Next
‘चांगल्या नाटकात माणसाला समृद्धीकडे नेण्याची ताकद’
ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, July 22, 2019 | 04:28 PM
15 0 0
Share this article:

‘जीवन आणि नाटक’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. वामन केंद्रे.ठाणे : ‘उत्तम नाटक माणसाला समृद्धीकडे नेते. उत्तुंग अनुभूती देणारी कलाकृती निर्माण होण्यासाठी समाजाचे फार मोठे योगदान असावे लागते,’ असे उद्गार ज्येष्ठ दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे यांनी काढले.

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला-वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील एकोणिसावे पुष्प गुंफताना ते ‘जीवन आणि नाटक’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक,  संज्ञापन आणि पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. महेश पाटील, ‘युवाशिल्प’चे संपादक प्रा. संतोष राणे उपस्थित होते.

डॉ. केंद्रे पुढे म्हणाले, ‘नाटक समाजजीवनाचा आरसा आहे. पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणली जाते ते उत्कृष्ट नाटक होय. मराठी माणसे नाट्यप्रेमी आहेत. अनेक नाट्यकर्मी आणि दिग्दर्शकांना त्यांची दाद महत्त्वाची वाटते. व्यवस्थेच्या उभे राहून नाटक नेहमी आपला निषेध नोंदवित असते. सध्या माध्यमांनी माणसांचे आयुष्य संकुचित केले आहे. काय खायचे, काय प्यायचे, काय घालायचे, हे सर्व माध्यमेच सांगत आहेत. एक्सप्रेस कॉमेडीच्या नावाखाली सध्या जो काही धुडगूस घातला जात आहे, ते पाहून याला मनोरंजन का म्हणायचे हा प्रश्न पडतो. असेच कार्यक्रम सर्वत्र होत राहिले, तर आपल्याला आपली संस्कृती पुन्हा तपासून घ्यावी लागेल, असा समाज रसातळाला जायला वेळ लागणाऱ नाही.’

व्याख्यानाप्रसंगी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, प्रा. संतोष राणे, डॉ. महेश पाटील.

नाटक हे जीवनव्यापी असल्याचे सांगून प्राचार्या डॉ. नाईक यांनी नाटकाला आपण प्रयोग म्हणतो. जीवन हेही प्रयोगासारखे असते. प्रत्येक दिवशी नवा प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल पेठे यांच्या लेखाचा संदर्भ देऊन नवनिर्मितीचे बोन्साय होण्याच्या काळात प्रत्येकाची जबाबदारी वाढल्याचे नमूद केले. आड आटलेला आहे, पोहरा तुटलेला आहे. बोन्साय होण्यापासून वाचविण्यासाठी सृजनशीलतेची चौकट अधिक भक्कम करायला हवी,’ असे त्या म्हणाल्या. 

प्रारंभी प्राचार्यांच्या हस्ते डॉ. केंद्रे यांच्यासह विलास सांगुर्डेकर आणि चित्रकार सतीश खोत यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. वामन केंद्रे यांच्या हस्ते ‘युवाशिल्प’ या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युवाशिल्प’चे संपादक प्रा. संतोष राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search