Next
वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा जिल्हा : कोल्हापूर
BOI
Wednesday, March 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या चार भागांत कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू हमरस्त्याच्या पश्चिम बाजूच्या काही पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात पूर्वेकडील काही पर्यटनस्थळांची माहिती घेऊ.
.................... 
मनपाडळे येथील मारुतीपुणे-बेंगळुरू हमरस्त्याच्या पूर्व बाजूला कोल्हापुरातील उद्योगांचे जाळे आहे. पंचगंगा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांमुळे हा प्रदेश सुपीक तर आहेच; पण इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी, हुपरी चांदीकामासाठी व जयसिंगपूर तंबाखूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. या गावांनी उद्योगजगतात आपले नाव सिद्ध केले आहे. हा भाग फार पूर्वीपासून, अगदी चालुक्य शिलाहार राजवटीतही उल्लेखला गेला आहे. जैन, वैष्णव, शैव व बौद्ध संस्कृती गेली हजार वर्षे गुण्यगोविंदाने जोपासली गेली आहे. या भागात सहकाराचे जाळे पसरले आहे. साखर कारखाने व दूध संस्था जोमाने काम करीत आहेत. कोल्हापूरच्या गूळ-साखरेबरोबर कोल्हापूरचा मिरची ठेचाही प्रसिद्ध आहे. 

समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी दोन मारुती कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. 

मनपाडळे : हमरस्त्यावरून पुण्याहून येताना वाठार-वडगाव हे ठिकाण लागते. तेथून १४ किलोमीटरवर हे गाव आहे. समर्थांनी येथे मारुतीची स्थापना शके १५७७ (इ. स. १६५२मध्ये) केली. येथील मारुतीची मूर्ती अंदाजे पाच फूट उंचीची साधी, सुबक आहे. मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. 

पारगाव येथील मारुतीपारगाव : येथील मारुतीला ‘बालमारुती’ किंवा ‘समर्थांच्या झोळीतील मारुती’ असे म्हटले जाते. हा समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी शेवटचा मारुती समजला जातो. मनपाडळेपासून पाच किलोमीटर अंतरावर हा मारुती आहे. सपाट दगडावर कोरलेली येथील मूर्ती जेमतेम दीड फूट उंचीची आहे. यावर शेंदूर नाही. मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. ही मूर्ती डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात आहे. आठ फूट लांबी-रुंदीचा मूळ गाभारा असून, १९७२मध्ये येथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधला आहे. 

पेठवडगाव : राष्ट्रीय हमरस्त्यावरील हे एक मोठे गाव आहे. येथूनच इचलकरंजीकडे रस्ता जातो. इतिहासात धनाजी-संताजी ही जोडी खूपच गाजली. त्यातील धनाजी जाधवांची येथे समाधी आहे. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा गनिमी काव्याने सामना केला. मुघल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत होती. मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील, तर त्यांना ‘पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का,’ असे विचारले जाई. संताजीनंतर १६९६मध्ये धनाजी मराठा सैन्याचे प्रमुख झाले आणि १७०८मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते जिजाऊंच्या माहेरच्या, सिंदखेडच्या जाधव घराण्यातील होते. ते ताराराणींची साथ सोडून औरंगजेबाकडून सुटून आलेले संभाजी पुत्र शाहूमहाराजांना साताऱ्याला येऊन मिळाले. 

टोप येथील चिन्मय गणेशटोप : येथील चिन्मय गणपती मूर्ती हमरस्त्यावरून पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना डावीकडे दिसते. २४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर ६० फूट उंचीच्या, सिमेंट-काँक्रीटमध्ये बनविलेल्या या मूर्तीचे वजन ८०० टन आहे. खास शिमोगा येथून आणलेल्या कारागीरांनी ही मूर्ती जागेवरच बनवली. 

कागल : हे कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवरील तालुक्याचे मुख्य गाव आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १५७२मध्ये या गावाची जहागिरी विजापूरचा आदिलशाही सुलतान महंमदशाह याने राजपूत वंशातील पिराजीराजे (घाडगे) यांना दिली. त्यांना एकूण ६९ गावांची जबाबदारी देण्यात आली होती. पिराजीराजांना झुंझारराव या नावानेही ओळखले जायचे. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात काँग्रेसच्या संस्थापकांपैकी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. प्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव यांचे हे जन्मगाव आहे. या गावामध्ये सुंदर राममंदिर आहे. कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. 

श्रीराम मंदिर, कागल

गांधीनगर :
हे ठिकाण कोल्हापूरच्या पूर्वेस १० किलोमीटर अंतरावर असून, मुख्यत्वे येथे कापडाची होलसेल विक्री होते. स्वातंत्र्यानंतर येथे सिंधी लोकांची मोठी वसाहत झाली. जन्मतःच उद्योगी असलेल्या सिंधी लोकांनी येथे जम बसवून व्यापाराचे केंद्र बनविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील व उत्तर कर्नाटकातील लोक येथे खरेदीला येतात. येथे सुमारे १२०० फर्म्स आहोत. अलीकडील काळात कापडाबरोबर रेडिमेड कपडे, फर्निचर, फुटवेअर, नाइटवेअर , अंडरगार्मेंट्स, इलेक्ट्रॉनिक होम अॅप्लिकेशन्स, गिफ्ट अँड नॉव्हेल्टी आयटम्स, प्लास्टिक मोल्डेड फर्निचर, घड्याळे, प्लायवूड, रंग, सिरॅमिक्स आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल या नवीन उत्पादनांचीही बाजारपेठ येथे आहे. गांधीनगर येथे काही प्लास्टिक शीट उत्पादन कारखाने आहेत.

इचलकरंजी : हे ठिकाण वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. विठ्ठलराव दातार यांनी १९०४मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना स्थापन केला. त्यानंतर इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली आणि वस्त्रोद्योगाला सुरुवात झाली. पूर्वी इचकरंजी सुती साड्यांसाठी प्रसिद्ध होते; आता साड्यांच्या बरोबरीने सुटिंग व शर्टिंगही येथे बनविले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे असे वस्त्रांचे अनेक प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे एक लाखांच्या आसपास यंत्रमाग आहेत. दररोज एक कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. येथील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी रुपये आहे. सध्या अनेक अडचणींवर मात करून उद्योग टिकविण्याची किमया उद्योजक करीत आहेत. येथील बहुतेक रहिवाशांचे आयुष्य पॉवरलूमच्या उबदार चक्राच्या भोवती फिरते, जणू त्यांचे हृदय पॉवरलूमच्या ‘खटखट’वर चालत असते. इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत वेगवान औद्योगिक क्षेत्र आहे. 

इचलकरंजी संस्थानचे मूळ संस्थापक नारो महादेव हे होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात रत्नागिरी जिल्ह्यातील वरवडेकर जोशी येथे आले. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हे सावंतवाडी संस्थानातील म्हापण गावच्या कुलकर्णीपणाचे काम करीत होते. नारोपंत हे अवघे चार-पाच वर्षांचे असताना, त्यांचे वडील महादजीपंत निवर्तले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई आपल्या मुलाला घेऊन उदरनिर्वाह करण्याकरिता घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिद्ध मराठा सेनापती संताजी घोरपडे यांचे हे राहण्याचे ठिकाण होते. या ठिकाणी असताना नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजींच्या नजरेस पडल्यामुळे संताजींनी त्यांना आपल्या दिमतीला ठेवले. लिहिणे, वाचणे, घोड्यावर बसणे, निशाण मारणे इत्यादी त्या काळच्या सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली. नारोपंतांवर संताजींची बहाल मर्जी होती व नारोपंतांचीही संताजीवर अतिशय भक्ती होती. ती इतकी, की  नारोपंतांनी आपले मूळचे जोशी हे आडनाव बदलले व आपल्या धन्याचे-संताजींचे घोरपडे हे आडनांव धारण केले. अद्यापही, नारोपंतांचे वंशज ‘घोरपडे’ हेच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या नावापुढे लावतात. संताजीराव घोरपडे यांनी नारोपंतांना मिरज प्रांताच्या देशमुखी, सरदेशमुखीची वहिवाट दिली होती. तसेच इचलकरंजी व अजरे हे गाव इनाम दिले होते. १८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरू झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे येथील वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे. 

हुपरी येथील चांदीची कारागिरीहुपरी : भारतातील रुप्याची नगरी (सिल्व्हर सिटी) म्हणून हे गाव ओळखले जाते. इ. स. १३००पासून या भागात चांदी कारागीर या व्यवसायात गुंतले आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी देवस्थान प्रसिद्ध असल्याने सतत येणारे भाविक येथील दागिन्यांच्या मोहात पडले व बघता बघता हा उद्योग विक्रीबरोबर दागिन्यांचे उत्पादन करणारा झाला. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या हस्तकलेला प्रोत्साहन मिळाले. कृष्णाजी रामचंद्र सोनार यांनी सन १९०४पासून या व्यवसायास खऱ्या अर्थाने दिशा दिली. आजच्या घडीला १००० कोटींचा व्यवसाय येथून चालतो. येथे चांदीच्या गाळण्यापासून निरनिराळ्या आकाराचे पत्रे, दागिन्यांसाठी आवश्यक साचे तयार केले जातात. रूपाली, सोन्या, गजश्री आणि गजश्री छुम छुम या चार पारंपरिक प्रकारच्या हुपरी पैंजणांना महिला वर्ग पसंती देतो. चांदीच्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे. भेटवस्तू देताना चांदीच्या वस्तूंचा वापरही आता मोठ्या प्रमाणावर होतो. गेल्या काही वर्षांपासून हुपरीसारखे छोटे गाव भारतातील चांदीच्या दागिन्यांचे केंद्र म्हणून अधोरेखित झाले आहे. कोल्हापूरच्या पूर्वेला २० किलोमीटरवर हे गाव आहे. 

रामलिंग गुंफा

रामलिंग मंदिररामलिंग मंदिर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावर हातकणंगले गावाजवळ रामलिंग मंदिर असून, तेथे एक प्राचीन आणि सुंदर गुफा आहे. मंदिराची रचना फार जुनी आहे आणि मुख्य गुहेच्या आत शिवलिंग आहे. असेही सांगितले जाते, की श्रीरामचंद्राने १४ वर्षांच्या वनवासात असताना येथे शिवलिंग स्थापन केले आहे. हे गुंफामंदिर एका टेकडीवर आहे. येथे एक गणपतीची मूर्तीही आहे. तसेच पाच फूट उंचीचे पाण्याचे टाकेही खोदलेले आहे. हे सुंदर, निसर्गरम्य ठिकाण असून सहलीसाठी प्रसिद्ध आहे. 

कुंभोज

कुंभोज जैनक्षेत्र परिसर

कुंभोज : हे जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. इ. स. ११५६मध्ये भगवान बाहुबलीची सहा फूट उंचीची मूर्ती येथे स्थापित केली गेली. येथे अनेक जैन संतांनी भेटी दिल्यामुळे हे पवित्र ठिकाण मानले जाते. २५० वर्षांपूर्वी तपस्वी संत श्री बाहुबली महाराज येथे राहत असत. येथे प्रमुख जैन तीर्थस्थळांच्या प्रतिकृती दर्शनासाठी ठेवल्या आहेत. तसेच २४ तीर्थंकरांच्या मूर्तीही आहेत. मुख्य बाहुबलीची मूर्ती २८ फूट उंचीची असून, ५० पायऱ्या चढून जावे लागते. संध्याकाळच्या सुमारास हा परिसर खूपच सुंदर दिसतो. तीर्थप्रतिकृतींमध्ये उजव्या बाजूला गजपंथा, तरंगा, मांगी-तुंगी, सोनगिरी, पावगिरी व डाव्या बाजूला कैलास पर्वत, शिखरजी आणि गिरनारजी आहेत. तसेच मुख्य मंदिराजवळ जलमंदिर, रत्नात्रय मंदिर, शांतिनाथ मंदिर, चंदप्रभा मंदिर, आदिनाथ मंदिर आणि समावाश्रम मंदिरदेखील बांधले आहे. कुंभोजजवळ आदिवन शंकरी शाकंभरीचे मंदिर आहे. शिक्षणमहर्षी पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे जन्मठिकाण आहे.श्रीराम मंदिर, जयसिंगपूरजयसिंगपूर : जयसिंगपूर हे तंबाखू व्यापार व उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराजे यांचे नाव या शहराला देण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनजवळ चार-पाच घरे असलेल्या ठिकाणी राजर्षी शाहूमहाराजांनी हे योजनाबद्ध, टुमदार गाव वसविले. या गावातील राम मंदिर अतिशय आकर्षक आहे. हे गाव शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. 

कुरुंदवाड घाट

कुरुंदवाड :
कोल्हापूर शहरापासून हे गाव ५५ किलोमीटरवर आहे. कुरुंदवाड हे पटवर्धन सरदारांचे गाव असून, नरसोबाच्या वाडीपलीकडे (नृसिंहवाडी) हे गाव पंचगंगा व कृष्णेच्या संगमावर वसले आहे. येथील राजवाडा, रघुनाथराव पटवर्धन यांनी बांधलेला घाटही प्रेक्षणीय आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले. संताजी घोरपडे यांची म्हसवडजवळ कारखेल गावात हत्या करण्यात आली होती. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरिभट यांचे तिसरे पुत्र त्र्यंबक ऊर्फ अप्पा हे कुरुंदवाडचे संस्थापक. राणोजी घोरपडे यांनी त्र्यंबक पटवर्धन यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीत राणोजीने कुरुंदवाडची आपली जमीन १७३३ साली पटवर्धन यांच्या नावाने केली. या गावातील पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी आशियातील पहिली सर्कस स्थापन केली. (प्रो. छत्रे यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) तसेच भारतातील संगीत परंपरा जोपासणारे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे कुरुंदवाड हे जन्मगाव आहे. 

नरसोबाची वाडी घाट

श्री पादुका, नृसिंहवाडीनृसिंहवाडी : नरसोबाची वाडी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावरील हे ठिकाण म्हणजे श्री दत्तात्रेय क्षेत्र आहे. येथील प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. या पादुका चंद्रशिळेच्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती यांनी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली होती. श्री गुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत, तो वृक्ष आणि त्यासमोरच्या कृष्णा नदीच्या बाजूस या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथे वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतिमंदिर आहे. सध्या दिसते ते नरसोबा वाडीचे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले होते. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला व दर्शन घेऊन देवास साकडे घातले. पुजाऱ्याने दिलेला अंगारा त्याने मुलीच्या डोळ्याला लावला आणि तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये केला आहे.

श्री कृष्णवेणी माता उत्सवमूर्तीमुख्य मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांची येथे समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी व म्हादबा पाटील इत्यादींची समाधिमंदिरे येथे आहेत. या ठिकाणी श्राद्धकर्म केले जाते. तसेच जन्मकुंडलीप्रमाणे सहमती वगैरे विधीही केले जातात. नृसिंहवाडीला जयसिंगपूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात श्री कृष्णावेणी मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात होतो. 

कसे जाल? कोठे राहाल?
कोल्हापुरातील या परिसराला पावसाळा सोडून कधीही भेट देता येते. साधारण मार्च ते मे अखेरपर्यंत थोडा उन्हाळा जाणवतो. सांगली, इचलकरंजी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर येथे राहणे व जेवण्याची चांगली सोय होऊ शकते. सांगली-कोल्हापूर रेल्वेमार्गावर जयसिंगपूर, हातकणंगले (इचलकरंजीसाठी ), गांधीनगर येथे रेल्वे स्टेशन आहेत. पुणे, बेळगाव, रत्नागिरी या ठिकाणांहून थेट बससेवा उपलब्ध आहे. जवळचा विमानतळ कोल्हापूर येथे आहे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search