Next
‘खोडदमध्ये सीलिंग कायदा नको’
BOI
Thursday, May 25, 2017 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पखोडद : ‘जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पामुळे येथील ३० किलोमीटरच्या परिसरात मोठे उद्योगधंदे उभे राहू शकलेले नाहीत. या प्रकल्पास बाधा निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचे पर्यटन उद्योग केंद्र सरकारच्या वतीने येथे उभारण्यात यावेत,’ अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत केली.

‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यामधील खोडद येथे खगोल शास्त्रीय अभ्यासाकरिता केंद्र सरकारद्वारे जीएमआरटी प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प उभारताना सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनींचे संपादन केले होते. तसेच अनेक नागरिकांनी स्वेच्छेने या राष्ट्रीय प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पातील दुर्बिणीद्वारे उत्सर्जित रेडिओ लहरींना बाधा निर्माण होऊ नये याकरिता आसपासच्या ३० किलोमीटरच्या भागात मोठे उद्योग उभारण्यास मनाई करण्यात आली. तसेच यापूर्वीच खोडदमध्ये मोठ्या प्रमाणावर भू-संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे लागू करण्यात आलेला कमाल जमीन धारणा (सीलिंग) कायदा रद्द होणे आवश्यक आहे. हा प्रकल्प माझ्या मतदारसंघात आहे याचा मला अभिमान आहे; तरीदेखील स्थानिक नागरिकांना जीएमआरटी प्रकल्पामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या भागात मोठ्या उद्योगधंद्यांना मनाई असल्यामुळे अनेक स्थानिक तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे तेथील लोकांना या प्रकल्पाद्वारे वेगवेगळ्या प्रकारे लाभ मिळवून देणेही आवश्यक आहे.  या प्रकल्पाच्या निकषांच्या अधीन राहून या भागाच्या विकासासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडतील असे प्रकल्प सुरू करावेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण होतील व या प्रकल्पाच्या कामांनाही बाधा निर्माण होणार नाही,’ असे आढळराव म्हणाले.

‘या भागात मोठे औद्योगिक व्यवसाय नसल्यामुळे येथील नागरिकांना दर्जेदार रस्ते, शुद्ध पाणी व नियमित विद्युत पुरवठा आदी मूलभूत गरजा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. राष्ट्राचे हित जपणाऱ्या प्रकल्पांमुळे आसपासच्या भागाचा पायाभूत विकास होणे आवश्यक आहे. परंतु आजपर्यंत असे काही घडू शकले नाही, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालून शक्य तितक्या लवकर खोडद व जुन्नर परिसरात विकासाचे आर्थिक मॉडेल उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत व खोडद येथील जमिनी सीलिंग कायद्यातून वगळण्यात याव्यात,’ अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search