पुणे : येथील बालरंजन केंद्राच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त
‘अनामप्रेम’ या दिव्यांग संस्थेमधील मुलांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (२९ जानेवारी) हा कार्यक्रम भारती निवास सोसायटीतील सहकार सदन येथे आयोजित करण्यात आला आहे.
बालरंजन केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणा भागातील भारती निवास सोसायटीच्या सहकार सदनमध्ये मंगळवारी (२९ जानेवारी) सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनामप्रेम ही संस्था १५ वर्षांपासून अंध, अपंग, अस्थिव्यंग, मुकबधीर अशा दिव्यांग मुलांसाठी काम करत आहे. त्यांची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली असून यासाठी संस्थेमार्फत ७० दिव्यांगांचे वसतीगृह चालवले जाते. आजवर संस्थेने ३७२ दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.
बालरंजन केंद्राच्या वतीने या संस्थेतील मुलांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामार्फत ‘अनामप्रेम’ संस्थेला मदतनिधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बालरंजन केंद्रातर्फे राबवला जाणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.