Next
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी
सादरीकरण हा ‘पुलं’च्या लेखनाचा स्थायीभाव असल्याचे सतीश आळेकर यांचे मत; रत्नागिरीत ‘पुलोत्सवा’चे उद्घाटन
अनिकेत कोनकर
Saturday, December 08, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this story

पुलं स्मृती सन्मान अभिनेते विक्रम गोखले यांना प्रदान करताना सतीश आळेकर. (डावीकडून) भालचंद्र तेंडुलकर, राहुल पंडित, चारुहास पंडित आणि वीरेंद्र चित्राव.

रत्नागिरी :
‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना त्यांचं लेखन नुसतं वाचतानाही ते ‘पुलं’च्या आवाजात सादर झाल्याचा अनुभव येतो,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी ‘पुलं’बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पुलोत्सवा’च्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. आळेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा पुलोत्सव सन्मान देऊन गौरविण्यात आले.

सतीश आळेकर, विक्रम गोखले यांच्यासह चित्रकार चारुहास पंडित, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील दहाव्या पुलोत्सवाचे उद्घाटन सात डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाले. तत्पूर्वी, विविध व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या ‘पुलं’च्या आणि ‘पुलं’च्या व्यक्तिरेखांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन चारुहास पंडित यांच्या हस्ते झाले. ‘पुलकित रेषा’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, ते पुलोत्सव संपेपर्यंत म्हणजेच नऊ डिसेंबरपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले आहे. 

‘पुलं’चे द्रष्टेपण
सतीश आळेकर यांनी ‘पुलं’बद्दलच्या काही आठवणी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘पुलं’सह कुसुमाग्रजांना महाराष्ट्राने सांस्कृतिक नेतृत्व बहाल केले होते. कलाबिंदूच्या कक्षा राज्यभर रुंदावत जाणार हे द्रष्ट्या ‘पुलं’नी आधीच ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी बलुतं, रामनगरी, यशवंत मनोहर आदींची ओळख आपल्या लेखनातून करून दिली. साहित्याचं व्यामिश्रीकरण सुरू असताना ते मनापासून पाहत होते. त्यांच्या प्रतिभेला मध्यमवर्गाचे कोंदण होते. समाजातील दडपलेली संवेदना मध्यमवर्गापर्यंत आणण्याचे काम त्यांनी केले,’ असे प्रतिपादन आळेकर यांनी केले.

‘विक्रम गोखले यांनी अभिनयाचे घराणे तयार केले’
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा पुलोत्सव सन्मान आळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. अनिल दांडेकर यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन पूर्वा पेठे यांनी केले. गोखले यांच्याबद्दलही आळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘नाटक ही व्याकरणशुद्ध नसलेली कला आहे. त्याला कोणतेही घराणे नाही. असे असतानाही स्वतःच्या अभिनयशैलीने विक्रम गोखले यांनी या कलेचे व्याकरण तयार केले आणि स्वतःच्या अभिनयाचे घराणे तयार केले. कला शिकता शिकता त्यांनी स्वतःचा अभिनय बंदिस्त करत नेला आणि त्याचे प्रत्यंतर पुढच्या प्रयोगावेळी येत असे. ‘पॉझ’ किती समर्थपणे घेता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. नाटक, सिनेमा, टीव्हीपासून अगदी वेबसीरिजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांत ते अभिनय करत असले, तरी त्यांच्या एका माध्यमातील अभिनयाची छाप दुसऱ्या माध्यमातील अभिनयावर पडलेली दिसत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,’ अशा शब्दांत आळेकर यांनी आपल्या मित्राचा गौरव केला. 

‘‘पुलं’च्या नावाचा पुरस्कार हे भाग्य’
पुरस्काराला उत्तर देताना गोखले यांनी ‘पुलं’च्या नावाचा सन्मान मिळणे हे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. ‘‘पुलं’च्या विनोदाने गुदगुल्या केल्या, हळूच चिमटेही काढले; मात्र तो बोचरा नव्हता. विनोद ज्याच्यावर झालाय, त्यालाही ते आवडावं, असा त्यांचा विनोद होता. त्यांच्या साहित्यावर आधारित पुलोत्सवासारखे उपक्रम करणाऱ्या सर्वांना बळ मिळो,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. 

विक्रम गोखले यांची मुलाखत घेताना राजेश दामले

‘कला व कसब यामध्ये फरक’
पुरस्कार सोहळ्यानंतर निवेदक राजेश दामले यांनी गोखले यांची मुलाखत घेतली. त्यात गोखले यांनी ‘पुलं’बद्दलच्या काही आठवणी सांगितल्या, तसेच अनेक विषयांवरची स्वतःची मते मांडली. ‘कला व कसब यांमध्ये फरक आहे, हे ‘पुलं’नी एका लेखात लिहिलेले वाक्य सर्व कलावंतांना लागू पडणारे आहे. त्यांना आणि सुनीतामावशींना थोड्या वेळासाठी का होईना, पण कधी तरी भेटायला जात असे; ‘पुलं’च्या शेवटच्या काळात मात्र त्यांना त्या स्थितीत बघणे सहन होण्यासारखे नव्हते.’ 

‘पुलं’च्या कोणत्याच नाटकात भूमिका न केल्याबद्दल विचारले असता गोखले म्हणाले, ‘त्याबाबत मला कुणीच कधी विचारले नाही आणि मला ते ‘पुलं’ना विचारायचे धाडस झाले नाही. कारण मला स्वतःला हसणे आवरत नाही, म्हणून मी स्वतःला विनोदी नट म्हणून नालायक समजतो.’ 

‘समाजात राहायचे असेल, तर समाजभान हवे’
‘पुलं’चे दातृत्व, गोखले यांचे सामाजिक उपक्रम आणि सध्याचे वातावरण यांसंदर्भात विचारले असता गोखले यांनी पोटतिडकीने उत्तरे दिली. ‘आपण कुटुंबापुरते जगत असू, तर त्याला जगणे म्हणत नाहीत. चांगला नागरिक म्हणून जगायचे असेल, तर करण्यासारखे बरेच काही आहे. समाजात राहायचे असेल, तर समाजभान असले पाहिजे, सांस्कृतिक भान असले पाहिजे. सैनिक आणि शेतकरी यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता असलीच पाहिजे. म्हणूनच मी गेली ३० वर्षे कमलाबाई गोखले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अपंग सैनिकांच्या संस्थेकरिता काम करतो आहे. सध्याचे एकंदरच वातावरण अस्वस्थ करणारे आहे आणि त्याला नागरिक म्हणून आपण जबाबदार आहोत. मतदान न करणाऱ्यांची मोठी संख्या पाहून मला चीड येते. हे राजकीय व्यवस्थेबद्दल, लोकशाहीबद्दल गांभीर्य नसल्याचे लक्षण आहे. अशा लोकांना सरकारी यंत्रणेवर आसूड ओढण्याचा अधिकार नाही. कलेच्या बाबतीत मध्येच कोणी तरी उठून ‘प्रायव्हेट सेन्सॉर’ करते. हे प्रकार म्हणजे लोकशाहीची माकडचेष्टा आहे न्यायालयाने निकाल दिला, तरी डीजे वगैरे गोष्टी आपण टाळत नाही. हा काय प्रकार आहे? आपले सांस्कृतिक अधःपतन होत आहे,’ अशी मते गोखले यांनी मांडली.

आताच्या पिढीतल्या कलावंतांबद्दल विचारले असता त्यांनी आशादायक चित्र असल्याचे, तसेच कलावंत कष्टाळू, मेहनती असल्याचे आणि दिग्दर्शक चांगले विषय हाताळत असल्याचे सांगितले; मात्र दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे वाईट प्रकार या क्षेत्रात होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. एकदा एक गोष्ट चालली, की त्याच पद्धतीची निर्मिती सातत्याने होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सगळी मेंढरे एकाच ठिकाणी जायला लागली, तर निर्मिती नावाच्या गुहेतून बाहेर येणारी पावले दिसणारच नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

‘आय लव्ह पीएल’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. ‘पुण्याच्या खालोखाल रत्नागिरीने पुलोत्सवात आघाडी घेतली आहे. पुण्यात १५ वर्षे, तर रत्नागिरीत १० वर्षे पुलोत्सव होत आहे. जन्मशताब्दी वर्षात पुलोत्सव महाराष्ट्रात १६ शहरांत, देशात १८ शहरांत आणि जगभरात ४२ ठिकाणी होणार आहे. ‘पुलं’चे साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘आय लव्ह पीएल’ असा उपक्रम राबविला जाणार आहे. यंदा पुलोत्सव सांस्कृतिक जलशापुरता मर्यादित राहणार नसून, ‘पुलं’च्या विविध पैलूंवर आधारित १६ कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत.’ 

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आभारप्रदर्शन केले. ‘‘पुलं’नी अंतू बर्वा, म्हैस आदींच्या माध्यमातून रत्नागिरी सर्वदूर पोहोचवली. पुलोत्सव कार्यक्रम रत्नागिरीत होतोय, हे अभिमानास्पद आहे,’ असे पंडित म्हणाले. 

दीप्ती कानविंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘पुलं’च्या दातृत्वाचा पैलू लक्षात घेऊन समाजात तो पैलू वृद्धिंगत होण्यासाठी, जगभरातील दात्यांची साखळी जोडण्यासाठी ‘आर्ट सर्कल’तर्फे ‘#पुलसुनीत’ हा उपक्रम सुरू करण्यात आहे. त्याची माहिती या वेळी कानविंदे यांनी दिली. (या उपक्रमाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अपरिचित पुलं हा कार्यक्रम सादर करताना सतीश आळेकर, गिरीश कुलकर्णी आणि चंद्रकांत काळे.

उलगडले ‘अपरिचित पुलं’
‘पुलं’चे बहुतांश साहित्य खरे तर चिरपरिचित आहे. तरीही त्यांचे काही साहित्य अपरिचितही आहे आणि विनोदाव्यतिरिक्त अन्य प्रकारातीलही आहे. अशा निवडक साहित्याचे सादरीकरण करणारा ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम पुलोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर झाला. ‘शब्दवेध, पुणे’ प्रस्तुत असलेल्या या कार्यक्रमाचे संकलन चंद्रकांत काळे यांनी केले होते. कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते-गायक चंद्रकांत काळे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात ‘पुलं’च्या अपरिचित साहित्याचे बहारदार अभिवाचन केले. चंद्रकांत काळे यांनी सादर केलेल्या गीतांनाही रसिकांची दाद मिळाली. 

‘पुलं’ची चिंतने, विविध विषयांवरील विचारांनी रसिकांना अंतर्मुख केले. दैनंदिन जीवनातील विसंगती, तसेच व्यक्तींच्या लकबी यांच्यावर बरोबर बोट ठेवणाऱ्या ‘पुलं’च्या लेखनाचा प्रत्यय यातही आला आणि त्यांच्यातील गुणग्राही वृत्तीही दिसून आली. भाषेतील विविध शब्दांची वैशिष्ट्ये उलगडणारे, रस्त्यासारख्या निर्जीव गोष्टीवर मानवी गुणांचे आरोपण करून समाजजीवनाचे चित्र मांडणारे त्यांचे लेखन रसिकांना अनुभवता आले आणि ‘बलुतं’वरचा त्यांचा अभिप्राय, आस्तिकता, महात्मा गांधी आणि सत्ता अशा गोष्टींबद्दलचे त्यांचे विचारही जाणून घेता आले.

बंगाली भाषा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील ‘पुलं’चे प्रेम सर्वांना माहिती आहेच. त्याची अनुभूतीही या कार्यक्रमात घेता आली. ‘शांतिनिकेतनमधला शेवटचा दिवस’ हा त्यांचा लेख हे त्याचे एक उदाहरण. 

‘विझे दिवसाचा दिवा, सूर्य बुडाला बुडाला, 
मेघ आकाशी जमले, लोभ चंद्राशी जडला’

ही रवींद्रनाथ टागोर यांची ‘पुलं’नी मराठीत अनुवादित केलेली कविता गिरीश कुलकर्णी यांनी सादर केल्यानंतर एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाली. त्याशिवाय विविध व्यक्तींच्या पत्रांना ‘पुलं’नी लिहिलेली उत्तरेही ‘पुलं’च्या भाषाप्रभुत्वाची नव्याने जाणीव करून देऊन गेली. ‘माझ्या शत्रूंनाही माझ्यात न सापडलेला हा आखडूपणा माझ्या गुडघ्यांत कुठून उतरला’ अशा शब्दांत स्वतःच्या व्याधीचे वर्णन करणारे त्यांनी बा. भ. बोरकरांना लिहिलेले पत्र ‘पुलं’चा स्वतःवरही विनोद करण्याचा गुण दाखवून गेले. दत्ताराम सुखटणकर या कोकणी साहित्यिकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावर त्यांना ‘पुलं’नी अस्खलित कोकणी भाषेत लिहिलेले पत्र चंद्रकांत काळे यांनी त्या भाषेच्या रसाळपणाच्या वैशिष्ट्यांसह सादर केले. गणेशशास्त्री जोशी या संस्कृतच्या विद्वानांनी परदेश दौऱ्यानंतर ‘पुलं’ना लिहिलेल्या पत्राला त्यांनी संस्कृतमधून दिलेले उत्तर गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम पद्धतीने सादर केले. ‘मी मोठे काही केलेले नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ या नियमानुसार माझे काही साहित्य कालबाह्य होणारच आहे,’ असे लिहून ठेवणारे ‘पुलं’ किती मोठे होते, हे ‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमातून उलगडले. या कार्यक्रमाला अक्षय शेवडे (तबला) आणि आदित्य मोघे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगत गेला.

(‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. पु. ल. देशपांडे यांचे आणि त्यांच्याबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘पुलं’ची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पुलं’ची पुस्तके १५ टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. )

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link