Next
मुंबईतील पर्यटन : हुतात्मा चौक परिसर...
BOI
Wednesday, September 04, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हुतात्मा स्मारक‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईतील काळा घोडा परिसराची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या हुतात्मा चौकाच्या आसपासच्या भागाची. 
.........
मुंबईतील हुतात्मा चौक परिसरात ब्रिटिशकालीन वास्तू, व्यापारी संस्था, विविध बँका व शासकीय कार्यालये आहेत. या भागात ऐतिहासिक हुतात्मा चौकासह हॉर्निमन सर्कल, शेअर बाजार वगैरे ठिकाणे आहेत. नरिमन रोडच्या दक्षिणेकडील भाग यात समाविष्ट आहे.

हुतात्मा स्मारक चौक : महात्मा गांधी रस्ता, दादाभाई नौरोजी रस्ता आणि थोडे खाली वीर नरिमन रस्ता मिळतो, तो परिसर हुतात्मा स्मारक चौक या नावाने ओळखला जातो. चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन (कारंजे) आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे ही या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या चौकात हाती मशाल घेतलेल्या क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मुंबईत पोर्तुगीज आल्यावर त्यांनी किल्ला बांधला. पुढे इ. स. १६६८-१७१६ या कालखंडात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने त्याचा विस्तार केला. त्या वेळी किल्ल्याला तीन दरवाजे होते. पूर्वेकडील दरवाजा अपोलो गेट, उत्तरेस बझार गेट - म्हणजे सध्या ज्या ठिकाणी जीपीओ आहे तिथला भाग - आणि पश्चिमेकडील दरवाजा चर्चगेट या नावाने ओळखला जाऊ लागला. या चर्चगेटसमोर फ्लोरा फाउंटन हे शिल्पांकित कारंजे उभे केले गेले. मुंबईच्या विस्तारीकरणाच्या वेळी किल्ला पाडण्यात आला; पण या भागाचे फोर्ट हे नाव कायम राहिले. 

हुतात्मा चौक अमर ज्योती

हुतात्मा चौकातील अमर ज्योती :
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ब्रिटिश व्यवस्थेत असलेली राज्यांची फेररचना करण्याचे ठरविले. त्या वेळी जुना मुंबई इलाखा हा प्रांत महाराष्ट्र म्हणून करायचे ठरविण्यात आले. त्या वेळी राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यावर मोठा प्रक्षोभ उसळला आणि २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संध्याकाळी सर्व बाजूंनी लोक या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी येऊ लागले. त्या वेळच्या मोरारजीभाई देसाई यांच्या सरकारने हा मोर्चा मोडून काढण्याच्यासाठी बळाचा वापर केला व गोळीबारही केला. त्यात १०१ जण हुतात्मा झाले. इ. स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथे अमर ज्योतीची स्थापना करण्यात आली. 

फ्लोरा फाउंटन

फ्लोरा फाउंटन :
हे मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौकातील पाण्याचे कारंजे आहे. या कारंज्याची निर्मिती इ. स. १८६४मध्ये करण्यात आली. फाउंटन परिसरातील जमीन सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती. हे कारंजे डेव्हिड ससून यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयातच निवर्तलेल्या मुलीचे स्मारक म्हणून बांधले. पुढे या कारंज्यावरून एकंदरीत त्या भागालाच फ्लोरा फाउंटन असे नाव पडले. फ्लोरा हे एका रोमन देवतेचे नावही आहे. कृशेटजी फरदूनजी पारेख यांनी दिलेल्या देणगीच्या रूपात ग्रीन-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने फ्लोरा फाउंटनची निर्मिती केली. याचे डिझाइन रिचर्ड नॉर्मन शॉ यांनी केले होते व ले. जेम्स फोर्सिथ यांनी आयात केलेल्या पोर्टलँड दगडातून त्याची मूर्ती तयार करण्यात आली होती. रोमन देवीचा भव्य पुतळा संरचनेच्या शीर्षस्थानी स्थापित केला आहे. त्यामुळे कारंजे आणखी सुंदर दिसते. (याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दादाभाई नौरोजी पुतळादादाभाई नौरोजी पुतळा : या हुतात्मा चौकातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुतात्मा स्मारकाच्या उत्तरेकडे ओरिएन्टल इमारतीच्या बाहेर असणाऱ्या त्रिकोणी जागेत असलेला दादाभाई नौरोजी यांचा पूर्णाकृती आसनस्थ असा भव्य आकाराचा पुतळा. हा पुतळा १९२५मध्ये मुंबईचे ख्यातनाम शिल्पकार बी. व्ही. तलीम यांनी घडवलेला आहे. या ठिकाणी उठावदार बोधशिल्पे आहेत. त्यातील एका उठावशिल्पात म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटच्या पहिल्या भारतीयाच्या म्हणजे दादाभाईंच्या चरित्रावर आधारित प्रसंगाचे शिल्प आहे. तसेच दुसऱ्या बाजूला मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या दादाभाईंचे ‘मदर्स रिअली मेक नेशन्स’ हे वाक्य आणि शाळेत आई-मुलांना प्रवेश देणारे दादाभाई असा प्रसंग दाखवणारे उठावशिल्प आहे. 

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चसेंट थॉमस कॅथेड्रल चर्च : फ्लोरा फाउंटनपासून डावीकडे वीर नरिमन मार्गाने हॉर्निमन सर्कलपर्यंत जाता येते. हॉर्निमन सर्कलजवळील सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे पश्चिम भारतातील सर्वांत प्राचीन चर्च आहे. या चर्चची पायाभरणी १६७६मध्ये झाली होती आणि १७१८च्या ख्रिसमसच्या विशेष प्रसंगी या चर्चचा शुभारंभ झाला. या चर्चमुळेच चर्चगेटचे नाव पडले आहे. हे अत्यंत सुंदर असे ब्रिटिश वास्तुशिल्प आहे. युनेस्कोच्या वारसास्थळात याचा समावेश झाला आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल निओ-क्लासिकल आणि निओ-गॉथिक शैलीमध्ये बांधले आहे. या कॅथेड्रलचे अंतर्गत भाग आयर्लंडमधील सेंट थॉमस कॅथेड्रलप्रमाणे आहेत. 

अंतर्भाग नाजूकपणे प्लास्टर ऑफ पॅरिस, पॉलिश पितळ, काचेवर असलेली सुंदर चित्रे, कमानी खिडक्या यांनी सजविलेला आहे. आवर्जून पाहावे असे हे चर्च आहे. अठराव्या शतकात हॉर्निमन सर्कलजवळील सेंट थॉमस चर्च हा शून्य मैल आरंभबिंदू मानून मुंबईत प्रत्येक मैलावर पंचकोनी आकाराचे दगड बसविण्यात आले होते. जुन्या मुंबईची हद्द माहीम व शीवपर्यंत होती. 

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चचा अंतर्भाग

हॉर्निमन सर्कल

हॉर्निमन सर्कल गार्डन :
हे दक्षिण मुंबईतील सर्वांत मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. या उद्यानाच्या बाजूने शहराच्या प्रमुख बँका व विविध कार्यालयीन इमारती आहेत. या परिरसराच्या विकासकामास १८२१मध्ये सुरुवात झाली आणि १८४२मध्ये त्याचे काम संपले. १८२१मध्ये हॉर्निमन सर्कल गार्डनमधील बांधकामांचे काम सुरू झाले असले, तरी ते पुढील १२ वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. हॉर्निमन सर्कल गार्डनचा नारळाचा काथ्या, करवंट्या टाकण्यासाठी गैरवापर करण्यात आला. म्हणूनच तत्कालीन पोलिस आयुक्त चार्ल्स फोर्जेट यांनी या जागेला अनेक इमारतींनी वेढलेल्या वर्तुळात रूपांतरित करण्याची योजना सुरू केली. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि सर बार्टल फ्रियर यांनी या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला. अशा प्रकारे सर्वत्र सुसज्ज वॉकवेसह झाडे लावली गेली आणि बाग १८७७मध्ये पूर्ण झाली. गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांच्यानंतर या बागेला ‘एल्फिन्स्टन सर्कल’ हे नाव देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ‘बॉम्बे क्रॉनिकल’ वृत्तपत्राचे संपादक बेंजामिन हॉर्निमन यांचे नाव त्याला देण्यात आले. 

हॉर्निमन सर्कल

एशियाटिक सोसायटी :
हॉर्निमन सर्कलच्या पूर्व बाजूला या संस्थेची इमारत आहे. निओ क्लासिकल शैलीमध्ये त्याचे बांधकाम करण्यात आले असून, कर्नल थॉम कौपरन या आर्किटेक्टने याचे संकल्पचित्र (योजना आराखडा) बनविले होते. या इमारतीचे बांधकाम १८२०मध्ये सुरू झाले आणि सन १८३३मध्ये पूर्ण झाले. संपूर्ण सफेद रंगाच्या या इमारतीला ऐसपैस व्हरांडा आहे. या इमारतीला दर्शनी भागात सुरुवातीलाच ३० पायऱ्या असून, त्यावर डोरिक पद्धतीचे आठ स्तंभ आहेत. येथे असलेल्या ‘दरबार हॉल’मध्ये आजही व्याख्याने आयोजित केली जातात. ही संस्था कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी स्थापन केली. मुंबईचे शिल्पकार मानल्या गेलेल्या जगन्नाथ शंकरशेट यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे. या संस्थेच्या कार्यामध्ये नाना शंकरशेठ मुरकुटे यांनी आपले भरीव योगदान दिले. या संस्थेच्या माध्यमातून प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

एशियाटिक सोसायटी

या संस्थेचे मूळ नाव ‘बॉम्बे लिटररी सोसायटी’ असे होते. मुळात ही संस्था परळला गव्हर्नरच्या बंगल्यात स्थापन झाली. तेथे आता ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ आहे. या बंगल्यात एकटेच राहणारे तेव्हाचे गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या आश्रयाखाली सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्वतःचा विलायतेहून आणलेला ग्रंथसंग्रह या संस्थेच्या ग्रंथालयाला दिला. १८३० साली बांधण्यात आलेल्या टाउन हॉलच्या बिल्डिंगमध्ये या सोसायटीचा कारभार हलवण्यात आला. तेव्हापासून येथूनच सोसायटीचा कारभार चालतो आहे. ग्रंथालय स्थापनेच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दुर्मीळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. या संग्रहालयात एक लाखाहून अधिक ग्रंथ, अडीच हजार पोथ्या व हस्तलिखिते आणि १२००हून अधिक नकाशे आहेत. 

बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर१४व्या शतकातील दान्ते या इटालियन कवीची हस्तलिखित प्रत माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी या संग्रहाला दिली होती. ती आजही येथे बघण्यास मिळते. तसेच देश-परदेशातील अनेक लेखकांची हस्तलिखिते येथे आहेत. येथील सर्व ग्रंथाचे डिजिटायझेशन चालू आहे. पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या कुटुंबीयांकडून या थोर मराठी लेखकांची हस्तलिखितेही ‘एशियाटिक सोसायटी’ला मिळाली आहेत. हस्तलिखितांमध्ये अर्थातच जुन्या संस्कृत व प्राकृत पोथ्यांचा समावेश प्रामुख्याने आहे. हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ठेवा आता डिजिटल स्वरूपात जपला जाणार आहे. (एशियाटिक सोसायटीविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर  : रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा संग्रहालयाच्या थोड्या पुढे हा क्लॉक टॉवर आहे. बोमनजी होरमर्जी वाडिया  हे मुंबईचे शेरीफ होते. ते परोपकारी होते. त्यांचे १८६२मध्ये झाले. त्यांच्या स्मरणार्थ १८८०मध्ये हे स्मारक उभारण्यात आले. ते पारशी असल्यामुळे अग्नीच्या ज्वालांच्या आकाराच्या संरचनेसह टॉवर बांधण्यात आला होता. त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. (याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय :
नरिमन स्ट्रीटवर हे संग्रहालय आहे. भारत हा जगातील सुरुवातीच्या काळातील नाणे वापरणारा देश होता. इतिहासामध्ये नोंदविलेल्या अनेक आर्थिक प्रयोगांचे हे घर आहे. या वारशाचे दस्तऐवजीकरण आणि जतन करणे हे आरबीआय मॉनेटरी म्युझियमचे उद्दिष्ट आहे. संग्रहालयात भारतीय नाणी, कागदी चलन, सोन्याच्या पट्ट्या, अन्य आर्थिक साधने आहेत. भारत व आसपासच्या प्रदेशातील आर्थिक उत्क्रांतीबद्दल संशोधन आणि अभ्यास प्रसारित करण्याचे याचे उद्दिष्ट आहे. उत्खननात मिळालेली जुन्नर पैठण भागातील सातवाहन काळातील नाणी येथे पाहायला मिळतात. 

मुळजी जेठा कारंजेमुळजी जेठा कारंजे : मिंट चौकामध्ये १२० वर्षांपूर्वी धरमसी मुळजी यांच्या १५ वर्षांच्या मुलाचे मृत्यूनंतर त्याच्या समरणार्थ हे कारंजे बांधण्यात आले. आर्किटेक्ट एफडब्ल्यू स्टीव्हन्स यांनी याचे संकल्पचित्र केले होते. कारंज्याच्या शिखरावर मुलाचे शिल्प आहे. तसेच ४२ प्राण्यांच्या तोंडाची शिल्पे आहेत. काळा घोडा उत्सव समिती आणि आर्किटेक्ट विकास दिलावरी यांच्या प्रयत्नातून यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. 

बॅलार्ड इस्टेट : हा भाग बॅलार्ड पियर म्हणूनही ओळखले जाते. इंदिरा गोदीजवळच (अलेक्झांड्रा गोदी) हा भाग आहे. बॅलार्ड इस्टेट परिसरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत. हा जुना युरोपियन शैलीचा बाजार भाग आहे. हा भागही पूर्वीच्या किल्ल्यात होता. जहाज शिपिंग कंपन्यांची कार्यालये आणि पोर्ट हाउस येथील मुंबई पोर्ट ट्रस्टचे मुख्यालय आहे. कर्नल जे. ए. बॅलार्ड मुंबई पोर्ट ट्रस्टचे संस्थापक होते. त्यांचे नाव या भागाला दिले आहे. जॉर्ज विट्टेट यांनी या ठिकाणी व्यावसायिक इमारतींची रचना केली आणि युरोपियन नवनिर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून एडवर्डियन निओक्लासिकल शैलीमध्ये याची उभारणी केली. येथे असल्यावर लंडनमध्ये असल्याचा भास होतो, असे म्हणतात. 

बॅलार्ड इस्टेट

अलेक्झांड्रा डॉक्स (इंदिरा डॉक) :
सन १६६८मध्ये रॉयल चार्टरद्वारे मुंबई बेट आणि बंदर इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केल्यानंतर, कंपनीने बंदराच्या विकासास सुरुवात करून कस्टम हाउस, गोदाम, ड्राय डॉक्स, अलेक्झांड्रा डॉक्स इत्यादींचे बांधकाम हाती घेण्यात आले. सन १८१३मध्ये व्यापार प्रोत्साहित करण्यासाठी ब्रिटिश संसदेच्या कायद्याने कंपनीची त्यावरील मालकी संपविली. मुंबई बंदरातील कारभार चालविण्यासाठी स्वायत्त पोर्ट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सुएझ कालवा सुरू झाल्याने मुंबईच्या सागरी व्यापारात क्रांती घडली. पूर्व किनारपट्टीपासून आयात-निर्यातीचा व्यापार तेथून हलविला आणि मुंबई बंदर भारताचे मुख्य गेटवे झाले. सन १९७२मधे इंदिरा डॉक असे याचे नामांतर करण्यात आले. 

शेअर बाजारमुंबई शेअर बाजार : फिरोजी जीजीभॉय टॉवर्स हे या इमारतीचे मूळ नाव. सध्याच्या या इमारतीचे बांधकाम १९७०मध्ये सुरू झाले आणि १९८०मध्ये पूर्ण होऊन या नवीन इमारतीमध्ये शेअर बाजाराची सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराला देशाच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक वर्तुळात मोठे महत्त्व आहे. प्रेमचंद रायचंद हे भारतातील पहिले शेअर ब्रोकर होते. प्रेमचंद रायचंद यांच्यासह चार गुजराती आणि एका पारशी शेअर ब्रोकरने सुरुवातीला १८५५च्या सुमारास टाउन हॉलच्या समोरील वडाच्या झाडाखाली बसून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात दलालांची संख्या वाढू लागली. त्यामुळे १८७५मध्ये या दलालांनी एकत्र येऊन दी नेटीव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी दलाल स्ट्रीटवर एक कार्यालयही खरेदी केले. हेच कार्यालय सध्या मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखले जाते. शेअर बाजारासंदर्भात बुल (बैल) हा शब्द नेहमी वापरला जातो. शेअर बाजाराच्या इमारती बाहेर बैलाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजार हा जगातील ११ व्या क्रमांकाचा शेअर बाजार मानला जातो. (शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील मार्गदर्शन करणारे साप्ताहिक सदर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कसे जाल हुतात्मा चौक परिसरात?
हुतात्मा चौक परिसर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून चालत जाण्याएवढा जवळ आहे.

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 17 Days ago
छान माहिती
0
0

Select Language
Share Link
 
Search