Next
‘व्यक्तिमत्व बहरण्यासाठी कला-क्रीडा उपयुक्त’
प्रेस रिलीज
Monday, February 26 | 05:10 PM
15 0 0
Share this storyपुणे :
‘आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी कला, क्रीडा अतिशय महत्वाचे ठरतात. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात कला जोपासण्याला, खेळण्याला विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यायला हवे. कला आणि खेळाच्या माध्यमातून आपण राष्ट्र उभारणीसाठी योगदान दिले पाहिजे,’ असे मत संगीतकार आदिनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडरग्रॅज्युएट) आयोजित ‘एन्थुझिया’ व ‘स्पोर्ट फिएस्टा’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. रवीकुमार चिटणीस, गायिका सीमा लिमये, प्रा. अंजली साने, ‘एन्थुझिया’च्या समन्वयिका प्रा. पल्लवी आद्य, ‘स्पोर्ट फिएस्टा’चे समन्वयक प्रा. सचिन शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘एन्थुझिया’मध्ये गायन, नृत्य, पथनाट्य व रॉक बँड हे सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवस्थापन विभागात वादविवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धा, ट्रेजर हंट आणि गेम्स घेण्यात आल्या. ‘स्पोर्ट फिएस्टा’मध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉल स्पर्धा झाल्या. सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाला मिळाले. विजेत्या स्पर्धकांना जवळपास दीड लाख रुपयांची पारितोषिके, सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पुण्याच्या ग्रामीण भागासह, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जवळपास ११०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

निखिल कानिटकर म्हणाले, ‘आपले ध्येय गाठण्यासाठी नियमित सराव आणि प्रयत्न केला पाहिजे. अपयशाला सामोरे जाण्याची आणि त्यातून नवीन शिकण्याची कला आपण अवगत केली पाहिजे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक समाधानही मिळते.’

डॉ. रवीकुमार चिटणीस यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मार्गदर्शन केले. हिमांशू दासवानी यांनी सूत्रसंचालन केले. ऐश्वर्या भालेराव हिने आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link