Next
प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी
पुलोत्सव सन्मान विक्रम गोखले यांना
BOI
Wednesday, December 05, 2018 | 10:44 AM
15 0 0
Share this story

प्रियांका बर्वेरत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या सासुरवाडीत म्हणजेच रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’तर्फे होणारा पुलोत्सव यंदा ‘पुलं’च्या जन्मशताब्दीमुळे अधिक उत्साहाने होणार आहे. सात ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. यंदाचा पुलोत्सव सन्मान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार गायिका, अभिनेत्री प्रियांका बर्वे हिला जाहीर झाला आहे. पुलोत्सवादरम्यान रत्नागिरीकरांना उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून, पुरस्कारांचे वितरणही तेव्हाच होणार आहे. 

आठ नोव्हेंबरला ‘आर्ट सर्कल’ने दीपोत्सवाचे आयोजन करून ‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात केली. आता सात डिसेंबरपासून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पुलोत्सवाला सुरुवात होणार आहे. सात डिसेंबर रोजी सायंकाळी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते आणि पुण्यातील ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीत पुलोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार सोहळ्यानंतर सुप्रिया चित्राव त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सशक्त अभिनयाने मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे, तसेच सामाजिक भान राखूनही त्याबद्दल क्वचितच बोलणारे विक्रम गोखले या मुलाखतीदरम्यान रत्नागिरीकरांशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. 

विक्रम गोखलेविनोदी लेखनाबरोबरच काव्य, चिंतन, सामाजिक भान अशा वेगवेगळ्या विषयांवर ‘पुलं’नी विपुल लेखन केलेले आहे. अशाच ‘हटके पुलं’चं दर्शन ‘अपरिचित पुलं!’ या कार्यक्रमातून त्या दिवशी होणार आहे. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि चंद्रकांत काळे यांच्यासोबत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. 

रशियन नाटककार व्हॅलदलीन दोझोत्सेव यांच्या ‘पुलं’नी रूपांतरित केलेल्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचे सादरीकरण आठ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. मूळ रशियन नाटकाचे भारतीय रूपांतरण करताना ‘पुलं’नी चपखलपणे येथील परंपरांचा आणि राजकीय प्रवाहाचा वापर करून या नाटकाच्या कथेची नाळ भारतीय मनांशी जोडण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले होते. हे नाटक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक भूमिकांचा सजगपणे विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. म्हणूनच आजच्या युगामध्येही त्याचे संदर्भ टिकून आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन सचिन जोशी यांनी केले असून, राजेश देशमुख, सुनील अभ्यंकर, मंजिरी साने, डॉ. विवेक बेळे हे कलाकार हा प्रयोग सादर करतील. ‘पुलं’च्या सामाजिक जाणिवेचा पैलू अधोरेखित करणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार त्याच दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. 

नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गायिका, अभिनेत्री प्रियांका बर्वे हिला पुलोत्सव तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका मालती पांडे यांची ती नात आणि शिष्या! गायनाचे धडे आजीकडून गिरवत तिने स्वरांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. ‘संगीत सम्राट’सारख्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली प्रियांका मालिकांच्या शीर्षक गीत गायनातून लोकप्रिय झाली आहे. काही मराठी चित्रपटातील गीतांसाठीही तिने पार्श्वगायन केले आहे. मराठी संगीत रंगभूमीवरही तिने गायिका-अभिनेत्री म्हणून ठसा उमटवला आहे. फिरोज खान निर्मित व दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’च्या भव्य नाट्य रूपांतरामध्ये अनारकलीची भूमिका साकारून प्रियांकाने गायन आणि अभिनयातील क्षमता सिद्ध केली आहे.  

त्यानंतर ‘गुण गाईन आवडी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. स्वरांवर ‘पुलं’चं जीवापाड प्रेम. जिथे जिथे त्यांना निर्मळ, सच्चा आणि शुद्ध सूर गवसला त्या त्या प्रत्येक कालावंताला ‘पुलं’नी शब्दबद्ध केले आहे. अशा दिग्गज कलावंतांवर ‘पुलं’नी लिहिलेली निवडक व्यक्तिचित्रे आणि गाणी यांची एक प्रसन्न मैफल म्हणजे गुण गाईन आवडी! सुप्रिया चित्राव यांनी याचे संकलन केले असून, प्रसिद्ध गायक विजय कोपरकर आणि प्रियांका बर्वे, अभिनेते तुषार दळवी आणि सुप्रिया चित्राव हे कलाकार ही मैफल सादर करणार आहेत. 

‘पुलोत्सवा’चा सर्व रत्नागिरीकर रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक, पुणे’ यांनी केले आहे.

(‘पुलं’चे आणि ‘पुलं’विषयीचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्यातील पिता-पुत्राचे नाते उलगडणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link