सहसचिव ओंकार सिंग, ‘स्टार स्पोर्ट्स’चे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक महाराष्ट्राच्या संघाला मिळाल्यानंतर कार्यक्रमस्थळी मोठा जल्लोष सुरू होता. पथक प्रमुखांनी महाराष्ट्राचे सर्व विजेते खेळाडू असलेल्या मंचावर चषक नेला आणि खेळाडूंन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, त्याला समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी जोरदार साथ दिली, त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ शिवछत्रपतींचा जयघोष दुमदुमत होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link