रत्नागिरी : सन १९५५मधील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते आणि दोन वेळा जागतिक ऑलिंपियाड स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरीमध्ये खुल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ व १० फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील पॉवर हाउसजवळील दैवज्ञ भवन येथे ही स्पर्धा होईल.
देवरुखजवळील कौंढर हे सप्रे यांचे मूळ गाव असून, १९१५ साली सप्रे यांचा जन्म झाला. जुन्या काळात बुद्धिबळाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. आजच्यासारखी भरघोस बक्षिसे मिळत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अखेरपर्यंत बुद्धिबळाचा प्रसार करण्याचे काम केले. केजीएन सरस्वती फाउंडेशन व रत्नागिरीतील चेसमेन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांपासून सप्रेंच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षीच्या स्पर्धेसाठी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे. राज्यातील व देशातील अनेक नामांकित खेळाडूंनी आजवर या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या वर्षीदेखील नामांकित खेळाडूंचा सामना करायची संधी रत्नागिरीतील बुद्धिबळपटूंना प्राप्त झाली आहे.
‘जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,’ असे आवाहन केजीएन सरस्वतीचे माधव हिर्लेकर व ‘चेसमेन’चे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी :
चैतन्य भिडे : ८०८७२ २००६७
विवेक सोहनी : ९४२२४ ७४५४६
मंगेश मोडक : ९४०५३ ५२३५६