Next
शिरूर, मावळमध्ये नऊ ‘सखी मतदान केंद्रे’
BOI
Saturday, April 27, 2019 | 04:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा, या उद्देशाने ‘सखी मतदान केंद्र’ हा उपक्रम अनेक ठिकाणी राबवला गेला. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ या दोन मतदारसंघात येत्या सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होणार असून या उपक्रमांतर्गत शिरूरमधील सहा आणि मावळ मतदार संघातील तीन अशा नऊ मतदान केंद्रांचा कारभार महिलांकडे देण्यात आला आहे. 

महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जातात. या मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी अशा सगळ्याच जबाबदाऱ्यांवर महिला कार्यरत असतील. सखी केंद्राची ही अनोखी संकल्पना यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आली. या उपक्रमाला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसादही मिळाला. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा या उद्देशाने सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे महिलांचा सहभाग वाढण्यास नक्कीच मदत होईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे. 

सखी मतदान केंद्रे निवडताना केंद्राची सुरक्षा, महिलांसाठीच्या सुविधा या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशेषतः पोलिस ठाणे, तहसील कार्यालयानजिक असलेली केंद्रे, अधिकाऱ्यांचा सतत वावर असणारी केंद्रे याशिवाय संवेदनशील नसलेली अशा केंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे. 

या केंद्रांमध्ये जाणीवपूर्वक कोणत्याही एका ठराविक रंगाचा वापर टाळण्यासंबंधीच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी महिला कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात, शिवाय केंद्रावर रंगाबेरंगी सजावटही करू शकतात. जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होण्यासाठी मतदान केंद्र सुशोभित करणे, रांगोळ्या घालणे, स्वच्छतेवर विशेष लक्ष देणे हेदेखील करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले जात आहे.   

शिरूरमधील जुन्नर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा क्र. एक, घोडेगावमधील जनता विद्यामंदिर, आंबेगावमधील न्यू इंग्लिश स्कूल, खेडमधील हुतात्मा राजगुरू विद्यालय, भोसरीमध्ये माता अमृतमयी विद्यालय, निगडी, शिरूरमधील विद्याधाम प्रशाला, निगडी गावठान आणि हडपसरमधील साधना विद्यालय तर मावळमधील कान्हे येथील जिल्हा परिषद शाळा, चिंचवड-थेरगावमधील यशवंतराव चव्हान मनपा शाळा क्र. ६० आणि पिंपरीतील मनपा विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय ही मतदान केंद्रे सखी मतदान केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त कर्जत, उरण आणि पनवेलमध्येही काही केंद्रे आहेत. हे मतदार संघ रायगड जिल्ह्यात येतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search