Next
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत विजेते
प्रेस रिलीज
Saturday, March 23, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:पुणे : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई इंडिया) ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ निर्मितीची ‘एसएई तिफण २०१९’ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी गौरविण्यात आले.

सांगलीच्या पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना द्वितीय, तर कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांना तृतीय क्रमांक मिळाला. ‘एसएई इंडिया’ने जॉन डिअर, कमिन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर, बीकेटी, अलटायर, आन्सीस, एआरएआय यांच्या सहकार्याने या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशातील २६ महाविद्यालये सहभागी झाली होती.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, ‘आयएसएई’चे अध्यक्ष डॉ. इंद्र मणी, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. डी. डी. पवार, जॉन डियर टीसीआयचे वरिष्ठ सरव्यवस्थापक ट्रॉयडेन क्रुझ, जॉन डियर इंडियाचे मॉड्युल इंजिनीअरिंग प्रमुख नीलेश पाठक, जॉन डियरचे सरव्यवस्थापक आणि ‘तिफण २०१९’चे समन्वयक संदीप महाजन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. शेतातील कांदा सहज काढण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असे ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ हे यंत्र निर्मितीचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन ही स्पर्धा झाली. अभिनवता, उत्पादकता, इंधनाची बचत, निर्मिती खर्च, यंत्र वापरातील सहजता या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी परीक्षण केले. या स्पर्धेचे उद्घाटन १८ मार्चला झाले. संदीप महाजन यांनी स्वागत केले. अभिनव वराडे यांनी स्पर्धेची माहिती दिली. संजय निबंधे यांनी ‘एसएई  इंडिया’चा स्पर्धा आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. नीलेश पाठक यांनी ‘ऑफ हायवे बोर्ड’च्या कामाची माहिती दिली.कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांपुढील आव्हानांचा उल्लेख करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव देणाऱ्या या अभिनव स्पर्धेचे कौतुक केले.

बेस्ट डिझाइन पारितोषिक अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेस्ट कॉस्ट पारितोषिक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (जबलपूर), बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी पारितोषिक छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (औरंगाबाद), बेस्ट सेल्स-मार्केटिंग पारितोषिक दयानंद सागर विद्यापीठ (बंगळुरू), बेस्ट फ्युएल इकॉनॉमी पारितोषिक डॉ. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (राहुरी) यांना मिळाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search