Next
कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापरासंदर्भात जनजागृती
पर्यावरण दिनानिमित्त ‘आरयूआर ग्रीनलाइफ’ आणि ‘टेट्रा पॅक’चा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, June 05, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आरयूआर ग्रीनलाइफ आणि टेट्रा पॅक इंडिया यांच्यातर्फे ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाअंतर्गत वांद्र्यातील सुपारी टँक पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत टीमला शाळांच्या सुशोभिकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. यात शाळांच्या भिंती आकर्षक रंगांनी रंगविण्यात आल्या; तसेच वापरलेल्या पेयांचे कार्टन्स आणा आणि त्यापासून अशा शाळांसाठी बाके बनवण्यात साह्य करा, असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने मुंबईच्या कानोकोपऱ्यातील स्वयंसेवक एकत्र आले होते. यात विद्यार्थी, आरयूआर ग्रीनलाइफचे सदस्य, परिसरातील रहिवासी आणि ‘चल रंग दे’च्या (मुंबईतील झोपडपट्ट्यांचा कायापालट करण्यासाठी प्रसिद्ध असलेली मुंबईस्थित ना-नफा तत्वावरील संस्था) कार्यकर्त्यांचा समावेश होता.


पेयांच्या कार्टन्सपासून वर्गातील बाक कसे बनवले जातात ही प्रक्रिया शाळेच्या भिंतींवर आकर्षक चित्रांच्या रूपात मांडण्यात आली. प्रत्येक नागरिकाने फक्त नजीकच्या डिपॉझिट सेंटरमध्ये आपले कार्टन्स जमा केल्यास शेकडो वंचित मुलांच्या आयुष्यात कसा सकारात्मक फरक पडू शकतो, याची कथा शाळेच्या भिंतींवर चितारण्यात आली.

सुपारी टँकची ही एकमेव पालिका शाळा वापरलेल्या कार्टन्स जमा करण्याचे ड्रॉप-ऑफ पॉइंट आहे. इथे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील कर्मचारी नियमितपणे पुनर्वापरसाठी वापरलेले कार्टन्स गोळा करतात. शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केल्या जाणाऱ्या पाच सप्टेंबर २०१८ रोजी ‘टेट्रा पॅक’ने सुपारी टँक शाळेला संपूर्ण फर्निचर पुनर्वापरातून बनवलेला वर्ग भेट दिला. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या एच-वेस्ट वॉर्डाचे सहायक पालिका आयुक्त शरद उघाडे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शहरातील अधिकाधिक शाळांना या उपक्रमाचा लाभ मिळण्यासाठी पूर्ण साह्य करण्याचे जाहीर केले.


बाके दान करणे हा ‘टेट्रा पॅक’च्या कागदाने बनलेल्या कार्टन्सच्या पुनर्वापराला चालना देणाऱ्या ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाचा भाग आहे. आरयूआर ग्रीनलाइफ, सहकारी भंडार आणि रिलायन्स रिटेल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो. आरयूआर ग्रीनलाइफ हा या उपक्रमाचा अंमलबजावणी भागीदार आहे. त्यांच्यातर्फे मुंबईकरांना वापरलेले टेट्रा पॅक कार्टन्स निवडक सहकारी भंडार आणि रिलायन्स रिटेलमध्ये असलेल्या ड्रॉप-ऑफ पॉइंट्सवर जमा करण्याचे आवाहन करण्यासाठी विविध ग्राहक जागरूकता आणि शिक्षण कार्यक्रम राबवले जातात. जमा केलेल्या कार्टन्सपासून वर्गातील बाक, वह्या, बागेतील बाक, पेन स्टँड, परीक्षेचे पॅड आणि इतर अनेक आकर्षक वस्तू बनवून त्या वंचित गटातील मुलांसाठी शाळांना दान केल्या जातात.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरयूआर ग्रीनलाइफ आणि ‘टेट्रा पॅक’तर्फे चेंबूरमधील डायमंड गार्डनजवळच्या सुभाष नगरपालिका शाळेत सायंकाळी चार ते सात या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search