Next
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान
प्रेस रिलीज
Tuesday, June 19, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून श्रीराम पाठक, प्रा. ज्ञानेश्वर प्रधान, प्रा. सुजित धर्मपात्रे व पांडुरंग कोटुळे.

पुणे : सुमेध पब्लिकेशन प्रकाशित व सुजित धर्मपात्रे लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन व स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम २३ जून २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

‘या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (आयपीएस), तेलंगणातील राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (आयपीएस), नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे (आयएएस), पुणे प्रादेशिक विकास महामंडळाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गीते (आयएएस) हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार (आयपीएस) असणार आहेत,’ अशी माहिती पुस्तकाचे लेखक प्रा. सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सुमेध पब्लिकेशनच्या संचालिका पद्मश्री पाठक, समारंभाचे आयोजक ज्ञानेश्वर प्रधान व पांडुरंग कोटुळे उपस्थित होते.

प्रा. धर्मपात्रे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील हे प्रशासनिक अधिकारी युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. यूपीएससी-एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोलाचे आहे. २०१६च्या यूपीएससी परीक्षेत भारतातून तिसरा आलेल्या गोपाल कृष्ण रोनांकी यांना हिंदी व इंग्लिश या भाषा फारशा अवगत नसतानाही त्यांनी यश मिळविले. त्यांनी तेलुगु भाषेतून या परीक्षांचा अभ्यास केला. याचा अर्थ तेलगू भाषेमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातही मराठी भाषिक विद्यार्थ्यांना दर्जेदार असे मराठी साहित्य उपलब्ध करून दिले, तर महाराष्ट्रीय युवकही या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतील. हीच प्रेरणा घेऊन मी ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या पुस्तकाची निर्मिती केली. अशीच दर्जेदार पुस्तकांच्या निर्मितीची चळवळ सुमेध पब्लिकेशनच्या माध्यमातून उभारण्याचा माझा हेतू आहे. प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमामागील हेतू आहे.’

पद्मश्री पाठक म्हणाल्या, ‘स्पर्धा परीक्षार्थींसाठी दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करण्याचा सुमेध पब्लिकेशनचा मनोदय आहे. प्रा. सुजित धर्मपात्रे यांनी युपीएससीचा परीक्षार्थी म्हणून इतिहासाचा जो अभ्यास केला व चिंतन केले ते पुस्तक रूपाने प्रकाशित करीत आहोत. स्पर्धा परीक्षेसाठी दर्जात्मक साहित्याची गरज आहे. दर्जात्मक व समीक्षात्मक पद्धतीने लिखाण केलेल्या या पुस्तकाला अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे गौरविले आहे. उत्कृष्ट नकाशे, व्यक्तिचित्रे, परिशिष्टे व अनेक प्रकरणातून इतिहासाचा घेतलेला आढावा सर्व भारतीय नागरिकांनी अभ्यासावा, असा आहे. ‘इतिहास माहित असणारेच इतिहास घडवतात’ या न्यायाने सर्व भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्याची ही गौरवगाथा अभ्यासावी अशी आहे.’

या कार्यक्रमाचे नियोजन सोयीचे व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २३ जून २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.
नावनोंदणीसाठी : www.dharmpatre.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link