Next
डी-मॅट खात्याचा श्रीगणेशा
BOI
Saturday, April 21 | 03:45 PM
15 0 0
Share this story

थोडी जोखीम घेऊन शेअर बाजारात केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते, हे आपण ‘समृद्धीची वाट’ सदरातील मागील एका लेखातून पाहिलेले आहे. आजच्या भागात आपण माहिती घेऊ या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डी-मॅट खात्याबाबत. 
................
डी-मॅट (डी-मटेरियलायझेशन) खाते असल्याशिवाय शेअर्समध्ये गुंतवणूक करता नाही. डी-मॅट खाते हे बँकेच्या सेव्हिंग खात्यासारखे असून, यात आपण घेतलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जमा होतात आणि आपण विकलेले शेअर्सचीही नावावर नोंद (डेबिट) होते. यात पैसे जमा अथवा वजा होत नाहीत. ‘डी-मॅट’ची सुविधा सध्या एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) व सीडीएसएल (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस) या दोन संस्था आपल्या ‘डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स’मार्फत (डीपी) देऊ करतात. सर्व कमर्शियल बँका व सहकारी बँका (लहान सहकारी बँका वगळता) आणि सर्व प्रमुख ब्रोकर एनएसडीएल व ‘सीडीएसएल’चे ‘डीपी’ असून, त्यांच्यामार्फत आपण ही सुविधा घेऊ शकतो. यासाठी आपल्या सोयीनुसार बँक अथवा ब्रोकरकडे डी-मॅट खाते उघडावे लागते. 

हे खाते सुरू करण्यासाठी आपला फोटो, आधार कार्ड व पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स प्रत जोडून सबंधित ‘डीपी’चा फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच या खात्याशी आपले बँक खाते सलग्न (लिंक) करावे लागते. यासाठी जे खाते लिंक करावयाचे असेल, त्याचा सर्व तपशील (खाते क्र., बँकेचे नाव व पत्ता, आयएफएससी कोड, मायकर कोड) देऊन, त्यासोबत त्या खात्याचा नमुना चेक जोडावा लागतो. ही सर्व पूर्तता केल्यावर साधारणपणे एक आठवड्यात आपले डी-मॅट खाते उघडले जाते. त्यानंतर आपल्या पत्त्यावर खात्याचा तपशील व डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप (डीआय स्लीप) बुक कुरिअरने पाठविले जाते. ज्याप्रमाणे आपल्या बँक खात्यातून पेमेंट करण्यासाठी चेकचा वापर करावा लागतो, त्याप्रमाणेच आपल्या डी-मॅट खात्यातील शेअर्स ट्रान्स्फर करण्यासाठी ‘डीआय स्लिप’चा वापर करावा लागतो.

डी-मॅट खाते एकाच्या, तसेच संयुक्त नावाने उघडता येते. या खात्यावर आयदर ऑर सर्व्हायव्हर किंवा एनीवन ऑर सर्व्हायव्हर ही सुविधा वापरता येते; मात्र असे खाते एकाच्या सहीने चालविता येत नाही. संयुक्त खात्यावरील सर्व खातेदारांना या खात्यावर व्यवहार करताना सह्या कराव्या लागतात. आपण घेतलेल्या अथवा विकलेल्या शेअर्सची नोंद या खात्यावर जमा नावे पद्धतीने होत असते व दर महिन्याअखेरचे खात्याचे स्टेटमेंट ई-मेल, तसेच कुरिअरने पाठविले जाते. 

या स्टेटमेंट तारखेला आपल्या नावावर असलेल्या सर्व शेअर्सचा तपशील (कंपनीचे नाव व किती शेअर्स) आपल्याला त्यातून समजतो. शिवाय या तारखेला प्रत्येक शेअरची बाजारभावाने होणारी किंमत व सर्व शेअर्स मिळून एकत्रित किंमत दिली जाते. ही सुविधा वापरण्यासाठी साधारणपणे ३५० ते ४५० रुपये इतकी वार्षिक फी संबंधित ‘डीपी’कडून आकारली जाते. हल्ली काही डीपी दोन ते तीन हजार रुपये इतकी वन टाइम फी आकारत आहेत.

प्रायमरी मार्केटमध्ये पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना हा डी-मॅट खाते नंबर द्यावा लागतो. आपल्याला शेअर्स देऊ केले गेल्यास असे शेअर्स आपल्या डी-मॅट खात्यात परस्पर जमा केले जातात. आपण सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी अथवा विक्री करणार असाल, तर ब्रोकरमार्फत घेतले अथवा विकलेले शेअर्स डी-मॅट खात्यात जमा नावे होतात. ब्रोकरकडेच डी-मॅट खाते असणे जास्त सोयीस्कर ठरू शकते. कारण आपण ऑनलाइन व्यवहार करणार नसाल, तर दर वेळेला डीआय स्लिप बँकेकडे पाठवली जाते. त्याऐवजी ब्रोकरकडेच डी-मॅट खाते असेल, तर जास्त सोयीचे होते.

आता डी-मॅट खात्यावर आपण म्युचुअल फंड, डिबेंचर्स, कॅपिटल गेन बाँड यांसारखे व्यवहारही करू शकता. नजीकच्या काळात पोस्टल सर्टिफिकेट्स, पीपीएफ यांसारखी गुंतवणूकसुद्धा डी-मॅट खात्यातून करता येऊ शकेल. विशेष म्हणजे शेअर बाजारातील सर्व व्यवहार आता ‘डीपी’मार्फतच होत असल्याने आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर हे खाते उघडणे क्रमप्राप्त आहे. 


- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link