Next
जागतिक पाणथळ क्षेत्र दिन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात साजरा
BOI
Saturday, February 09, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : पाणथळ क्षेत्रांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन फेब्रुवारीला जागतिक पाणथळ क्षेत्र दिन (वेटलँड्स डे) साजरा केला जातो. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट वेटलँड ब्रिफ डॉक्युमेंटेशन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तहसीलदार वैशाली पाटील, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी प्रास्ताविक करताना पाणथळ क्षेत्र दिनाची यंदाची संकल्पना ‘पाणथळ जागा व हवामानबदल’ अशी असल्याचे सांगितले. तसेच हा दिवस साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाने या दिवसानिमित्त यापूर्वी घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पाच फेब्रुवारी  रोजी ‘शीळ पाणथळ क्षेत्रभेट’ आयोजित केल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा परिचय प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी करून दिला.

सुनील चव्हाण व्याख्यानात म्हणाले, ‘कोकण जैवविविधतेने समृद्ध आहे. कोकणामध्ये अनेक पाणथळ क्षेत्रे आहेत. या जैवविविधतेचा आणि पाणथळ क्षेत्रांचा उपयोग पर्यटन विकासाच्या दृष्टीने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. या विकासासाठी नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.’ 
पाणथळ जागांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. 

दत्तात्रय भडकवाड यांनी पाणथळ क्षेत्राची व्याख्या, त्यांचे प्रकार,  वर्गीकरण, महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनातील प्रशासनाची भूमिका यांसंदर्भातील सादरीकरण केले. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६२ पाणथळ क्षेत्रांची माहिती संकलित करून ती शासन स्तरावर सादर करायची आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय पाणथळ क्षेत्र समन्वय समिती, तसेच तालुका स्तरावरही समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संकलित करण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी व्याख्यानातून दिली.

डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी या वर्षीच्या पाणथळ क्षेत्र दिनाची संकल्पना विशद केली. पाणथळ क्षेत्रे हे हवामानाचे निदर्शक असून हवामानबदलामुळे जागतिक पातळीवर पाणथळ क्षेत्रांच्या स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी असलेल्या सजीवांच्या प्रजातींमध्ये स्थित्यंतरे होऊन परिसंस्थांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

‘विद्यार्थ्यांनी हा विषय अभ्यासेतर प्रकल्पाच्या दृष्टीने राबवून आपल्या सभोवतालच्या परिसरातील विविध परिसंस्थांना आणि पाणथळ क्षेत्रांना भेटी देऊन त्याचा अहवाल आपल्या विभागाकडे सादर करावा,’ असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रा. अंबादास रोडगे यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
......
हेही जरूर वाचा :
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search