Next
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संशोधनाची चर्चा
BOI
Saturday, January 19, 2019 | 04:55 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात सध्या सुरू आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (१८ जानेवारी २०१९) सकाळी शाश्वत उत्पादन प्रणालीसह विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगावमध्ये कार्यरत असलेले मत्स्य महाविद्यालय आणि दापोलीतील इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
शाश्वत उत्पादन प्रणाली या विषयाच्या सत्रात मुंबईच्या केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे माजी संचालक डॉ. दिलीप कुमार यांनी शाश्वत मत्स्यसंवर्धन विकासामध्ये संशोधन आणि विकासाची भूमिका यावर सविस्तरपणे विवेचन केले. मत्स्य महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. जोशी यांनी निमखाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या सफेद कोळंबीचे क्षारपड पाण्यात संवर्धन या नावीन्यपूर्ण प्रयोगाची माहिती दिली. 

अमरावतीचे विभागीय मत्स्य व्यवसाय उपायुक्त विजय शिखरे यांनी शाश्वत पारंपारिक मत्स्य उत्पादन पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. दिलीपकुमार यांनी भूषविले, तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. के. के. तिवारी यांनी काम पाहिले. सत्र संकलक म्हणून डॉ. अनिल पावसे व डॉ. संतोष मेतर यांनी काम पाहिले, तर सत्र समन्वयक डॉ. भरत यादव होते. 

परिषदेच्या सातव्या तांत्रिक सत्रात आरोग्य व पर्यावरण व्यवस्थापन या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. के. सिंग होते. उपाध्यक्ष म्हणून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांनी काम पाहिले. माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मातीच्या गुणवत्तेचे मत्स्यव्यसायात महत्त्व याबाबत मत्स्य शास्त्रज्ञांचे व मत्स्य संवर्धकांचे उद्बोधन केले. या सत्राचे संकलक म्हणून डॉ. बाळासाहेब चव्हाण व डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी काम पाहिले. डॉ. अनिरुद्ध अडसूळ यांनी या सत्राचे समन्वयन केले. 

काढणी पश्चात तंत्रज्ञानातील प्रगती हे आठवे सत्र नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक (सागरी मत्स्य व्यवसाय) डॉ. पी. प्रवीण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्राचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. अमररत्ने याकुपितियागे यांनी काम पाहिले. सत्र संकलक डॉ. आशिष मोहिते व डॉ. विजयकुमार मुळ्ये होते. डॉ. पी. प्रवीण यांनी मत्स्य काढणी तंत्रज्ञानातील आधुनिक पद्धती याविषयी शास्त्रज्ञांना माहिती दिली. डॉ. सैली थॉमस यांनी ‘गिल्लेट मासेमारी : पर्यावरणाला पूरक की हानिकारक’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्राचे समन्वयन डॉ. विवेक वर्तक यांनी केले.

नववे सत्र मत्स्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञानातील नवनवीन कल या विषयावर पार पडले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. रविशंकर सी. एन. यांनी भूषविले, तर उपाध्यक्ष म्हणून थायलंडच्या प्रिन्स ऑफ संगकोला विद्यापीठाचे डॉ. सुट्टावर बेंजाकुल यांनी काम पाहिले. माशांपासून सुरमी बनवताना गुणवत्ता कशी चांगली राखली जाईल, याबाबत बेंजाकुल यांनी विशेष मार्गदर्शन केले. डॉ. रविशंकर सी. एन. यांनी मत्स्य पदार्थ प्रक्रियेमध्ये मत्स्य पदार्थांचे वेष्टन आणि त्याची आवश्यकता या विषयावर विस्तृत विवेचन केले. दीपक चौधरी यांनी मत्स्य पदार्थ प्रक्रिया कारखान्यातून निर्माण होणाऱ्या घन आणि द्रव पदार्थांचा पुर्नवापर, ऊर्जा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्राचे समन्वयक म्हणून डॉ. सुरेंद्र पतंगे व संकलक म्हणून डॉ. जी. एन. कुलकर्णी व डॉ. ए.  यू. पागारकर यांनी काम पाहिले. प्रत्येक सत्रानंतर त्या त्या विषयातील शोधनिबंध व्याख्याने व भित्तिपत्रकांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित राहून परिषदेला शुभेच्छा दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मत्स्य महाविद्यालया चे विशेष अभिनंदन केले. 

या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त मत्स्य व्यवसाय, मत्स्य संवर्धन व मत्स्यप्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या आधुनिक साधनसामग्रीचे प्रदर्शनही परिषदेच्या स्थळी मांडण्यात आले आहे. 

(या परिषदेच्या उद्घाटनाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link