Next
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी
BOI
Saturday, November 10, 2018 | 11:35 AM
15 0 0
Share this storyपुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...
...........
साठ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला. लाइट आणि नळाचं पाणी घराघरांत येण्यापूर्वीचं सांगली जिल्ह्यातलं ईश्वरपूर - आजचं उरुण - इस्लामपूर हे माझं जन्मगाव. छोटं खेडेगाव. त्या रम्य आठवणीत मी पोहोचलो. ‘बिनपाण्याचं गाव’ ही त्याची ख्याती. ऋतुमानाप्रमाणे पडणारा कमी पाऊस. गावातली आठ-१० मोठी तळी, घराघरातले आड, विहिरी फक्त पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या आणि उन्हाळ्यात तळ दिसणाऱ्या, कोरड्या ठणठणीत. त्यावर साऱ्यांचं जीवन अवलंबून. आठ-दहा मैलांवर नेह-नृसिंगपूर, बोरगाव - ताकारी गावातून संथ वाहणारी कृष्णामाई हा एकच आधार! पंतासबनीस, वैद्य, हणमसागर यांच्या शेतातल्या विहिरी हा दिलासा म्हणता येईल. इतकी पाण्यासाठी वणवण करावी लागली. दहा घागरी ओढणारी साधी पाणकी मंडळी दुरून दुरून घाम गाळीत लोकांची तहान भागवत होती, असा काळ.

स्वच्छ – कोरडी हवा.. हा एकच महत्त्वाचा दुवा. तालुका वाळवा. मामलेदार कचेरी, कोर्ट, डीवायएसपी बंगला, प्राथमिक शाळा, दोन हायस्कूल्स, सरकारी जनावरांचा आणि माणसांचा दवाखाना, देवळे, चर्चेस - बाजार मार्केट, अशा सुखसोयींनी युक्त गाव. ‘आधुनिक भारत’ ग्रंथाचे ज्येष्ठ लेखक, दै. लोकशक्तीचे, पुण्याच्या ‘साधना’चे माजी संपादक आचार्य शं. द. जावडेकर या ऋषितुल्य व्यक्तीच्या वास्तव्याने पुढे हे गाव नावारूपाला आले. स्व. म. गांधी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे ते ग. प्र. प्रधान सरांपर्यंत अनेक नामवंत समाजवादी मंडळींच्या गाठीभेटीचं, स्वातंत्र्यपूर्व काळातलं ठिकाण बनलं होतं. १९४२च्या क्रांती लढ्यातले शाहीर निकम, एन. डी. पाटील, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील या साऱ्या मंडळींची नावं शालेय जीवनापासून प्रेरणादायी झाली होती. पुण्यात आजही ‘सर! तुम्ही आचार्यांच्या गावचे?’ अशी विचारणा होते, अशी ही एक ओळख मला जास्त प्रिय आहे.

माझे पिताजी स्व. मु. वि. इनामदार. मूळचे नेर्ले गावचे. म्हणून नेर्लेकर-कुलकर्णी-इनामदार, जमीनदार. इस्लामपूर हायस्कूलचे मराठी-संस्कृत-इतिहास-इंग्रजी विषयांचे शिक्षक, संतवाङ्मयाचे अभ्यासक-कवी-लेखक रविकिरण मंडळाचे सभासद. (फुलोरा-१९२७/शार्दूल १९३०) या नात्याने आचार्यांचे निकटवर्ती-स्नेही. गावातही प्रतिष्ठितांसह सर्वसामान्यांची आपुलकी, प्रेम संपादन केलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे सहकारी तर त्यांना आदराने पिताजी आणि माझ्या आईला-आक्काला- माताजी म्हणून संबोधत. सर्व जातीधर्मांतल्या मंडळींची ऊठबस असे. त्यांच्यासाठी कुणीही अस्पृश्य नव्हता. आचार्यांच्या आग्रहाने मोहनदास बोध व सार्थ ईशोपनिषद हे महात्मा गांधींच्या जीवनावर ओवीबद्ध लेखन त्यांनी केलं आहे. (१५-८-१९५२)

साहित्याची उत्तम जाण असलेली अनेक मंडळी-स्नेही यांचं एक वाङ्मय मंडळ तिथं कार्यरत होतं. माझ्या बाबांचं गाव नेर्ले. घर-वाडा-शेतीचं सुखवस्तू घराणं. हायवेच्या पलीकडे काळमवाडी- कासेगावमार्गे वाटेगाव (अण्णा भाऊ साठेंचं गाव) श्री लक्ष्मी-विष्णुमंदिर - हे माझ्या आईचं माहेर. मामाचं गाव. चांगदेवांनी पूजलेला वटेश्वर आणि दिवेकरांचं महाराष्ट्रातील एकमेव वासुदेवमंदिर. वाहता ओढा, निसर्गरम्य हिरवा परिसर ही आजही माझी जिव्हाळ्याची ठिकाणं.

शिक्षण-नोकरीनिमित्तानं माझा बाबा कोल्हापूर-सांगली-सातारा-कराडहून-इस्लामपुरात स्थायिक झाला. कोर्टासमोर आपटे (ताकारी मोटर सर्व्हिस मालक) यांच्या ट्विन टाइप बंगल्यात, आठ खणी प्रशस्त, स्वतंत्र वास्तूत १० रुपये भाड्याने आम्ही राहत होतो. बाबाचा पगार ३० रुपये होता. प्रपंच, गोतावळा, मोठा, तरी सुखी माणसाचा सदरा पांघरलेलं ‘घरकुल’ होतं. मध्यवर्ती जागा, मोठ्ठं अंगण, सोपा, माजघर, गोठा - इतकं सुंदर घर होतं. पंचक्रोशीत पसरलेल्या शेतजमिनीवरच मुबलक धान्याच्या राशी वाटेकरी-शेतकरी घेऊन येत. गुऱ्हाळ/हुरडा/मळणीचे सुगीचे दिवस. शेतातलं वास्तव्य आजही डोळ्यांसमोर आहे. 

घरात आम्ही सहा भावंडं, एकुलती एक बहीण. ज्येष्ठ बंधू दादा. (अनंत ऊर्फ बाबू) पुणे खडकी-वैद्यांच्या ‘स्वस्तिक रबर’मध्ये नोकरीस. दुसरा भाऊ – मधुकर (इस्लामपूर कोर्टात नाझर) दोघेच नोकरी करणारे-विवाहित. त्यांची चिल्लीपिल्ली-प्रकाश-प्रमिला/मीना-लीला. तिसरा भाऊ तात्या (प्रभाकर) पुणे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये. चौथा भाऊ राजाभाऊ (माधव) बँकेच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात. पाच नंबरचा भाऊ शरद ऊर्फ वसंत इयत्ता अकरावीत. सहा नंबरची बहीण - शकुंतला नववीत, मी शेंडेफळ सातवीत. आम्ही इस्लामपूर हायस्कूलमध्ये शिकणारे.

घर सदैव पै-पाहुण्यांनी अखंड भरलेलं. रोजचा दहा-पंधरा जणांचा राबता. चहाचं तर पातेलं अखंड चुलीवरच असे. तरीही आईचा कामाचा वेग, उत्साह वाखाणण्यासारखाच होता. दारी आलेला पै-पाहुणा तिच्यासाठी देव! अतिथी देवो भव! निवांतपणा, विश्रांती हे शब्द तिला माहितीच नव्हते. कुळाचार, देवधर्म, रीतभात, उपासतापास, स्वच्छता याबाबत अत्यंत काटेकोर. मग ते जात्यावरचं दळण असो, कांडण असो, सारवण असो, गाई-म्हशीसाठी स्वतंत्र गडी/माणसं बायका कामाला होत्या. तरीही ती कधी त्यांच्यावर अवलंबून राहिली नाही. खऱ्या अर्थाने ती पाककलाकुशल-कर्तव्यदक्ष गृहिणी होती. ‘कर्मयोगिनी’ होती. घटस्थापना-दसऱ्यापासून तिची दिवाळीची तयारी सुरू व्हायची. ज्येष्ठ बंधू शरद आणि मी अख्खं शेंगांचं पोतं सायकलवर टाकून, अंबाबाई देवळालगतच्या तेल्याघरी घाण्यावर तेल काढण्यासाठी जात असू. डबाभर तेल, गाई-म्हशीसाठी पेंड घरी आणत असू. दूधदुभत्याची चंगळ असे. उरुणातला कुंभार पाटीभर पणत्या आणून देई. धान्य घेऊन जाई. त्या अंगणभर लावण्यात आम्ही सारे दंग होत असू. वहिनी/बहिणीच्या रांगोळ्यांनी सांज कशी लखलखीत होई. तेव्हा महागाई-टंचाई-काटकसरीचा कुठेही लवलेश नव्हता. सारी आनंदीआनंदाची दिवाळी सुरू होई.

आदल्या दिवशी आम्ही सारी भावंडं पुण्याहून येणाऱ्या दादा-वहिनींची आतुरतेनं वाट पाहत असू. स्टँडवरून पांडू टांगेवाला कधी दारात येतो, असं आम्हा सर्वांना होई. आईचा तो लाडका बाबू सुना-नातवंडांसह अंगणात उभा. पायावर पाणी घालून भाकरीचा तुकडा ओवाळूनच घरात प्रवेश. दादाच्या भरगच्च दोन-तीन बॅगांत काय काय असेल, याची उत्सुकता लागून राहायची! नंतर जादूच्या पोतडीतून तो आम्हा सर्वांच्या हातावर ‘दिवाळी सरप्राइज गिफ्ट’ देई. तो आनंद काय वर्णावा! आई-बाबांसह लाडक्या बहिणीसाठीही खास भेट असे. दादाला स्वतःला नावीन्याची ओढ होती. प्रत्येकाची हौसमौज भागवण्यात त्याचा हात आईप्रमाणेच उदार होता. काटकसर त्याला माहीत नव्हती. दादानं आम्हा सर्वांना खूप जपलं. प्रेम दिलं. आई-वडिलांनंतरं... ‘सर्वांनी सांभाळून राहा. नाती टिकवा. आपला प्रपंच मोठा. त्यांची जपणूक व्हावी,’ ही शेवटची इच्छा त्यानं माझ्याजवळ बोलूनही दाखवली. सर्वांत लहान असूनही माझ्या दादाचे शब्द मी शिरसावंद्य मानीत आलो. आमची आजची पिढी तरुण आहे, समजूतदार आहे. मी आणि माझी पत्नी श्रद्धा समाधानी आहोत. माझे सारे पुतणे, पुतण्या, भाचे, सुना, जावई, नातवंडं, पतवंडं यांनी घर सदैव भरलेलं आहे. सुख-दुःखात एकमेकांसाठी धावून येणारी ही सारी मंडळी. हेच आमचं वैभव आहे. ‘घरं-दारं स्वतंत्र असली तरी मनं विस्तारित आहेत,’ हा संस्कार आजच्या बदलत्या विचारसरणीच्या प्रवाहात दिवाळीचा आनंद देणारा आहे.

अशा या काळात जुने दिवस आठवल्याशिवाय राहत नाहीत. पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गावात तेव्हा दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी मोठी तयारी करावी लागत होती. मला आठवतो तो नरकचतुर्दशीचा पहिला दिवस. पहाटे तीनपासून गोठ्याजवळच्या स्नानगृहात (न्हाणी) चुलीवर भलामोठा तांब्याचा हंडा गरम पाण्याने उकळत असे. पाच वाजता सडा, रांगोळी, दिव्यांनी अंगण सजलेलं असे. बारा बलुतेदारांपैकी गावातला आम्हा सर्व भावंडांची हजामत करणारा (केस कापणारा) न्हावी रामा, बायको-मुलीला घेऊन दारात उभा. तिला प्रथम ओवाळण्याचा मान. आम्ही सारी भावंडं वयाच्या क्रमानुसार तिला ओवाळणी घालत असू. त्यानंतर रामा प्रत्येकाला सुवासिक तेलाने माखून, रगडून पचपचीत तेल्या करी. आई त्याच्या कुटुंबाला धान्य देई. वहिनी-ताई ओटी भरी. फराळाचे जिन्नस देई. त्यांचे समाधानी चेहरे आनंदाने उजळून निघत. आई-वहिनी-बहीण सर्वांना चंदनी उटण्यानं – साबणानं, गरमागरम पाण्यानं आंघोळी होऊन नवे कपडे परिधान करीपर्यंत भाऊकडे देवपूजा करण्याची कामगिरी असे. तोपर्यंत बाहेर फटाके उडविण्यात आम्ही सारे दंग असू. नंतर पहाटे देवदर्शनासाठी गावातल्या साऱ्या देव-देवळांना भेटी देऊन, घरी परत यायचो आणि फराळावर ताव मारायचो. एकत्र ब्रेकफास्ट होई.

दिवाळी पाडवा दोघी वहिनींचा (उषा आणि मालती) स्पेशल असे. त्यानंतर भाऊबीज. एकुलत्या एका लाडक्या बहिणीचा (शकुंतला) लाडाचा दिवस. सहा भावंडांची भरघोस भाऊबीज. ब्रिटिशकालीन चांदीच्या रुपयांच्या नाण्यांनी ताम्हण भरून जाई. शिवाय ड्रेस मटेरियल मिळे. चैन असे. माझ्या वडिलांची बहीण अल्पायुषी ठरल्याने ते आपल्या मुलीकडून ओवाळून घेत. तसेच मधुभाऊच्या बायकोला भाऊ नाही. म्हणून माझा दादा तिला ओवाळणी घाली. बारा वाजता वाटेगावाहून आईचा भाऊ आपल्या मुला-बाळांसह येई. ‘मामा आला’ म्हणून सर्वांना आनंद होई. आईची भाऊबीज साजरी होई.
घरात गाई-म्हशींचा गोठा. पांडव पंचमी, तुळशीच्या लग्नापर्यंत आमची दिवाळी साजरी होत असे. वाटेकरी नेर्ल्याहून येत. रामजी पाटील, बयाजी खुडे, अकबर भाई ही आमची कुळे. त्यांनी आणलेल्या उसाच्या मोळ्या, रस, ज्वारी-मका-गव्हाच्या लोंब्या, चिंचा-आवळे यांनी घर भरून जाई. अंगणात संध्याकाळी दीक्षित गुरुजी, बाबा भटजींच्या हस्ते तुळशीचं लग्न साजरं होई आणि मिष्टान्न भोजनानं दिवाळी स्मरणीय होई.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर कूळकायदा आला. शेतीवाडीचा कुळांचा भक्कम आधारच संपला. आम्ही प्रत्येक भावंड संसारासाठी मुलाबाळांना घेऊन शहराकडे धावलो. तिथेच स्थिरावलो. तरीही इस्लामपुरातली दिवाळी माझ्या मनात आजही स्वच्छ लखलखीत आहे. तिची सर कुठेच नाही. असा आनंद आता नाही. अशी दिवाळी आता नाही.

संपर्क : शशिदा इनामदार, सेवानिवृत्त अध्यापक,
(द्वारा सौ. ऋता लिमये)
५, मॉन-अमॉर, थोरात कॉलनी,
१४वी गल्ली, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे - ४११००४
मोबाइल : ९४२२५ २६९२०

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajendra Inamdar About 128 Days ago
Very good. Sweet memories of Diwali.
0
0

Select Language
Share Link