Next
आशा खाडिलकर यांच्या मैफलींची मेजवानी
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘स्वरदीपोत्सव’ दिवाळी पहाट मैफल
BOI
Tuesday, October 30, 2018 | 12:41 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : गायन कारकीर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या गायिका आशा खाडिलकर यांच्या ‘स्वरदीपोत्सव’ या दिवाळी पहाट मैफलींचे आयोजन चतुरंग प्रतिष्ठानने रत्नागिरी आणि चिपळूण येथे केले आहे. त्यामुळे कोकणातील रसिकांना ऐन दिवाळीत अभंग, नाट्यसंगीत, भक्ती अशी गानफराळाची मेजवानी मिळणार आहे.

या मैफली सात नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ५.४५ ते नऊ काविळतळी (चिपळूण) येथील माऊली सभागृह, तर आठ  नोव्हेंबरला पहाटे सहा ते नऊ या वेळेत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सभागृह येथे होणार आहेत. चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘कलासंध्या’, ‘आस्वादयात्रा’, ‘मुक्तसंध्या’, ‘दिवाळी पहाट’ यांसारख्या उपक्रमांद्वारे चिपळूण, रत्नागिरी, गोवा येथे अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली आहे. गेल्या २०-२२ वर्षांतल्या कलाकारांची संख्या सुमारे अडीचशेचा उंबरठा ओलांडून पुढे गेली आहे.

आपल्या दमदार गायकीच्या आणि सादरीकरणाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेल्या खाडिलकर प्रदीर्घ काळानंतर ‘चतुरंग’ मैफलीसाठी कोकणात येत आहेत. दीनानाथ मंगेशकर, माणिक वर्मा, पंडित यशवंतबुवा जोशी अशा दिग्गजांचा वारसा चालविणाच्या आशा खाडिलकर यांनी आपल्या अखंडित गानतपस्येची आणि अथक, अतुलनीय अशा सलग गानकारकीर्दीची ५० वर्षे याच वर्षी पूर्ण केली असून, त्या निमित्ताने या मैफलीत त्यांचा ‘चतुरंग’द्वारे कृतज्ञतापूर्वक सन्मान केला जाणार आहे.

‘दिवाळी पहाट’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे मूळ प्रारंभक (पायोनियर) असलेल्या ‘चतुरंग’ने गेल्या ३२ वर्षांत मुंबई, ठाणे, पुणे, चिपळूण, वहाळ, गोवा असा प्रवास करत सुमारे ४० हून अधिक दिवाळी पहाट आणि दीपसंध्या साकार केल्या आहेत. यावर्षी चिपळूणमध्ये आणि प्रथमच रत्नागिरीत आयोजित केलेल्या ‘स्वरदीपोत्सव’ या पहाट मैफलीत आणि गोव्यात होणाऱ्या ‘दोपसंध्या’ मैफलीत आशा खाडिलकर शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनासह भक्ती, अभंग, नाट्यसंगीत सादर करणार आहेत.

या तिन्ही ठिकाणी होणाऱ्या दिवाळी पहाट मैफलीत त्यांना मधुसूदन लेले (हार्मोनियम), गिरीधर कुलकर्णी (तबला), हेरंब जोगळेकर (तबला), दयेश कोसंवे (तबला), राया कोरगांवकर (ऑर्गन) हे साथसंगत करणार आहेत. या दिवाळी मैफलींचे निवेदन चिपळूणमध्ये धनंजय चितळे, रत्नागिरीत निबंध कानिटकर आणि गोव्यात गोविंद भगत करणार आहेत.

तिन्ही कार्यक्रमस्थळी हजारो पणत्या प्रज्वलित केल्या जाणार असून, शेकडो आकाशकंदिल, नयनरम्य रांगोळ्या या मैफलींची शोभा वाढवणार आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही पहाट मैफलींच्या देणगी प्रवेशिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर एक नोव्हेंबरपासून सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत चिपळूणमध्ये काणे बंधू हॉटेल (चिंचनाका), चतुरंग कार्यालय (बुरुमतळी), समई पेपर्स (काविळतळ) येथे उपलब्ध होतील. रत्नागिरीत हॉटेल खवय्ये (फाटक हायस्कूलसमोर), केळकर उपाहारगृह (मारुती मंदिर) आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय (जयस्तंभ) येथे मिळतील. गोव्यातील कार्यक्रम फोंडा येथील  राजीव गांधी कलामंदिर येथे ‘दीपसंध्या’ स्वरूपाचा होणार असून, सर्व रसिकांना तो विनामूल्य प्रवेशतत्वावर खुला राहील.

मैफलींविषयी :
दिवस :
सात नोव्हेंबर २०१८
वेळ : पहाटे ५.४५ ते सकाळी नऊ
स्थळ : माऊली सभागृह, काविळतळी, चिपळूण
दिवस : आठ नोव्हेंबर २०१८
वेळ : पहाटे सहा ते नऊ
स्थळ : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, जयस्तंभ, रत्नागिरी.
प्रवेशिका उपलब्ध : एक नोव्हेंबर २०१८ पासून
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सात 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link