Next
राष्ट्रभक्तीची यात्रा...
BOI
Saturday, March 24, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

पिस्सू टॉप

समोर उंच तिरंगा हवेत फडकत होता. त्यामुळे वेगळाच फील येत होता. अमरनाथ यात्रा ही राष्ट्रभक्तीचीही यात्रा आहे असं म्हणतो ते यामुळेच. सीमारेषेच्या भागात, सैन्याच्या देखरेखीखाली आतंकवाद्यांच्या भीतीखाली ही यात्रा होते. अशा वेळी इतक्या उंचीवर भारतीय झेंडा फडकताना सुंदर फिलिंग दाटून येतं... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा एकविसावा भाग.. 
........................
‘शिजेपर्यंत धीर धरता येतो, निवेपर्यंत नाही’, अशी माझी अवस्था झाली होती. पिस्सू टॉपचा माथा जवळ आलेला दिसत होता. गाण्यांचा आवाज दुरून कानावर पडत होता. दोन वळणे पार करायला तरीही वेळ लागला. मध्ये मध्ये बसत, थांबत वर वर जाऊ लागलो. लाऊड स्पीकरचा आवाज जवळ आल्यासारखा भासत होता. चार किमीचा एक मोठा उंच कडा पार करत करत एकदाचा पिस्सू टॉपला येऊन पोहचलो. 

उंचावरून सभोवतालचा प्रदेश दिसत होता. पर्वतांची शिखरे दृष्टीपथात येत होती. पिस्सू टॉप म्हणजे अगदी मैदानासारखं मोठं पठार होतं. मातकट गवताळ प्रदेश होता. काही जागी छत्र्या लावल्या होत्या. मैदानी भाग असल्याने कुठेही वृक्ष नव्हता. ऊन थोडं तीव्र वाटत होतं. दहा हजार फुटांच्या वर अतिनील किरणे जास्त शक्तिशाली असतात. ती सरळ अंगापर्यंत पोहचतात. त्यामुळे तिथे काही ठिकाणी छत्र्या लावल्या होत्या. काही लोक त्याच्या आत पहुडली होती. समोर उंच तिरंगा हवेत फडकत होता. त्यामुळे वेगळाच फील येत होता. अमरनाथ यात्रा ही राष्ट्रभक्तीचीही यात्रा आहे असं म्हणतो ते यामुळेच. सीमारेषेच्या भागात, सैन्याच्या देखरेखीखाली आतंकवाद्यांच्या भीतीखाली ही यात्रा होते. अशा वेळी इतक्या उंचीवर भारतीय झेंडा फडकताना सुंदर फिलिंग दाटून येतं. 

मी एका उंच भागापासून आसमंत न्याहाळत होतो. आकाश निळंशार होतं. काही शुभ्र ढग निळ्या कापडावर नक्षी केल्याप्रमाणे लावल्यासारखे वाटत होते. मुलं साबणाच्या पाण्याने तोंडातील बुडबुडे तयार करतात, ते हवेत काही क्षण वाहतात,  तसे निसर्ग देवतेने निळाशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर शुभ्र ढगांचे बुडबुडे तयार केले होते. एक ढग अगदी एका उंच शिखराच्या डोक्यावर होता. शिखराच्या आणि ढगाच्यामध्ये आकाश दिसत नव्हतं. ब्रिटनची राणी एलिझाबेथ जसा मुकुट धारण करते, तसं त्या उंच डोंगराने ढगाचा मुकुट धारण केला होता. लीडर नदी दृष्टीस पडत नव्हती.

अभिजित पानसेमी मोबाईलने फोटो काढू लागलो. इतक्या प्रचंड निसर्गदेवतेला मोबाईलच्या शूद्र कॅमेरात चित्रबद्ध करण्याचा तो माझा एक बालिश प्रयत्न आहे असं मलाच वाटलं. जिथे दोन डोळे कमी पडत होते निसर्गानंद शोषून घ्यायला तिथे मोबाईल कॅमच्या फोटोमध्ये कसला फील येणार होता; पण आपण सर्वच मोबाईलचे खालमाने चाकर झालो आहोत. मी काही फोटोंचा आणि सेल्फीचा कुळाचार आटोपून मोबाईल खिशात घातला. जमेल तेवढा तो निसर्ग डोळ्यांनी शोषून घेत होतो. मस्त हवा सुटली होती. 

मागे लाऊड स्पीकरवरून शंकराची हिंदी आणि पंजाबीमधील गाणी सुरू होती. तो एक भंडारा होता. लोक तिथे उदरभरण करत होते. मी काहीही खाण्याचा प्रश्नच नव्हता. पोटाचा मूड सकाळपासून बिघडला होता. पिस्सू टॉप हा फक्त एक माईलस्टोन होता. अजून बरंच अंतर पार करायचं होतं. थोडावेळ थांबून समोर जाणं गरजेचं होतं. निसर्ग हेच शिकवतो. कुठेही एका ठिकाणी अडकून राहायचं नाही. नदीच्या पाण्याला एकदा स्पर्श केला तर पुन्हा स्पर्श करता येत नाही. 

मी समोर जायला निघालो. पुन्हा पोटाने जोरदार सूचना केली की विश्रांतीगृहात म्हणजे शौचालयात जाणं अत्यंत गरजेचं आहे. वेगाने आजूबाजूला दृष्टी फिरवली. एका दूर ठिकाणी लोखंडी पोर्टेबल शौचालयांची कॉलनी दिसली. भराभरा तिथपर्यंत पोहचलो. बाहेर दोन काश्मिरी माणसं होती. अंगात अमरनाथ श्राईन बोर्डा लोगो असलेले कामावरील पातळ जॅकेट होतं. मी त्यांना विचारलं, की मी माझी बॅग आणि लाठी बाहेर ठेवू शकतो का. तुम्ही लक्ष ठेवाल का, काहीही हरकत नाही, असं ते म्हणाले. माझ्या पाठीवर एकमेव बॅग होती. तिच्यात सर्व सामान होतं. मी त्यांच्यावर विश्वास दाखवून ती बॅग बाहेर ठेवली आणि निसर्गाच्या जोरदार हाकेला ओ द्यायला गेलो. 

बाहेर आलो, तर त्या माणसाने स्वतः साबण देऊन हातावर पाणी टाकलं. मला अगदी शरमल्यासारखं झालं. ही यात्रा कसे वेगवेगळे अनुभव देते, याचं ते उदाहरण होतं. माणसांची माणसांमुळे माणसांसोबत होणारी ही यात्रा आहे. मी बॅग पाठीवर घेऊन पटकन त्या माणसाला नमस्कार करून समोर निघालो. माझ्यासाठी तो माणूसही शिव होता.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link