Next
सक्तीने नव्हे, आसक्तीने वाढते भाषा
BOI
Monday, July 01, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली. मराठीच्या सक्तीसाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली; पण मराठी नुसती टिकवायची नव्हे तर ती वाढवायची असेल, तिला अधिक समृद्ध करायची असेल, तर तिची सक्ती नव्हे, तर तिच्या आसक्तीची गरज आहे. 
...........
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली. यामुळे अनेकांना उत्साहाचे भरते आले आणि अनेकांनी या ग्वाहीचे स्वागत केले. त्याही पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी मराठीच्या सक्तीसाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील, अशी घोषणाही केली.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला कारण झाले ते राज्यातील काही साहित्यिकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे. फडणवीस यांच्या घोषणेनंतर तीन दिवसांनी, २४ जून रोजी, या साहित्यिकांनी आझाद मैदानावर आंदोलनही केले. त्यावर विधिमंडळात प्रश्नोत्तरे झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आधीच्याच धोरणाचा पुनरुच्चार केला. कारण मुळात अशा प्रकारे मराठी शिकविण्याची सक्ती आधीपासून अमलात आहेच. राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे आहे. शालान्त परीक्षा मंडळ, आयसीएससी आणि सीबीएसई हे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमध्येही मराठी भाषा शिकवणे सक्तीचे आहे. तरीही आपल्याकडे काही जणांचे समाधान होत नाही.

गेल्या महिन्यात त्रिभाषा सूत्रावरून असाच गलबला उठला होता. भारतात त्रिभाषा सूत्र १९६८पासून लागू आहे; मात्र त्याची अंमलबजावणीच होत नाही. त्रिभाषा सूत्र आणि मराठीची सक्ती या दोन्हींचे दुखणे एकच आहे. ते कागदावर आहेत; पण व्यवहारात नाही. शिवाय तमिळनाडू असो किंवा महाराष्ट्र, कर्नाटक असो किंवा बंगाल - त्या त्या राज्यांतील सक्तीला परभाषेच्या द्वेषाची डूब आहे.

वास्तविक अशा प्रकारे लहान मुलांवर मातृभाषेची सक्ती करावी लागणे हेच अपमानास्पद आहे. कोणत्याही लहान मुलाच्या दृष्टीने घर आणि शाळा हेच भाषेचे बीज रुजविणारे घटक असतात. मुले घरी मातृभाषा शिकतात आणि शाळेत अन्य विषय. या अन्य विषयांमध्ये अन्य भाषाही आल्या. मातृभाषेतून नवीन गोष्टी शिकणे त्यांना सोपे जाते, हे बहुतेक शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी स्वभाषेचे संस्कार झाले, तर पुढची कथा घडण्याचे काही कारणच नाही. आपल्याकडे मुलांवर, विद्यार्थ्यांवर आजूबाजूच्या वातावरणाने हिंदीचे संस्कार घडतात. हिंदी शब्द आणि वाक्प्रचार कानावर पडल्याने तोंडी रुळतात. हेच जर मराठीबाबत घडले तर सक्तीची वेळ कशाला येईल?

राहता राहिला प्रश्न इतर भाषेच्या द्वेषाचा. तर त्याला उत्तर हे, की माणसाच्या ज्ञानाची भूक त्याला दूर-दूर जायला लावते. तेथे दुसरी संस्कृती शिकण्यासाठी, तेथील साहित्य व ज्ञान समजण्यासाठी स्थानिक भाषा शिकावी लागते. हीच बाब ओळखून युरोपीय संसदेने युरोपीय विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकवाव्यात अशा ठराव मंजूर केला होता. आता युरोपमधील बहुतांश विद्यार्थी आठव्या-नवव्या वर्षापासून पहिली परदेशी भाषा शिकणे सुरू करतात. नॉर्वे, माल्टा आणि लक्झेंबर्ग यांसारख्या देशांत सहाव्या वर्षीच पहिली परदेशी भाषा शिकवायला सुरुवात होते. बेल्जियम आणि स्पेनमध्ये ही वयोमर्यादा तीन वर्षांपर्यंत खाली आणण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना छोट्या भाषा शिकविणे सोपे आहे, म्हणून तेथे दोन भाषांचे किंडरगार्टन लोकप्रिय होत आहेत.

अमेरिका किंवा युरोपमध्ये बहुभाषकता रुजविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अमेरिकेचे नेते स्पॅनिशचा अंगीकार करून इंग्रजीच्या एकाधिकाराला एक प्रकारे नाकारत आहेत. दुसरीकडे युरोपने तर बहुभाषकता हे आपले धोरण बनवले आहे.

याच्या उलट भारतात बहुभाषकता मुळापासून वर आलेली आहे. येत्या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. पंढरीच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात. त्यात तेलुगू आणि कन्नड भाषकांची संख्या मोठी असते. हे भाविक आज नाही, तर शेकडो वर्षांपासून येत आहेत. तरीही भाषेवरून त्यांच्यात कधी वैमनस्य निर्माण झाल्याचा इतिहास नाही. हरिद्वारपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून रामेश्वरपर्यंत पसरलेल्या भारतात हे दृश्य कुठेही दिसेल. 

मराठी अस्मिता, मराठी अस्मिता असा जयघोष आपण नेहमी करतो. यातील अस्मि हा शब्द संस्कृतमधील ‘मी आहे’ असे सांगणारा आहे. याचाच अर्थ अस्मिता म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव, आपल्या अस्तित्वाची अभिव्यक्ती. ही अभिव्यक्ती करण्यासाठी कोणावर सक्ती करावी लागणे हे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद आहे. खरे तर नवीन पिढीत मराठीचे संस्कार रुजविण्यासाठी सक्ती नव्हे तर आसक्ती हवी. केवळ कोणीतरी आपल्या बोकांडी मारली म्हणून मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ती कधीही आपली वाटणार नाही. ‘मराठी ही देशातील सर्वांत प्राचीन भाषांपैकी एक असून, ती अत्यंत समृद्ध भाषा आहे. मला लागणारे जीवनाचे बहुतेक सर्व ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे तिचा अभ्यास केल्याने आपण ज्ञानसमृद्ध होऊ,’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. ती कायद्याच्या अदृश्य छडीने नव्हे तर शब्द, वाक्प्रचार आणि म्हणींचा लळा लावल्यानेच होणार आहे.

दुर्दैवाने भारतात देशी भाषांच्या विकासाकडे जास्त लक्ष देण्यातच आले नाही. इंग्रजीचे महत्त्व केवळ संपर्काची भाषा म्हणून तर वाढले आहेच; पण समाजाच्या वरच्या थरात जाण्यासाठी, अधिक मानसन्मान मिळण्यासाठीही वाढले आहे. त्यामुळे देशी भाषांवर संकट आले आहे. फार वर्षे झाली नाहीत, ‘मराठी भाषा वाचते का मरते’ ही चर्चा नित्याची बाब होती. त्या वेळी कोणत्या सरकारने मराठी बोलू नका, लिहू नका किंवा शिकू नका असा फतवा काढला होता? कोणीच नाही. फक्त मराठी बोलणे, शिकणे हे ‘डाउनमार्केट’ असल्याचा ग्रह उच्च वर्गात होता. ‘महाजनो येन गतः स पन्थाः’ या न्यायाने सामान्य लोकांनीही तीच चाकोरी धरली.

...मात्र पुन्हा एकवार नियतीने हस्तक्षेप केला आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रसार झाला. मुंगीच्या पावलांनी मराठी या नव्या माध्यमांमध्ये शिरली आणि बघता-बघता पसरली. जगभरात पसरलेल्या मराठी जनांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आपल्या भाषेचा आश्रय घेतला. आज परिस्थिती अशी आहे, की इ. स. २०२१पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू भाषक वापरकर्त्यांचे प्रमाण ३० टक्के असेल, असा अंदाज आहे. आता हे कोणी बळजबरी केली म्हणून घडले का लोकांच्या स्वभाषेच्या आंतरिक उमाळ्यातून घडले? जो जिव्हाळा, लळा किंवा उमाळा आंतरजालाच्या पडद्यावर दिसतो, तो शिक्षणात आणण्यासाठी बळजबरी?

खरे तर महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सातत्याने लागत असल्या, तरी सुदैवाने अद्याप मातृभाषेच्या प्रेमाची टंचाई नाही. म्हणूनच तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गेलेली मुले मराठी शाळांमध्ये परतत आहेत. नव्या-नव्या माध्यमांमध्ये मराठीचे आविष्कार घडत आहेत. मराठी नुसती टिकवायची नाही तर ती वाढवायची असेल, तिला अधिक समृद्ध करायची असेल तर तिची सक्ती नव्हे, आसक्ती हवी. भाषा तेव्हाच वाढेल.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 22 Days ago
People learn a language when they feel the need . Even during the days of the Raj, there was no Compulsion to learn English . Yet , people learnt it because they thought : it will them . That is the real in incentive .p
0
0

Select Language
Share Link
 
Search