Next
बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय
BOI
Thursday, October 18, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

कमलादेवी चट्टोपाध्याय (जन्म : तीन एप्रिल १९०३, मृत्यू : २९ ऑक्टोबर १९८८)स्वातंत्र्याच्या चळवळीतील सहभाग, पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न, लेखन, सामाजिक कार्य या आणि अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेलं बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल... 
............
बराच वेळ विचार करूनही सुचत नाहीये, की कमलादेवींची थोडक्यात ओळख करून देताना नक्की कशाबद्दल लिहू? त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल, त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्योत्तर सामाजिक कामांबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या सहभागाबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल की हस्तकलेच्या त्यांच्या प्रेमाबद्दल. प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि कार्य यांवर खरं तर एकेक दीर्घ लेख होऊ शकतो.

कमलादेवींचा जन्म तीन एप्रिल १९०३ रोजी कर्नाटकात झाला. मंगलोरला आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी लंडनमध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. पद्मश्री मणी महादेव यांच्याकडे त्यांनी संस्कृत नाट्यशास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या १३व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्या बालविधवा झाल्या. पुढे हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. घरातलं वातावरण आणि संस्कारांमुळे देशाभिमान, राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. स्वातंत्र्य चळवळीत महिलांना सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी गांधीजींची मनधरणी केली. त्याबरोबरच महिलांचे मूलभूत अधिकार आणि आर्थिक, धार्मिक, सामाजिक स्वातंत्र्य या विषयांचाही त्यांनी भरपूर पाठपुरावा केला. गांधीजींची असहकार चळवळ आणि मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या सत्याग्रहादरम्यान अटक झालेल्या त्या पहिल्या महिला होत. देशासाठी त्यांनी एकूण पाच वर्षं कारावास भोगला. त्याही आधी त्यांनी ‘ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स’ची स्थापना केली आणि १९२० साली म्हणजे जेव्हा भारतीय महिला मोकळेपणाने घराबाहेरही पडत नव्हत्या त्या काळात एका सार्वजनिक निवडणुकीला उमेदवार म्हणून सामोऱ्या गेल्या. स्वातंत्र्यसंग्रामातलं त्यांचं अस्तित्व एखाद्या झंझावातासारखं होते. 

कमलादेवींचं नाव सगळ्यात जास्त जोडलं गेलं ते कला क्षेत्राशी. ‘हथकरघा मां’ या जनमानसाकडून मिळालेल्या उपाधीवरूनच आपल्या हे लक्षात येतं, की त्यांनी हातमागाचं संवर्धन आणि जतनासाठी भरपूर काम केलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी हस्तकला आणि शिल्पकला हे कलाप्रकार वाचवण्यासाठी काम सुरू केलं. हे कलाप्रकार त्यांच्या उपजत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जपले जावेत, त्यांची निर्मिती ही पूर्णपणे त्या कलाकाराच्या उत्स्फूर्त प्रतिभेचंच प्रतिबिंब असावं, यावर त्यांचा भर होता. बाजारातला उठाव/चलती या गोष्टींचा आपल्या या पारंपरिक हस्तकलांशी कुठलाही संबंध येऊ नये म्हणून त्या प्रयत्नशील असत. उत्कृष्ट कला ही आपल्या परंपरेचं प्रतिनिधित्व करते आणि आपलं मोल आपणच ठरवते, यावर त्यांचा विश्वास होता. भारताच्या विविध प्रांतांतल्या नानाविध हस्तकला त्यांनी शोधून काढल्या. प्रत्येक राज्यातली अनेक गावं पिंजून काढून त्यांनी हरतऱ्हेच्या हस्तकला, शिल्पकला आणि हातमागाच्या प्रकारांच्या नोंदी करून ठेवल्या. देशातल्या विणकर समाजासाठी तर त्यांनी इतकं काम केलं, की त्या जिथे जातील तिथे ही लोकं त्या वेळी मानाचं प्रतीक समजली जाणारी आपली पगडी काढून त्यांच्या पायावर ठेवत असत. गावपातळीपर्यंतच अस्तित्व असलेल्या हस्तकलांना राष्ट्रीय, तसंच आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम कमलादेवींनी केलं. 

त्यांनी ‘सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम’ आणि ‘क्राफ्ट कौन्सिल ऑफ इंडिया’ या दोन संस्थांची स्थापना करून हस्त-शिल्प कारागिरांमध्ये सहकार चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक कलांचं जतन करणाऱ्या या भारताच्या अनमोल ठेव्याचा आर्थिक, तसंच सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वेळोवेळी सरकारशी संघर्षही केला. आश्चर्य असं, की परकीय सरकारइतकाच स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारचाही विरोध त्यांना सहन करावा लागला. हस्तकला-शिल्पकलेपाठोपाठ भारताचे प्रमुख पारंपरिक कलाप्रकार म्हणजे नाटक आणि संगीत. या क्षेत्रांतही संवर्धन आणि जतनाबरोबरच व्यावसायिक शिक्षण आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीनं त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि संगीत नाटक अकादमीची स्थापना केली. 

मुळातच लिखाणाची आवड असलेल्या कमलादेवींनी अनेक पुस्तकंही लिहिली. कामातल्या वैविध्याप्रमाणेच त्यांच्या लिखाणातही वैविध्य दिसून येतं. ‘दी अवेकिंग ऑफ इंडियन वूमन’, ‘जापान - इट्स वीकनेस अँड स्ट्रेंग्थ’, ‘अंकल सॅम एम्पायर’, ‘इन वॉर टॉर्न चायना’, ‘टुवर्डस् ए नॅशनल थिएटर’ ही त्यांची गाजलेली आणि चर्चिली गेलेली काही पुस्तकं. 

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या कमलादेवींच्या कामाचं तळागाळात भरपूर कौतुक झालंच; पण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची योग्य दाखल घेण्यात आली. त्यांच्या या योगदानाची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

१९५५ साली भारत सरकारनं त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९६६ साली त्यांना आशियाचं नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. १९७४ साली संगीत नाटक अकादमीनं ‘लाइफटाइम अचीव्हमेंट’ पुरस्कारानं त्यांना गौरवलं. या व्यतिरिक्त फेलोशिप आणि रत्न सदस्य देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आलं. १९७७ साली ‘युनेस्को’नं त्यांच्या हस्तकला क्षेत्रातल्या कार्याचा गौरव केला. १९८७ साली भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केलं. शांतिनिकेतनद्वारे देण्यात येणारा ‘देसिकोट्टम’ या पुरस्काराच्याही त्या मानकरी आहेत. 

सध्याच्या केंद्र सरकारने मार्च २०१७पासून महिला विणकर आणि शिल्पकारांसाठी ‘कमलादेवी चट्टोपाध्याय राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षा मोठी पावती ती काय हवी!

आयुष्यभर इतकी मेहनत, एवढा संघर्ष करूनही फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता मला खूपच भावली. अगदी देवासमोर बसून पोथी वाचणाऱ्या तुमच्या आमच्या आजीसारखी. 

त्यांच्या कार्याला मनापासून प्रणाम.

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे ‘इंडियन वुमेन्स बॅटल फॉर फ्रीडम’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search