Next
आपल्या भाषा ही संधी साधणार का?
BOI
Monday, February 12 | 06:45 AM
15 0 0
Share this story

इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या युगातही वर्तमानपत्रांची विक्री सातत्याने वाढतच आहे, या वास्तवावर ‘आयआरएस’च्या ताज्या सर्वेक्षणाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच, सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या पहिल्या वीस वृत्तपत्रांमध्ये केवळ एकच इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदीसह प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रांची वाचकसंख्या इंग्रजीपेक्षा कितीतरी अधिक आहे. आजही ९० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांना आपल्या भाषेतच बातम्या वाचायला आवडतात. भारतीय भाषांतील वृत्तपत्रांनी या संधीचा लाभ घ्यायला हवा... 
.........
भारतीय वाचक सर्वेक्षणाची (आयआरएस) ताजी आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून, ही आकडेवारी सुखद धक्कादायक आहे. वर्तमानपत्रांची विक्री सातत्याने वाढतच आहे, या वास्तवावर या सर्वेक्षणाने शिक्कामोर्तब केले आहे. छापील माध्यमांच्या (म्हणजे वर्तमानपत्रांच्या) वाचकसंख्येत घट होईल, असा अंदाज गेल्या काही वर्षांपासून अनेक जण वर्तवत होते. त्याला कारण होते आधी टीव्ही, नंतर ऑनलाइन माध्यमे आणि आता सोशल मीडियाचा वाढता प्रभाव; मात्र तो अंदाज या अहवालाने सपशेल खोडून काढला आहे. 

दी रीडरशिप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडिया (आरएससीआय) आणि मीडिया रिसर्च युजर्स कौन्सिल (एमआरयूसी) या संस्थांनी एकत्रितपणे हे सर्वेक्षण केले. त्यासाठी सुमारे चार लाख लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी तीन लाख १९ हजार मुलाखतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. शहरी भागांतील २.१४ लाख आणि ग्रामीण भागांतील १.१६ लाख घरांना संस्थांच्या प्रतिनिधींनी भेटी दिल्या. या संबंधात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘एमआरयूसी’चे चेअरमन आशिष भसीन यांनी म्हटले आहे, ‘या अहवालाच्या निष्कर्षानुसार, १२ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ३९ टक्के भारतीय वृत्तपत्रे वाचतात. तसेच ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरातील वर्तमानपत्रांच्या वाचकांपैकी २० टक्के वाचक ऑनलाइन बातम्या वाचतात. त्यामुळे मुद्रित माध्यमांसाठी भविष्य उज्ज्वल असल्याचे या आकड्यांवरून आपल्याला दिसते.’ 

गेल्या तीन वर्षांत वाचकांच्या संख्येत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. वृत्तपत्रांच्या वाचकांची संख्या २०१४ साली ३० कोटी होती. ती आता ४१ कोटींवर गेली आहे. तीन वर्षांपूर्वी ग्रामीण भारतात वृत्तपत्रे वाचणाऱ्यांची संख्या १५ कोटी होती. ती आता वाढून १९ टक्क्यांवर गेली आहे. भाषक दैनिकांमध्ये वाचकसंख्येत सर्वाधिक वाढ झाली ती ओडिया भाषेत आणि ती होती तब्बल ८३ टक्के (६० लाखांवरून १.१ कोटींपर्यंत)! त्यानंतर तेलुगू वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येने २०१४ ते २०१७ दरम्यान ६३ टक्के वाढ नोंदवली. 

यामागे अर्थातच वाढती साक्षरता, शैक्षणिक दर्जा आणि जागरूकता ही कारणे आहेत. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी विक्रीसाठी योजलेल्या योजनांनीही त्याला हातभार लावला आहे. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर आता कुठे भारतीय भाषांमधील मजकूर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात हेही क्षेत्र वाढतच आहे आणि त्यातही भारतीय भाषांना उज्ज्वल काळ खुणावतोय, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याबद्दल याच सदरात मी लिहिलेही आहे; मात्र त्यामुळेही असावे कदाचित, पण वाचक वृत्तपत्रांवर जास्त विसंबून आहेत.

येत्या काळात खेड्यापाड्यांत आणि छोट्या शहरांमध्ये वाचकांची संख्या वाढतच जाईल, यात शंका नाही; पण या सर्वेक्षणाचा थोडा अभ्यास केला, तर आणखी एक गंमत लक्षात येते. ‘आयआरएस’च्या निष्कर्षाप्रमाणे सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या पहिल्या दहा वृत्तपत्रांमध्ये एकही इंग्रजी वृत्तपत्र नाही. या यादीत पहिल्या तिन्ही जागी हिंदी वृत्तपत्रे आहेतच; पण चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि नवव्या या जागांचा अपवाद केला, तर बाकीच्या तिन्ही जागाही हिंदी वृत्तपत्रांनीच पटकावल्या आहेत. इतकेच नाही, तर पुढच्या दहा (म्हणजे पहिल्या वीस) वृत्तपत्रांमध्येही केवळ एकच इंग्रजी वृत्तपत्र आहे. इंग्रजीतील सर्वांत मोठी वाचकसंख्या (१.५ कोटी) असलेले वृत्तपत्र हे टाइम्स ऑफ इंडिया आहे, अन् दुसरीकडे तमिळ, मराठी, मल्याळम, तेलुगू इत्यादी भाषांच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या वाचकांची संख्या १.५ कोटींपासून २.५ कोटींपर्यंत आहे. 

एकट्या हिंदी वाचकांची संख्या तीन वर्षांत ४५ टक्क्यांनी (१५ कोटींवरून १९ कोटी) वाढली आहे. याच काळात इंग्रजी वाचकांची संख्या केवळ १० टक्क्यांनी (२.५ कोटींवरून २.८ कोटी) वाढली आहे. याचाच अर्थ नुसत्या हिंदीच्या वाचकांची संख्या इंग्रजीच्या तुलनेत सहा पट वाढली आहे. सर्व भारतीय भाषांची इंग्रजीशी तुलना केली, तर इंग्रजी वाचकांची संख्या दोन-तीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, म्हणजे इंग्रजीचे कितीही स्तोम माजवले, तरी आजही ९० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांना आपल्या भाषेतच बातम्या वाचायला आवडतात. 

इतकेच कशाला, वर्तमानपत्रांच्या जाहिराती ज्या निकषावर दिल्या जातात, त्या सरासरी अंकवाचन (अॅव्हरेज इश्यू रीडरशिप) या मुद्द्यावर तर इंग्रजी वृत्तपत्रांनी मारच खाल्ला आहे. दिल्ली व मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये इंग्रजी वृत्तपत्रांचे सरासरी अंकवाचन घटले आहे, तर छोट्या शहरांमध्ये ते किंचित वाढले आहे. हा निकष घसरल्यामुळेच ‘आयआरएस’मध्ये यंदा पहिल्यांदाच तीन दिवसांचे वाचन (थ्री डे रीडरशिप) आणि सात दिवसांचे वाचन (सेव्हन डे रीडरशिप) अशा संकल्पना आणण्यात आल्या. याचा अर्थ लोक इंग्रजी वृत्तपत्रे दररोज नाही, तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वाचत आहेत. 

इंग्रजी भाषा, इंग्रजी माध्यमे आणि इंग्रजी वृत्तपत्रे यांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेशी अत्यंत विसंगत अशी ही आकडेवारी आहे. इंग्रजी माध्यमांचा प्रसार एवढा मर्यादित असूनही त्या भाषेतील कुठल्याही पत्रकाराला अधिक सुविधा, पगार आणि सन्मान मिळतो. याचे कारण म्हणजे भाषक माध्यमे अधिक मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचत असली, तरी आपल्या पत्रकारांना वातावरण, सुविधा आणि स्वातंत्र्य देण्यात ते कमी पडतात. त्यामुळे त्यांचा आवाका मर्यादितच राहतो. मोठे, विशेष किंवा शोधपत्रकारितेचे कार्य करण्यात ते कमी पडतात. मग इंग्रजीतील मजकूर भाषांतरित करण्यापलीकडे त्यांना काही कामच उरत नाही. इतक्या मोठ्या वाचकवर्गाची वाचनभूक भागविणे आणि त्यांना खऱ्या अर्थाने शहाणे करणे, ही या माध्यमांनी आपली जबाबदारी मानली पाहिजे. 

त्याचप्रमाणे भविष्यातील पिढीला आपण कोणती भाषा देणार आहोत, हेही आजच्या वृत्तपत्रांना ठरवावे लागणार आहे. आजच्या घडीला संख्याबळ भारतीय भाषांसोबत आहे; मात्र ज्या गतीने इंग्रजी शाळा खेडोपाडी सुरू होत आहेत आणि इंग्रजीची ‘क्रेझ’ लोकांमध्ये पसरत आहे, त्यावरून हे अंतर कमी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे एकमेकांना उणे दाखविण्याची चढाओढ न करता या अहवालाचा वापर केला तर ही संधी साधणे अशक्य नाही.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link